सागरकिनाऱ्याला लागून असणारा उथळ सागरतळ म्हणजे सागरमग्न खंडभूमी होय. खंड-फळी व भूखंड मंच या पर्यायी संज्ञाही सदर भूविशेषासाठी वापरल्या जातात. बहुतेक खंडांच्या किनाऱ्याशी सागरमग्न खंडभूमी आढळतात. जगातील महासागरांनी व्यापलेल्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे ८ टक्के क्षेत्र सागरमग्न खंडभूमींनी व्यापलेले आहे. सागरी पाण्याखालील रुंद सापेक्षत: उथळ जागी असलेला हा मंच (चबुतरा) खंडाची सीमा (काठ) दर्शवितो. नमुनेदार सागरमग्न खंडभूमी किनाऱ्यापासून १०० ते २०० मी. खोलीपर्यंत विस्तारलेली असते. बहुतेक बाबतीत सागरमग्न खंडभूमीची समुद्राकडील बाजू अचानक खाली उतरत गेलेली आढळते. त्याच्याखाली खंडान्त उतार असून हा पुष्कळच अधिक तीव्र उताराचा भाग असतो आणि तो खंडीय उंचवटा या समुद्रतळाच्या विभागात विलीन होतो. खंडीय उंचवटा सुमारे ४,००० ते ५,००० मी. खोलीवर असतो. सागरमग्न खंडभूमी, खंडान्त उतार व खंडीय उंचवटा या समुद्रात बुडालेल्या खंडीय राशींना एकत्रितपणे खंडीय सीमाक्षेत्र म्हणतात.
सागरमग्न खंडभूमीची रुंदी अगदी वेगवेगळी असते; मात्र सरासरी रुंदी सुमारे ६५ किमी. असते. जवळजवळ सर्वत्र सागरमग्न खंडभूमी महासागराच्या सीमाक्षेत्राखालील खंडाच्या राशीचा केवळ अखंड भाग दर्शविते. यानुसार डोंगराळ किनाऱ्यासमोरील सागरमग्न खंडभूमी या अरुंद, खडबडीत व तीव्र उताराच्या असतात; तर सपाट मैदानी प्रदेशासमोर त्या रुंद व तुलनात्मक दृष्ट्या सपाट असतात. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या डोंगराळ पश्चिम किनाऱ्याला अनुसरून असलेली सागरमग्न खंडभूमी सुमारे ३२ किमी. इतकी अरुंद आहे; तर पूर्व किनाऱ्यावरील झालरीसारखी असलेली सागरमग्न खंडभूमी १२० किमी.हून अधिक रुंदीची आहे. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील व अर्जेंटिनाच्या समुद्र किनाऱ्यासमोरील सागरमग्न खंडभूमी अपेक्षेपेक्षा जास्त रुंद आहेत. जगातील सर्वांत मोठ्या सागरमग्न खंडभूमीचा विस्तार सायबीरियाच्या किनाऱ्यापासून आर्क्टिक महासागरात १,५०० किमी. पर्यंत झालेला आढळतो.
सागरमग्न खंडभूमीवर बहुधा वाळू, गाळवट व गाळयुक्त चिखल यांचे आच्छादन असते. त्यांच्या पृष्ठभागी लहान टेकड्या व कटक असून त्यांच्या दरम्यान उथळ खळगे व दरीसारखे गर्त (लहान द्रोणी) असतात. काही थोड्या सागरमग्न खंडभूमींच्या बाबतीत तीव्र उताराच्या भिंतीच्या व्ही (V) आकाराच्या निदऱ्या पाण्याखाली असतात. त्याखालील सागरमग्न खंडभूमी व खंडान्त उतार यांत खोलवर कापत गेलेल्या दिसतात.
१९७० च्या दशकापासून सागरमग्न खंडभूमी व तिची संरचना यांसंबंधीचे संशोधन करणारे जास्तीतजास्त संशोधक सागरमग्न खंडभूमीसंबंधीचे विश्लेषण भूपट्ट सांरचनिकी सिद्धांताच्या भाषेत देऊ लागले आहेत. उदा., पॅसिफिक महासागरातील सागरमग्न खंडभूमी या सिद्धांतानुसार तयार झाल्याचे आठळते. शिलावरणीय भूपट्टांवरील खंडीय सीमाक्षेत्राच्या पुढील बाजू (वा कडा) जेथे संपतात, तेथे म्हणजे जेथे दोन भूपट्ट एकमेकांशी घसटून जातात त्या भंजन क्षेत्रविभागांपाशी किंवा जेथे एकमेकांवर आपटणाऱ्या दोन भूपट्टांपैकी एक भूपट्ट खालील अंशत: वितळलेल्या दुर्बलावरणात बुडविला जातो (निमज्जित होतो) व ज्याचा व्यय होतो आणि वरील भूपट्ट वर उचलला जातो, त्या अधोगमन क्षेत्रविभागांपाशी सागरमग्न खंडभूमी निर्माण होतात. अशा प्रकारे निर्माण झालेल्या सागरमग्न खंडभूमी तीव्र उतार असलेल्या व विरूपण झालेल्या आणि झिजेमधून निर्माण झालेल्या डबरीचा पातळ थर वर असलेल्या अशा असतात. उलट अटलांटिकमधील सागरमग्न खंडभूमी थोडेच भूसांरचनिक विरूपण झाल्याचे दर्शवितात वा तेथे विरूपण नसतेही. त्यांच्यावर अवसादी द्रव्यांचे जाड पृष्ठावरण असते. या सागरमग्न खंडभूमी हे मोठ्या भूपट्टांच्या मागून ओढत गेलेल्या कडांचे अवशेष असल्याचे मानतात. हे भूपट्ट अनेक दशलक्ष वर्षांपूर्वी या कडा दुभंगल्या जाऊन दूर सरकत जाऊन अटलांटिक महासागराची द्रोणी निर्माण झाली. भूपट्टांच्या कडा सावकाशपणे संकोच पावत गेल्या व स्थिर झाल्या. त्यांच्या समुद्राकडील बाजूवर खंडाकडून आलेली वाळू, गाळवट व चिखल मोठ्या प्रमाणात तेथे गोळा होऊन साचत गेला.
सागरमग्न खंडभूमी उथळ असल्याने तेथे सूर्यकिरणे तळापर्यंत पोहोचतात. त्यामुळे सागरमग्न खंडभूमीवर शैवाल, वनस्पति-प्लवक (प्लँक्टन), प्राणि-प्लवक व इतर सागरी वनस्पतींची वाढ चांगली होते. प्लवक हे माशांचे उत्तम खाद्य असल्याने तेथे माशांची पैदास चांगली होते. मासे मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे सागरमग्न खंडभूमीचे प्रदेश मासेमारी व्यवसायाच्या दृष्टीने आदर्श ठरतात. जगातील प्रसिद्ध मत्स्यक्षेत्रे (बँक्स) सागरमग्न खंडभूमीवरच आढळतात. उदा., वायव्य अटलांटिक महासागरातील ग्रँड बँक मत्स्यक्षेत्र व ईशान्य अटलांटिकच्या उत्तर समुद्रातील डॉगरबँक मत्स्यक्षेत्र. जगातील अनेक सागरमग्न खंडभूमींवर खनिज तेल व नैसर्गिक वायूचे आणि इतर खनिजांचे साठे सापडले आहेत. उदा., मुंबईजवळच्या अरबी समुद्रातील ‘मुंबई हाय’.
समीक्षक : वसंत चौधरी