मध्य यूरोपातील हंगेरी या देशातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आणि प्रसिद्ध पर्यटन केंद्र. हे सरोवर बूडापेस्टच्या नैर्ऋत्येस सुमारे ८० किमी., बॉकोन्य पर्वताच्या दक्षिण पायथ्याशी आहे. सरोवरची लांबी ७७ किमी., कमाल रुंदी १४ किमी., क्षेत्रफळ ५९८ चौ. किमी., सरासरी खोली सुमारे ३ मी. व कमाल खोली ११ मी. आहे. झाला नदीद्वारे सरोवराला सर्वाधिक पाणीपुरवठा होत असून त्याशिवाय लहानलहान ३० झरे सरोवराला येऊन मिळतात. या सरोवराच्या पूर्व भागातून बाहेर पडणारी आणि नियंत्रित स्वरूपात वाहणारी शिओ नदी हे सरोवराचे एकमेव निर्गमद्वार आहे. शिओ नदी पुढे डॅन्यूब नदीला जाऊन मिळते. या सरोवराला ‘हंगेरियन समुद्र’ असेही संबोधण्यात येते.
बॅलटॉन सरोवराचा तळ तुलनेने तरूण आहे. त्याची निर्मिती प्लाइस्टोसीन कालखंडात, साधारणपणे एक द. ल. वर्षांपूर्वीपेक्षा अलीकडच्या काळात झालेली आहे. मूलत: ही पाच सरोवरांची मालिका होती. उत्तर-दक्षिण पसरलेल्या कटकांमुळे ती विभागलेली होती; परंतु क्षरण कार्यामुळे त्या कटकांची झीज होऊन अखेरीस त्यांचे एकच सरोवर तयार झाले, तेच बॅलटॉन सरोवर होय. पूर्वीच्या सरोवरांचे अवशेष अद्यापही दिसून येतात. सांप्रत बॅलटॉन सरोवराच्या बाह्य स्वरूपावरूनही पूर्वी येथे वेगवेगळी सरोवरे असल्याची पुष्टी मिळते. या सरोवराच्या पूर्व भागात, तिहान्य हे द्वीपकल्प उत्तरेकडून सरोवरात घुसलेले दिसते. त्यामुळे तेथे सरोवराची रुंदी फक्त १.६ किमी. इतकी कमी झालेली आहे. हे द्वीपकल्प म्हणजेच पूर्वीच्या वेगवेगळ्या कटकांपैकी एका कटकाचा उर्वरित भाग आहे.
बॅलटॉन सरोवर व आसमंतातील हवामान खंडीय व भूमध्यसागरी हवामानसदृश्य असून मे ते ऑक्टोबरपर्यंत उबदार व सूर्यप्रकाशीय हवामान असते. सरोवरावरून वाहणाऱ्या नित्य वायव्य वाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या लाटांमुळे सरोवराच्या आग्नेय किनाऱ्याची झीज होते. हिवाळ्यात सरोवराच्या पृष्ठभागावर सुमारे २० सेंमी. इतक्या जाडीचा बर्फाचा थर निर्माण होतो. इतर मध्य यूरोपीय सरोवरांपेक्षा या सरोवरातील पाण्याचे रासायनिक संघटन वेगळे आढळते. यातील पाणी सल्फो-कार्बोनेट गुणधर्माचे आहे. सरोवराचा दक्षिण काठ अतिशय सुपीक आहे. तसेच वायव्य भागात ज्वालामुखी मृदा आढळत असून तो भाग द्राक्षमळ्यांसाठी आणि वाइन उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकात पर्यटन व्यवसायाची भरभराट झाल्यामुळे या प्रदेशातील शेतीचे महत्त्व काहीसे कमी झाले. सरोवराच्या परिसरात समृद्ध आणि चित्तवेधक वनस्पती, पक्षी व प्राणिजीवन आढळते. तिहान्य द्वीपकल्पावर वन्यजीव राखीव प्रदेश आहे. केस्तहेजवळ वेताची वने असून त्यांत दुर्मिळ पक्ष्यांची घरटी पाहायला मिळतात. सरोवरात विविध प्रकारचे मासे आहेत. त्यामध्ये विशेषत्वाने पर्च माशांचा समावेश आहे. या सरोवराच्या किनारी भागात लोह युगापासून वसाहत होती. रोमनांनी इ. स. दुसऱ्या शतकात केस्तहेच्या दक्षिणेस किल्ला बांधला होता. रोमन त्या वेळी या सरोवरास ‘पेल्सो’ असे संबोधत. तुर्क, जर्मन, स्लोव्हाक यांचेही वास्तव्य याच्या किनाऱ्यावर होते. वीसाव्या शतकाच्या सुरुवातीस बॅलटॉन हे हंगेरीच्या जीवशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, जलवैज्ञानिक आणि इतर शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे केंद्र बनले होते; ज्यामुळे बॅलटॉनच्या किनाऱ्यावर पहिली जैविक संशोधन संस्था स्थापन झाली (१९२७).
सरोवराचा उत्तर किनारा पर्वतीय असून तो ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आणि वाइन उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या येथे पर्यटन व्यवसाय भरभराटीस आला असून पर्यटक येथे जलतरण, हौशी मासेमारी व नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी येत असतात. किनारी भागात अनेक सुंदर रिसॉर्ट्स असून तेथे वाळू व रेतीच्या कृत्रिम पुळणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. प्रामुख्याने जून ते ऑगस्ट या कालावधीत येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. शिओफॉक, बॅलटॉनफ्युरेद, तिहान्य, केस्तहे, बॉडचोन्यटोमाज, बॅलटॉनकेनेसी, बॅलटॉनअल्मडी इत्यादी सरोवराच्या किनाऱ्यावरील प्रमुख शहरे व पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. सरोवराच्या परिसरात ‘बॅलटॉन अपलँड नॅशनल पार्क’ हे राष्ट्रीय उद्यान आहे.
समीक्षक : नामदेव स. गाडे