तमिळनाडूतील एक प्रसिद्ध मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. तसेच जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असलेले दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे बंदर आणि व्यापारी केंद्र. पल्लव वंशातील पहिला नरसिंहवर्मा याच्या महामल्ल वा मामल्ल या बिरुदावरून हे स्थळ मामल्लपुरम या नावानेही प्रसिद्ध आहे. पल्लव कलेसाठी प्रसिद्ध असणारे हे स्थळ चेन्नईच्या दक्षिणेस साठ किमी. अंतरावर आहे. प्राचीन साहित्यातील वर्णनांवरून असे दिसते की, इसवी सनाच्या प्रारंभिक शतकापासून बंदर म्हणून महाबलीपुरम भरभराटीला आलेले होते व तेथून जगभर, विशेषतः चीन व आग्नेय आशियाई देशांशी व्यापार चालत असे. याचे महत्त्व पल्लव राजवटीच्या काळापर्यंत (सातवे ते नववे शतक) अबाधित होते. पहिला महेंद्रवर्मन (कार. ६००-६३०) व पहिला नरसिंहवर्मन (कार. ६३०-६६८) या पल्लव राजांनी कांचीपुरम व महाबलीपुरम येथे अनेक मंदिरे निर्माण केली.

समुद्रात बुडलेल्या दगडी पायऱ्या, महाबलीपुरम.

महाबलीपुरमला जागतिक वारसा स्थळाचा भाग असलेली पल्लव कलाशैलीची चाळीस मंदिरे आहेत. त्यांत  एकपाषाणी रथ मंदिरे, खडकांमध्ये कोरलेली अनेक कोरीव मंदिरे व किनाऱ्यावरची बांधीव मंदिरे यांचा समावेश आहे. पंचरथ मंदिरे म्हणून ओळखली जाणारी एकपाषाणी मंदिरे रथांच्या आकारात असल्याने त्यांना रथ मंदिरे असे म्हटले जाते. किनाऱ्यावरील शोअर टेम्पल (Shore temple) या नावाने प्रसिद्ध असलेला तीन मंदिरांचा समूह हा जागतिक वारसा स्थळाचा भाग आहे. ही मंदिरे पल्लव राजा दुसरा महेंद्रवर्मन (कार. ७००-७२८) याने बांधली. यूरोपीय प्रवाशांनी या मंदिरांमुळे महाबलीपुरमचा उल्लेख ‘सात पॅगोडांचे शहरʼ असा केला आहे. पूर्वी अशी सात मंदिरे होती; परंतु आता त्यातील एकच शिल्लक असून उरलेली समुद्रात बुडली असावीत, असे म्हटले जाते.

सुनामीमुळे उघडे पडलेले सिंहाचे शिल्प, महाबलीपुरम.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या सागरी पुरातत्त्व शाखेने महाबलीपुरमच्या किनारी भागात जमिनीवर आणि पाण्यात सर्वेक्षण केले (२००१). उपग्रह प्रतिमा आणि क्षेत्रीय अभ्यासात शोअर टेम्पलच्या दक्षिणेला एक ३५ मी. रुंदीचा गाळाने भरलेला जुना प्रवाह आढळला. मंदिराच्या पूर्वेला समुद्रात बुडलेले अनेक खडक आहेत. तेथे बुडलेल्या मंदिरांचा शोध घेण्यात आला; परंतु उसळत्या लाटा आणि गढूळ पाण्यामुळे खडकांपर्यंत जाऊन निरीक्षणे नोंदवता आली नाहीत. २००२ व २००४ मध्ये भारतीय नौदलाच्या पाणबुड्यांच्या मदतीने मंदिराच्या उत्तरेला शोधकार्य करण्यात आले. समुद्रात ५०० ते ७०० मी. आत जाऊन ५ ते ८ मी. खोलीपर्यंतच्या सागरतळाचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात पाण्याखाली १५ ते २० मी. लांब भिंती, चौकोनी घडीव शिळा, दगडी पायऱ्या आणि मंदिर रचनेतील घटक विखुरलेल्या अवस्थेत आढळले. तसेच डिसेंबर २००४ मधील सुनामीमुळे मंदिरांचे अनेक घटक उघडे पडले होते. त्यात दोन मी. उंचीच्या सिंहांच्या शिल्पांचा समावेश होता. दगडी सिंह बहुधा महाबलीपुरमचे द्वारपाल होते. २००५ मध्ये एक २ मी. उंचीची ७० मी. लांब दगडी भिंत आढळून आली. या अवशेषांवरून हे स्पष्ट झाले की, महाबलीपुरमला किनारी भागात काही मंदिरे अथवा बांधकामे बुडलेली आहेत; तथापि ती कोणती व कोणत्या काळात ती बुडली याचा निर्णय होऊ शकला नाही.

संदर्भ :

  • Sundaresh; Gau, A. S.; Tripati, Sila & Vora, K. H. ‘Underwater investigations off Mahabalipuram, Tamil Nadu, Indiaʼ, Current Science, 86(9) : 1242-1247, 2004.
  • Tripathi, Alok, Marine Archaeology: Recent Advances, Agam Kala Prakashan, Delhi, 2005.
  • Tripati, Sila, ‘An Overview of Maritime Archaeological Studies in Indiaʼ, Maritime Contacts of the Past, pp. 729-765, G.B. Books, Delhi, 2015.

                                                                                                                                                                                        समीक्षक : शंतनू वैद्य