हॉल, स्टुअर्ट (Hall, Stuart) : (३ फेब्रुवारी १९३२ – १० फेब्रुवारी २०१४). प्रसिद्ध मार्क्सवादी समाजशास्त्रज्ञ, संस्कृती सिद्धान्तकार आणि राजकीय विश्लेशक. त्यांचा जन्म जमेकामधील किंगस्टन या शहरात एका महत्त्वाकांक्षी कुटुंबात झाला. त्यांचे वडील हर्मन हे जमेकामधील पहिले अश्वेत मुख्य लेखापाल होते, तर आई जेस्सी श्वेत वर्णीय असून त्या अतिशय प्रेरणादायी होत्या.

हॉल यांनी किंगस्टन येथील जमेका महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षण घेतले. नंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाची ऱ्होड शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे १९५१ मध्ये ते ब्रिटनला स्थलांतरित झाले. तेथे ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी विषयात एम. ए. केले. १९५६ मध्ये सोव्हिएट रशियाने हंगेरीवर आणि ब्रिटिश-फ्रांस-इझ्राएल या देशांनी संयुक्तपणे इजिप्तवर केलेल्या आक्रमणाचा परिणाम म्हणून ‘नव डाव्या’ चळवळीचा उदय झाला. त्यात हॉल प्रभावी होते. १९५८ मध्ये न्यू लेफ्ट रिव्ह्यूव या पत्रिकेचे ते संपादक झाले. राजकीय कामांमुळे त्यांना आपली पीएच. डी. मधूनच सोडावी लागली.

हॉल यांनी १९६४ मध्ये पॅडी व्हॅनल यांच्यासोबत लिहीलेल्या द पॉपुलर आर्ट्स या पुस्तकाने रिचर्ड होगार्ट हे प्रभावित होऊन त्यांनी १९६४ मध्ये हॉल यांना बर्मिंगहॅम विद्यापीठातील समकालीन संस्कृती अभ्यास केंद्रात काम करण्यास बोलाविले. याच वर्षी अण्वस्त्रबंदीच्या समर्थनार्थ लंडन येथे मोर्चा काढण्यात आला. तेव्हा हॉल यांची भेट प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ व प्राध्यापिका कॅथरिन बॅरेंट यांच्याशी झाली. नंतर त्यांचा विवाह झाला. १९६८ मध्ये हॉल त्या केंद्राचे संचालक झाले. १९७९ मध्ये ते मुक्त विद्यापीठात समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी मुक्त विद्यापीठाचे काम पाहिले. १९९५ – १९९७ या काळात ते ब्रिटिश समाजशास्त्र संस्थेचे अध्यक्ष राहिले. मार्क्सिझम टुडे आणि साउंडिंग : अ जर्नल ऑफ पॉलिटिक्स अँड कल्चर या नियतकालिकांशी त्यांचा जवळचा संबंध होता. कृष्णवर्णीय कला चळवळीचा (बी.ए.एम.) ते भाग होते. २००५ मध्ये त्यांना ब्रिटिश अकादमीचे सदस्य बनविण्यात आले.

हॉल यांना बहुसंस्कृतीवादाचा प्रणेता असे म्हणतात. संस्कृती अभ्यास ही ज्ञानशाखा होण्यामध्ये हॉल यांचा मोठा वाटा आहे. हॉल यांनी लिंगभाव आणि वंश या घटकांना संस्कृती आकलनाचे मुलभूत साधन बनविले. त्यामुळे संस्कृती अभ्यासाचे चर्चाविश्व लिंगभाव आणि वंश या दोन मुद्द्यांभोवती केंद्रित झाले. हॉल हे माध्यम सिद्धांतकार होते. रिसेप्शन सिद्धान्त, संभाषणाचे इनकोडींग व डीकोडींग मॉडेल ही त्यांची महत्त्वाची कामे आहेत. माध्यम हे संदेश निर्माण व संदेश प्रसारित कसा करते? संदेश ग्रहण कसे होते? यामध्ये प्रेक्षकांची भूमिका असते का? इत्यादींचे तपशीलवार विवेचन हॉल यांनी केले आहे. माध्यमांनी निर्माण व प्रसारित केलेल्या संदेशाला निश्चित अर्थ असतो. संपूर्ण संभाषण प्रक्रियेमध्ये अर्थबदल होत नाही. प्रेक्षकही अर्थबदल करू शकत नाहीत, असे संभाषण प्रक्रियेचे पारंपरिक आकलन हॉल यांनी नाकारले. त्यांच्या मते, विशिष्ट अर्थ असलेला संदेश बनविता येतो; परंतु अभिप्रेत असलेला अर्थच प्रेक्षकांपर्यंत पोहचेल आणि त्याच प्रकारचा अर्थबोध प्रेक्षकांना होईल, हे अशक्य आहे; कारण प्रेक्षक हा निष्क्रिय नसून तो सक्रिय प्राप्तकर्ता आहे. प्रेक्षक त्याच्या आकलन बिंदुंनुसार संदेशाची अर्थनिश्चिती करत असतो. त्यामुळे अर्थनिश्चिती फक्त माध्यमांकडून नाही, तर प्रेक्षकांकडूनही होते याचे अधोरेखन हॉल यांनी केले. याच सिद्धान्ताचे उपयोजन हॉल यांनी संस्कृती आणि विचारसारणीच्या पातळीवर करून सत्ता-संबंधांचे आकलन करून दिले. आजचे जग हे माध्यमांचे जग असून त्यांच्याकडून आपण सत्य समजून घेत असतो; पण ही माध्यमे पारदर्शक नाहीत, असे हॉल यांनी आपले मत व्यक्त केले आहे. माध्यमे ही वर्चस्ववादी विचारसरणीचे वाहक असतात. अशा माध्यमांना उघडे पाडणे, त्यांची चिकित्सा करणे हे माध्यम सिद्धान्तकारांचे काम आहे, असे हॉल यांचे मत आहे.

