मार्केझ, गॅब्रिएल गार्सिया : (६ मार्च १९२७–१७ एप्रिल २०१४). नोबेल पुरस्कारप्राप्त स्पॅनिश साहित्यातील एक महत्त्वाचे कोलंबियन लेखक आणि पत्रकार. मेक्सिको देशात वास्तव्य. जन्म कोलंबिया देशातील आराकाटाका या गावी. बालपण याच गावात गेले. आजी-आजोबांनी (आईचे आई-वडील) त्यांना वाढविले. आजी त्रांकिलिना इगुआरान त्यांना जादुई विश्वातील लोककथा सांगत असे. आजोबा कर्नल निकोलास मार्केझ हे देखील एक उत्कृष्ट कथाकार होते. मार्केझ यांनी एका ख्रिश्चन कॉलेजमधील प्राथमिक पदवीनंतर १९४६-४७ अल्पकाळासाठी कार्ताखेना विद्यापीठात शिक्षण, पुढे हे शिक्षण अर्धवट सोडून पत्रकारितेस सुरुवात केली. वाचन आणि पत्रकारितेच्या अनुभवातून आपले खरे शिक्षण झाले असल्याची त्यांची धारणा. एकाकीपणा, प्रेम, हिंसा, अन्याय, संस्कृती इत्यादी सामाजिक विषय लेखक म्हणून त्यांच्या आस्थेचा भाग होता. त्यांनी कादंबरी, कथा, चित्रपटांच्या पटकथा, नियतकालिकातील लेखन असे साहित्यप्रकार हाताळले.

विसाव्या शतकात दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश भाषेतील साहित्यात ‘मॅजिक रिॲलिझम’ अद्भुत कल्पना-विश्वावर आधारलेला प्रकार उदयास आला. या शैलीमध्ये जादूई तसेच अद्भुत अशा गोष्टी दैनंदिन जीवनाचा भागच असल्यासारख्या दाखवल्या जातात. मार्केझ यांना या शैलीचे प्रणेते मानले जाते. या प्रकारच्या लिखाणात नैसर्गिक किंवा भौतिक जगातील नियमांमध्ये न बसणाऱ्या अशा काही गोष्टी दिसून येतात. तसेच, ‘वास्तव’ आणि ‘अद्भुत’ यांची सरमिसळ या लेखनशैलीमध्ये दिसून येते.
मार्केझ यांची ‘ला ओखारास्का’ (१९५५) (इं. शी. ‘द लीफ स्टॉर्म’) प्रेम आणि समाजाकडून मिळालेला तिरस्कार यातील द्वंद्व, कुंठित समाजाचे अध:पतन, एकाकीपणा, मानवी नात्यांची गुंतागुंत, स्वतःच्या पौरुषाविषयीचा एखाद्याच्या मनात असलेला संदेह, समाजातील अंतर्निहित हिंसा यांवर आधारित कादंबरी आहे. ‘एल कोरोनेल नो तिएने किएन ले एस्क्रिबा’ (१९६१) (इं. शी. ‘नो वन राइटस टू द कर्नल’) प्रतिकूल काळातही जागवत ठेवलेली आशा, मानवी प्रतिष्ठा, भ्रष्ट समाजातही मूल्यें जतन करण्यासाठी दिलेला लढा असे एकाकीपणाच्या कुंपणाखाली बंदिस्त झालेले विषय, दारिद्र्य, सरकारची लोकांविषयीची बेफिकिरी या साऱ्यांमुळे एका चांगल्या भविष्यकाळाची अपेक्षा आणि कठोर वास्तव या दोहोंच्यामध्ये निर्माण झालेल्या तणावाचे चित्रण करणारी ही लघुकादंबरी आहे. या कादंबरीमध्ये प्रतीक म्हणून एका पत्राचा वापर केला आहे. हे असे पत्र आहे, जे त्याची वाट पाहणाऱ्याला कधी पोहोचतच नाही. ‘ला माला ओरा’ (१९६२) ( इं. शी. ‘इन इवल अवर’) कोलंबिया देशातील सामूहिक हिंसा, त्या हिंसेची कारणे, राजकीय आणि सामाजिक भ्रष्टाचार, हुकूमशहांची ताकद, अफवांचे विध्वंसक परिणाम, एका जमातीची काही रहस्ये, भीती, अविश्वास, नैतिकता आणि व्यावहारिकता यामधील द्वंद्व, आणीबाणी आणि दडपशाहीचे वातावरण या सर्वांचे वर्णन करणारी कादंबरी आहे. ‘लोस फुनेरालेस दे ला मामा ग्रांदे’ (१९६२) (इं. शी. ‘बिग मामाज फ्युनरल’) पहिला मोठा असा लघुकथासंग्रह, ‘सिएन आन्योस दे सोलेदाद’ (१९६७) (इं. शी. ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’) ही मार्केझ यांची ‘जादुई वास्तव’ या शैलीमध्ये लिहिलेली कादंबरी. या कादंबरीस जागतिक पातळीवर यश मिळाले. माकोंदो नावाच्या एका काल्पनिक गावात घडणारी, एका व्यभिचारी कुटुंबाची दुष्टचक्रात फिरत राहणारी, सात पिढ्यांची कहाणी या कादंबरीमध्ये सांगितली आहे. बुऐन्दिया कुटुंबात पिढ्यान् पिढ्या मायेचा, प्रेमाचा अभाव असल्याने, सतत घडत राहणाऱ्या त्याच-त्या चुकांमुळे, या कुटुंबाच्या पिढ्यांमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते. त्यामुळे वर्षानुवर्षे या कुटुंबाच्या वाट्याला एकाकीपणा आला आहे. अखेरीस या कुटुंबाचा वंशच संपुष्टात येतो.
