कैरो येथे १९९४ मध्ये लोकसंख्या आणि विकास यासंदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमधील शिफारशींनुसार बहुप्रावस्था (Multiphase) प्रजनन व बाल आरोग्य या कार्यक्रमामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रम समाविष्ट करावयाचे ठरले. गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची विशेष काळजी घेऊन त्यांना सुरक्षित मातृत्व व बाल जीवित्वाची हमी प्रदान करणे ही यामागील प्रमुख संकल्पना आहे. तसेच, विवाहित जोडप्यास नको असलेले गरोदरपण व लैंगिक आजारांच्या भीतीपासून मुक्त लैंगिक जीवन जगता यावे हा प्रजनन व बाल आरोग्य सेवांचा मुख्य हेतू आहे. अशा सेवांद्वारे नको असलेले गरोदरपण सुरक्षित पणे टाळणे, उत्तम प्रतीच्या आरोग्य सेवा देऊन प्रजनन विषयी आरोग्य शिक्षण देणे, लोकसंख्या वाढ नियंत्रणाचे कार्यक्रम राबविण, लहान बालके व मुलांचे आरोग्य संवर्धन करणे इ. उद्देश साध्य होतात.

परिचारिकेची भूमिका :

  • माता संबंधित कार्ये :

प्रसूती पूर्व काळजी (Antenatal Care) : गरोदर स्त्रीची नाव नोंदणी केल्यानंतर तिच्या कुटुंबाविषयीची, सध्याच्या गरोदरपणाची, आधीचे अपत्य असल्यास त्यावेळच्या गरोदरपणाविषयीची तसेच इतर आजारासंबंधीची सखोल माहिती घ्यावी. रक्त-लघवीची तपासणी करून गरोदरपणातील इतर सर्वसाधारण शारीरिक तपासण्या कराव्यात व त्याआधारे अंदाजे प्रसूतीची महिना, तारीख व गरोदरपणात काही जोखीम असल्यास गरोदर माता व कुटुंबियांना पूर्वकल्पना द्यावी. योग्य सल्ला व मार्गदर्शन देऊन प्रसूतीच्या नियोजनात मदत करावी.

स्वाभाविक प्रसूती दरम्यान काळजी (Intranatal care) : १) प्रसूतीकरिताची जागा व सर्व  साहित्य निर्जंतुक करून घ्यावे, २) गरोदर मातेची तपासणी करून गर्भ स्थिती, गर्भ हृदयाचे ठोके (F.H.S.), ग्रीवा मुख (dilatation of cervix), प्रसव वेदनेची तीव्रता, गरोदर मातेच्या मूत्राशयाची स्थिती इत्यादी बाबत निरीक्षणे करून नोंदी ठेवाव्यात, ३) मातेची सर्व साधारण स्थिती, प्रसव वेदनांतील प्रगती व पटल फुटल्याची वेळ (Membrane sack Rupture time) नोंद करावी, ४) अस्वाभाविक प्रसूती बाबतची निरीक्षणे व नोंदी करून डॉक्टरांना कळवावे व तात्काळ संदर्भ सेवा पुरवावी, ५) स्वाभाविक प्रसूतीची खात्री होताच बाळाच्या नाळेची (cord ) तपासणी / नाळेचे ठोके तपासावेत, ६) बाळाच्या जन्माची अचूक वेळ नोंदवावी. प्रसुतीच्या संपूर्ण प्रक्रियेत निर्जंतुकता पाळणे अनिवार्य असते.

स्वाभाविक प्रसूतीपश्चात काळजी : (Post Natal Care) : १) प्रसूतीनंतर मातेचा ताप, नाडी, श्वसन, रक्तदाब तपासून त्यांच्या नोंदी ठेवाव्यात; २) प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव, त्याचे प्रमाण, ओटी पोटातील वेदनांचे प्रमाण, मलमूत्र उत्सर्जन याविषयी निरीक्षण व नोंदी ठेवाव्यात; ३) मातेच्या गर्भाशयाची उभी उंची मोजावी (Fundal Height), योनी मार्गातून होणाऱ्या स्रावाचा रंग, वास आणि प्रमाण यावर लक्ष ठेवावे; ४) प्रसूतीदरम्यान जर विटप किंवा परिगुह्य यावर छेद घेतलेला असेल (Perineal Episiotomy) तर त्या जागी घातलेले टाके व सभोवताली येणारी सूज याचे निरीक्षण करावे आणि निर्जंतुक पट्टी /पॅडचा वापर करण्यास सांगावे.