हॉल यांची समकालीन समीक्षा सिद्धान्तनामध्ये संस्कृती ओळख, समुदाय, वांशिकता, आफ्रिकन देशांतरित या विषयांवर प्रभावी मांडणी आहे. त्यांच्या मते, उच्चभ्रू लोकांची मान्यता मिळालेली अभिरुची म्हणजे संस्कृती नव्हे, तर आपण जे जगतो, ज्याचा अर्थ लावतो ती संस्कृती लोकांच्या अनुभवातून बनते. जमेकातून स्थलांतरित झालेले अश्वेत असे व्यक्तिनिष्ठ अनुभव पाठीशी असल्यामुळे हॉल यांना समुदाय, वंश यांचे बारकाईने आकालन करता आले. संरचनावादाचा उपयोग करून त्यांनी वंशवादाचे विश्लेषण केले आहे. वांशिकता ही भाषेसारखी असते, असे ते म्हणतात. भाषा हे जशी रचित आहे, तशी वांशिकता हीपण रचित आहे आणि कोणतेही रचित कायम नसते. वंशवाद किंवा पितृसत्तेविरोधात दिल्या जाणाऱ्या लढ्यांचे परिणाम काय असतील, हे कोणीच सांगू शकत नाही; परंतु लढा यशस्वी व्हावा यासाठीच आपण प्रयत्न करू शकतो, असे त्यांचे मत होत. कृष्णवर्णीय व्यक्तीनिष्ठतेला पुरस्कृत करून व्यक्तीनिष्ठतेचे मरण घोषित करणाऱ्या उत्तर आधुनिकवादावर ते टिका करताना म्हणतात की, उत्तर आधुनिकवादाने सर्व रचितांची विरचना करण्याची भूमिका घेतली; परंतु अजूनही जगात काही वंचित समुदाय आहेत, ज्यांनी आपले रचित घडविले नाही. मग त्यांना तो अधिकार आहे की, नाही हा हॉल यांचा प्रश्न होता. हॉल यांनी वंशवादाविरोधात नेहमीच आवाज उठविला आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात ते कृष्णवर्णीय कलाकारांना नेहमी प्रोत्साहन व मदत करत राहिले. १९८० च्या दशकात उभा राहणाऱ्या ब्रिटन मधील नवउदारमतवादी राजकारणाचा संदर्भ हॉल यांनी अचूक पकडला. मार्गारेट थॅचर निवडून येण्याच्या अगोदरच त्यांना थॅचरीझम संबोधून हॉल यांनी त्यांचे सटीक विश्लेषण केले.

हॉल हे कधीच अध्यापन क्षेत्रातील वैयक्तिक यशापाठीमागे धावले नाहीत. आपल्या विद्यार्थ्यांसोबत, सहकाऱ्यांसोबत सामुहिक लेखनकामात हॉल गर्क असायचे. त्यांचे विचार ऐकणाऱ्याला ते बोलण्यासाठी प्रवृत्त करत व त्यातून ते चर्चा पुढे नेत असत. ते एक लोकविचारवंत होते. हॉल यांचा साहित्य समीक्षा, चिन्हशास्त्र, मानवशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांना एकत्र करून संस्कृती अभ्यासाला आंतरविद्याशाखीय बनविण्यात मोठा हातभार आहे. आज जगभरातील अनेक विद्यापीठांत संस्कृतीबद्दल अभ्यास केला जातो. त्यात हॉल यांचे काम अभ्यासल्याशिवाय पुढे जाता येत नाही. संस्कृती व माध्यम सिद्धान्तकार, समाजशास्त्रज्ञ, लोकविचारवंत, राजकीय कार्यकर्ता अशा अनेक विषयांमध्ये हॉल यांचा गाढा अभ्यास होता.

हॉल यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले असून ते पुढील प्रमाणे : द पॉपुलर आर्ट्स (१९६४), रेसिस्टन्स थ्रू रिच्युअल्स (१९७५), कल्चर, मिडिया, लँग्वेज (१९८०), पॉलिटिक्स अँड आयडीयालॉजी (१९८६), द हार्ड रोड टू रीनेव्हल (१९८८) न्यू टाईम्स (१९८९), क्रिटीकल डायलॉग इन कल्चरल स्टडीज (१९९६), डिफरंट : अ हिस्टोरीकल काँटेक्स, कंटेम्पररी फोटोग्राफर्स अँड ब्लॅक आयडेंटिटी (२००१), फेमिलीयर स्ट्रेंजर : अ लाईफ बिटविन टू आइसलँड (२०१७ – मरणोत्तर प्रकाशित) इत्यादी. तसेच इनकोडींग अँड डिकोडीग इन द टेलिवीजन डिसकोर्स (१९७३), कल्चरल स्टडीज अँड इट्स थेरोटीकल लिगसीज (१९९२), कल्चरल आयडेंटीटी अँड डायस्पोरा (१९९६), इत्यादी निबंधांतून त्यांच्या सखोल बौद्धिक कामाची व विचारांची ओळख होते.

हॉल यांचे निधन मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे लंडन येथे झाले.

संदर्भ :

  • Fisher, Jean, Stuart Hall : The Artist who inspire Britain’s black intellectuals, London, 2014.
  • Morley, David; Bill, Schwarz, Stuart Hall Obituary, London, 2014.
  • Turner, Graeme, British Cultural Studies, New York, 1990.

समीक्षक : वैशाली दिवाकर