‘उन सेन्योर मुई विएखो कोन उनास आलास एनोर्मेस’ (१९७२) (इं. शी. ‘ए व्हेरी ओल्ड मॅन विथ अनॉर्मस विंग्ज’) ही आहे बालगोपालांसाठी लिहिलेली उत्कंठावर्धक कथा. या कथेचा आरंभ होतो तो एका रूपकात्मक वादग्रस्त प्रश्नाने, ‘सुईच्या अग्रावर किती देवदूत मावतात?’ हा तो मध्ययुगीन काळातला, वेळखाऊ समजला जाणारा प्रश्न. या कथेमध्ये मुलांना भेटते अनोळखी भाषा बोलणारी, पंखधारी व्यक्ती, जी देवदूत असल्याचे काहींना वाटते. भीषण पावसात, एका वादळी रात्री, एका कुटुंबाच्या, खेकड्यांनी बुजबूजलेल्या घराच्या मागच्या आवारात ती चिखलामध्ये पालथी पडलेली आढळून येते. ‘एल आहोगादो मास एर्मोसो देल मुन्दो’ (१९६८), (इं. शी. ‘द हँडसमेस्ट ड्राऊन्ड मॅन इन द वर्ल्ड’) लघुकथा आहे. ‘एल ओतोन्यो देल पात्रिआर्का’ (१९७५) (इं. शी. ‘द ऑटम ऑफ द पॅट्रिआर्क’) ही लेखकाच्या मते, ‘सामर्थ्याचे एकलेपण’ यावर केलेली एक कविता असे या कादंबरीचे स्वरूप असून, ही एका हुकूमशहाची कथा आहे. सामर्थ्यवान असूनही माणूस कसा एकाकी पडू शकतो, याचे जिवंत चित्रण करणारी ही कादंबरी. आपल्यापुढे येते ती एका स्वप्नवत, प्रतीकात्मक शैलीमध्ये. भ्रष्टाचारी एकाधिकारशाहीचे वर्णन करणारी, एकाच व्यक्तीच्या हातामध्ये केंद्रित झालेल्या सत्तेचे भयानक परिणाम विदित करणारी कादंबरी. ‘क्रोनिका दे उना मुएर्ते आनुनसिआदा’ (१९८१) (इं.शी. ‘क्रॉनिकल ऑफ ए डेथ फोरओल्ड’) ही अतिशय गाजलेली कादंबरी. कुटुंबाची प्रतिष्ठा, कट करून कुटुंबातील एका व्यक्तीची होणार असलेली हत्या आधीपासून माहीत असूनही, ती हत्या टाळण्याचा कोणीही प्रयत्न न करणे, मनुष्याचे अटळ प्रारब्ध, सामूहिक नैतिकता, सत्य ठाऊक असूनही ते जाणून न घेणे, सूड वृत्ती आणि व्यभिचार या साऱ्यातील गुंतागुंतीची कथा सांगणारी ही शोकांत कादंबरी. ‘दिआत्रिबे दे आमोर कोन्त्रा उन ओम्ब्रे सेन्तादो’ (१९८७) (इं. शी. डायाट्राईब ऑफ लव्ह अगेन्स्ट अ सीटेड मॅन) हे मार्केझ यांनी लिहिलेलं एकमेव नाटक. मार्केझ यांच्या कथासाहित्यातून दक्षिण अमेरिका आणि यूरोप येथील संस्कृती एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या असता घडणारा संघर्ष, भोगावा लागणारा वनवास, एकाकीपणा, माणसाची अस्मिता आणि ओळख, हिंसा, प्रेम, दक्षिण अमेरिकेतून तीर्थाटनासाठी यूरोपमध्ये निघालेल्या लोकांच्या आयुष्यात आलेले काही अलौकिक, अद्भुत असे वैविध्यपूर्ण अनुभव दिसून येतात.
मार्केझ यांना विविध पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले. १९७५ व १९८० या दोन वर्षी पटकथा लेखनासाठी त्यांना ‘सिल्वर एरियल’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले (१९८२). तसेच मॅन बुकर इंटरनॅशनल प्राइझ त्यांना मिळाले (२००५).
मेक्सिको येथे त्यांचे निधन झाले.
मराठीमध्ये प्रणव सखदेव यांनी केलेला ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ (२०२१), आणि केशव सद्रे यांचा ‘वन हन्ड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ (२०२१) हे अनुवाद मार्केझ यांच्या साहित्यकृतींचे प्रकाशित आहेत. तसेच सुनील तांबे यांचा ‘मार्खेजची गोष्ट’ (२०००) हा ग्रंथ प्रकाशित आहे. प्रस्तुत नोंदलेखिकेने मार्केझ यांच्या काही कथांचे अनुवाद केले असून त्या ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमास्किातून प्रकाशित झाल्या आहेत.
संदर्भ :
- Gabriel García Márquez. Biografía – https://www.cervantes.es/bibliotecas_documentacion_espanol/creadores/garcia_marquez_gabriel.htm
- Más allá del Nobel: los otros premios y reconocimientos de García Márquez – https://centrogabo.org/gabo/contemos-gabo/mas-alla-del-nobel-los-otros-premios-y-reconocimientos-de-garcia-marquez
- Philip Swanson, The Cambridge Companion to Gabriel García Márquez, Cambridge University Press, 2010.
- The Solitude of Latin America, Nobel Prize Lecture –https://www.nobelprize.org/prizes/literature/1982/marquez/lecture/
समीक्षक : अनुराधा गोरे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.