उत्तर अमेरिका खंडाच्या आग्नेय भागातील आखात. मेक्सिकोचे आखात हा महासागरी द्रोणीचा एक भाग असून तो अटलांटिक महासागराचा सीमावर्ती समुद्र आहे. हे आखात बहुतेक सर्व बाजूंनी उत्तर अमेरिका खंडाने वेढले आहे. त्याच्या वायव्येस, उत्तरेस व ईशान्येस अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा किनारवर्ती भूप्रदेश असून पश्चिमेस, दक्षिणेस आणि आग्नेयीस मेक्सिको या देशांचा पूर्व किनारा आहे. आखाताच्या आग्नेय मुखाशी क्यूबा हा देश आहे. या आखातावरील संयुक्त संस्थानांच्या किनाऱ्याची एकूण लांबी सुमारी २,७०० किमी., तर मेक्सिकोच्या किनाऱ्याची लांबी सुमारे २,८०५ किमी. आहे. आखाताचा आकार साधारणपणे लंबवर्तुळाकार आहे. त्याचा पूर्व-पश्चिम कमाल विस्तार सुमारे १,८०० किमी. आणि उत्तर-दक्षिण विस्तार सुमारे १,३०० किमी. असून क्षेत्रफळ सुमारे १५,५०,००० चौ. किमी. आहे. संपूर्ण आखातात सुमारे २५ लाख घन किमी. इतका पाण्याचा साठा आहे. हे आखात मेक्सिको, बेलीझ व ग्वातेमाला या देशांचा भाग असलेले यूकातान द्वीपकल्प आणि क्यूबा बेट यांदरम्यान असणाऱ्या यूकातान चॅनेलने (खाडीने) कॅरिबियन समुद्राशी, तर अ. सं. सं. चे फ्लॉरिडा द्वीपकल्प आणि क्यूबा बेट यांदरम्यान असणाऱ्या फ्लॉरिडा सामुद्रधुनीने अटलांटिक महासागराशी जोडले गेले आहे. यूकातान चॅनेल आणि फ्लॉरिडा सामुद्रधुनी या दोन्हींची रुंदी साधारण १६० किमी. आहे.
संयुक्त संस्थानांच्या एकूण ३१ राज्यांमधून वाहत येणाऱ्या ३३ नद्यांनी वाहून आणलेले पाणी व गाळ मेक्सिकोच्या आखाताला येऊन मिळतो. मिसिसिपी, रीओ ग्रांदे यांसारख्या मोठ्या नद्या आखाताच्या उत्तर भागात, तर ग्रीहाल्वा, ऊसमसिंता यांसारख्या नद्या आखाताच्या दक्षिण भागात येऊन मिळतात. आखाताच्या किनाऱ्यावर अनेक लहान मोठे उपसागर, आखाते, लहानलहान खाड्या आणि लांब व अरुंद बेटांच्या रांगा आढळतात. आखाताच्या किनाऱ्यालगतचा प्रदेश सखल असून अनेक दलदलीचे प्रदेश व वालुकामय पुळणींनी व्यापलेला आहे.
आखातातील हवामान उष्ण ते समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे आहे. बहुतेक दरवर्षी प्रामुख्याने जून ते नोव्हेंबर या कालावधीत हरिकेन व इतर उष्ण कटिबंधीय हानीकारक चक्रीवादळांचा तडाखा या आखाती प्रदेशाला बसतो. ऋतुनुसार आणि स्थानपरत्वे आखातातील पाण्याच्या तापमानात तफावत आढळते. भरती-ओहोटीच्या कक्षेत येथे फारच कमी फरक असतो. आखाताच्या आग्नेय भागात नदीप्रमाणे सागरी प्रवाह वाहत असून उत्तर अटलांटिक महासागरातील गल्फ प्रवाहाचा तो प्रमुख स्रोत आहे. या गल्फ प्रवाहाचे पाणी यूकातान चॅनेलमधून आत येऊन, घड्याळकाटे दिशेला अनुसरून वाहत जाऊन फ्लॉरिडा सामुद्रधुनीतून बाहेर पडते. या मुख्य प्रवाहापासून तुटलेले काही वेटोळेयुक्त प्रवाह आखाताच्या उत्तर आणि ईशान्य भागात आढळतात; परंतु त्यांच्या दिशा आणि वेगात वार्षिक तसेच ऋतुनुसार फरक आढळतो.
भूशास्त्रज्ञांच्या मते, मेक्सिकोच्या आखाताची निर्मिती ट्रायासिक युगाच्या उत्तरार्धात सुमारे २५ कोटी वर्षांपूर्वी पॅन्जीया महाखंडाचे विखंडन होऊन झाली असावी. मेक्सिकोचे आखात भूभ्रंशमूलक क्रियेच्या दृष्टीने निष्क्रिय किनाऱ्याचे उत्तम उदाहरण आहे. या आखाताचे अनेक परिस्थितीकीय आणि भूशास्त्रीय विभाग आहेत. त्यांमध्ये किनारी क्षेत्रविभाग, सागरमग्न खंडभूमी (भूखंड मंच), खंडान्त उतार, खंडीय उंचवटा व अगाधीय सागरी मैदान हे प्रमुख आहेत. किनारी क्षेत्रविभागात भरती-ओहोटीमुळे निर्माण झालेले अनेक दलदलीचे प्रदेश, वालुकामय पुळणी, कच्छ वनश्रीखालील प्रदेश, अनेक उपसागर, नदीमुखखाड्या आणि खारकच्छ आढळतात. या आखातातील सुमारे ५० टक्के क्षेत्र सागरमग्न खंडभूमीने व्यापले आहे. सागरमग्न खंडभूमीच्या चबुतऱ्याचा विस्तार बराचसा सलग व अधिक रुंद असून फ्लॉरिडा आणि यूकातान यांच्या किनाऱ्यालगत तो सर्वाधिक आहे. या सागरमग्न खंडभूमीची कमाल व किमान रुंदी अनुक्रमे ३२० किमी. व ४० किमी. आहे. खंडान्त उतारानंतरच्या अगाधीय सागरी मैदानाची सर्वाधिक खोली ‘सिग्झ्बी डीप’ या गर्तेची (५,२०३ मी.) आहे.