स्वाभाविक APGAR गुणांक हा १ ते १० मध्ये मोजतात. तसेच ७,८,९ हा चांगला स्कोर समजला जातो

नवजात बालकाची काळजी (Neo Natal Care) :  १) बाळ जन्मल्यानंतर लगेचच त्याच्या श्वसनाचे निरीक्षण करावे, आवश्यकतेनुसार उपाययोजना कराव्यात, उदा., बाळाच्या घशात प्रसूतीदरम्यान साचलेला द्रव स्वच्छ करणे (Mouth Suction); २) बाळाची नाळ योग्य पद्धतीने कापून मातेच्या वारेपासून (Placenta) अलग करणे. निर्जंतुक धाग्याने बांधून रक्तस्राव होणार नसल्याची खात्री करावी; ३) नवजात बालकात सर्व अवयवांचे निरिक्षण करून कोणत्याही अवयवात अस्वाभाविकता नसल्याची खात्री करून तसे नातेवाईकांना कळवावे; ४) बाळाच्या जन्मानंतर ५ मिनिटात APGAR गुणांक (Score) मोजतात. (पहा : तक्ता); ५) रुग्णालयाच्या धोरणान्वये नवजात बालकाला अंघोळ घालावी (यात दुमत आहे). परंतु बाळाचे डोळे, कान आणि त्वचा यांची स्वच्छता करून बाळाला उबदार कापडात/दुपट्यात गुंडाळून ठेवावे; ६) मातेची स्थिती स्वाभाविक असल्यास बाळाला आईच्या कुशीत द्यावे आणि लवकरात लवकर म्हणजेच जन्मानंतर अर्ध्या तासात आईने बाळास स्तनपान देण्यास सुरुवात करण्यासाठी प्रेरित करावे. ज्यामुळे प्रसूतीनंतर प्रथम येणाऱ्या मातेच्या दुधातून (चिकाचे दुध/Colostrum) मिळणारे रोग प्रतिकारक सत्त्व बाळास मिळते व त्याची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते; ७) नवजात बालकास लघवी आणि शौचास झाले किंवा नाही याचे निरीक्षण करून तशी नोंद ठेवावी; ८) बाळाचे शारीरिक तपमान उबदार राखणे, दर चार–चार तासांनी स्तनपान करणे, बाळाला जंतू संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:ची आणि बाळाची स्वच्छता काटेकोरपणे पाळणे, बाळाच्या लसीकरणाचे डोस (नवजात शिशु लसीकरणाखेरीज) वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करणे, प्रसूती पश्चात आरोग्य तपासणीसाठी आरोग्य केंद्राची भेट निश्चित करणे, गरजेनुसार कुटुंब नियोजनासाठी तात्पुरती किंवा कायम स्वरूपी पद्धतीचा अवलंब करण्याची प्रेरणा देणे किंवा त्यासाठी साहाय्य करणे इत्यादी बाबींविषयी मातेला आरोग्य शिक्षण देण्याचे नियोजन करावे.

परिचारिकेची व्यवस्थापकीय जबाबदारी :

  • प्रसूती पूर्व, प्रसूती दरम्यान, प्रसूती पश्चात आणि नवजात बालकास पुरविल्या जाणाऱ्या सर्व आरोग्यसेवांचे नियोजन करणे. ज्यामुळे माता व बालकांमधील आजार आणि मृत्यूचे प्रमाण कमी होईल.
  • गरोदर मातेस सुरक्षित प्रसूतीसाठी रुग्णालयात पाठविताना संदर्भसेवा अधिकारी म्हणून काम बघणे व सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होणे.
  • सोबत कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेविका, प्रशिक्षित दायी यांच्या कामाचे पर्यवेक्षण करणे.
  • माता बाल संगोपन केंद्रे (MCH Clinic), पाच वर्षांखालील वयोगटातील मुलांचे आरोग्य केंद्र (Under Five Clinic ) आणि कुटुंब नियोजन सेवा (Family Planning Center) यांचे आयोजन व व्यवस्थापन करणे. तसेच यांविषयी नोंदी लिहिणे, साठवून ठेवणे आणि अहवालासाठी पुढे पाठविणे.
  • रुग्ण, कुटुंब, समाज आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात समन्वयकाची भूमिका पार पाडणे .

परिचारिकेची आरोग्य शैक्षणिक कार्ये :      

  • दायी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे
  • माता व त्यांच्या कुटुंबामधील व्यक्तींना आरोग्य शिक्षण देणे.
  • गरोदर मातांना माता व बाल आरोग्य सेवाविषयी माहिती देणे.
  • गरोदर मातांना गरोदरपणातील नियमित तपासणी, झोप, विश्रांती, व्यायाम, योग्य व पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, रोगप्रतिबंधासाठी घर व परिसराची स्वच्छता, प्रशिक्षित व्यक्तीकडून रुग्णालयात प्रसूती करून घेण्याचे महत्त्व, नवजात बालकाची काळजी इत्यादींसंदर्भातील माहिती पुरविणे.

सारांश : प्रजनन व बाल आरोग्याची संकल्पना लक्षात घेता प्रावस्था-१ (१९९७) आणि प्रावस्था-२ (२००५) यात तरुण स्त्रियांची व बालकांची आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी कुटुंब कल्याण कार्यक्रम, सार्वत्रिक लसीकरण, तोंडी पुनर्जलीकरण उपचार पध्दती (Oral Rehydration Therapy), बालकांच्या जीवित्वाची हमी, तीव्र श्वसनदाहावरील नियंत्रण (Acute Respiratory Infection control), सुरक्षित मातृत्व कार्यक्रम या सर्वांचे एकत्रीकरण प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत केलेले आहे.

संदर्भ :

  • Park, K., Preventive and Social Medicine, 2018.
  • मोमीन, सफिया सिराज, सामाजिक आरोग्य व परिचर्या, २०१५.