मेक्सिको आखाताची सागरमग्न खंडभूमी खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्यांनी समृद्ध आहे. इ. स. १९४० च्या दशकापासून त्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. तेथून गंधकाचे उत्पादनही घेतले जाते. येथील कालव उत्पादनही मोठे असून त्यांचा उपयोग रसायन उद्योगांत आणि रस्ते बांधणीसाठी केला जातो. आखातातील वेगवेगळ्या खोलीवर ‘सैंधवी घुमट’ आढळतात. येथे मोठ्या प्रमाणावर व्यापारी मासेमारी केली जाते. किनाऱ्यावर वेगवेळ्या प्रकारचे सागरी पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात. किनाऱ्यालगत जहाजबांधणी, खनिज तेल रसायन, कागद निर्मिती, माहिती तंत्रज्ञान इत्यादी महत्त्वाचे उद्योग विकसित झाले आहेत.
या आखाताचा किनारी प्रदेश हे जगप्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे. प्रामुख्याने हिवाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. दुसऱ्या महायुद्धापासून येथील पर्यटन व्यवसाय विकसित झाला असून प्रादेशिक अर्थकारणाचा तो प्रमुख आधार ठरला आहे. विशेषत: येथील फ्लॉरिडा राज्य हे निवृत्त लोकांच्या आवडीचे मुख्य क्षेत्र ठरले असून येथे त्यांची वस्तीही जास्त आहे. किनाऱ्यावरील सुंदर पुळणी, क्रीडा, मासेमारी, नौकाविहार, जलतरण, स्कूबा डायव्हिंग (पाण्याखालील जलतरण) या येथे येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनाच्या प्रमुख बाबी आहेत.
संयुक्त संस्थानांच्या जनसांख्यिकीय आकृतिबंधात १९५० पासून बरेच बदल घडून आले. त्यानुसार या आखाती प्रदेशात प्रचंड संख्येने नव्याने लोक राहायला आले. वाढत्या लोकसंख्येमुळे येथे मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याची मागणी वाढली. वाहितमल आणि औद्योगिक अपशिष्टांत प्रचंड वाढ होऊन त्यांची विल्हेवाट प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या आखातात लावण्यात येऊ लागली. खनिज तेल विहिरींमधून सांडणारे तेल तेथील पाण्यात मिसळू लागले. संयुक्त संस्थाने आणि मेक्सिकोतील आधुनिक शेती व्यवसायात वापरण्यात येणारी खते, किटकनाशके, गवतनाशके इत्यादी हानिकारक रासायनिक द्रव्ये पाण्याबरोबर वाहत येऊन या आखातात मिसळल्यामुळे त्यातील पाण्याचे प्रदूषण वाढले. येथील कच्छ वनश्री व प्रवाळशैलभित्तिंचा ऱ्हास झाला. या प्रदेशात वाढलेली लोकसंख्या आणि उद्योग यांमुळे हे दुष्परिणाम झालेले आहेत.
क्रिस्तोफर कोलंबसाच्या इ. स. १४९२ मधील येथील सफरीनंतर मोठ्या संख्येने स्पॅनिश समन्वेषकांची वर्दळ या आखाती प्रदेशात वाढू लागली. हे समन्वेषक उत्तर अमेरिकेच्या अंतर्गत भागात जाऊ लागले. इटालियन दर्यावर्दी आमेरीगो व्हेस्पूची यांनी इ. स. १४९७ साली पहिल्यांदा मेक्सिकोच्या आखाताचा शोध लावला, असे मानले जाते; परंतु अनेक तज्ज्ञांमध्ये त्याबद्दल साशंकता आहे. इ. स. १६०० पर्यंत येथील प्रमुख प्राकृतिक भूविशेषांचा शोध लावला गेला. वसाहतकऱ्यांनी या आखाताच्या किनारी भागात नगरे, चांदीच्या खाणी, मिशनऱ्या यांची स्थापना केली. विसाव्या शतकापर्यंत या आखाताचा थोडाबहुत शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात आला; परंतु त्यानंतर हा प्रदेश एका नैसर्गिक प्रयोगशाळेसारखाच बनला. या संपूर्ण प्रदेशात विशेषत: टेक्सास, लुइझिअॅना, फ्लॉरिडा या राज्यांत अनेक सागर संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. येथील सागरमग्न खंडभूमीवर आढळलेल्या खनिज तेलाच्या साठ्यांमुळे भूभौतिकी व भूकंपविज्ञान तज्ज्ञांनी या सागरमग्न खंडभूमीच्या स्तररचनेचा विशेष अभ्यास केला. एवढा अभ्यास क्वचितच इतर सागरी प्रदेशाचा झाला असेल. या प्रदेशात वारंवार येणाऱ्या हरिकेन व इतर उष्ण कटिबंधीय वादळांमुळे हवामान तज्ज्ञांनीही येथील वातावरणाच्या अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
समीक्षक : वसंत चौधरी