जगातील तीन प्रमुख महासागरांपैकी हिंदी महासागराला नद्यांद्वारे होणाऱ्या गाळाच्या पुरवठ्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापैकी जवळजवळ निम्मा गाळ एकट्या भारतीय उपखंडातील नद्यांद्वारे आणून टाकला जातो. या भूजन्य गाळाचे संचयन प्रामुख्याने हिंदी महसागरातील सागरमग्न खंडभूमी, खंडान्त उतारखंडीय उंचवटा येथे होत असून पुढे हा अवसादी प्रदेश अगाधीय सागरी मैदानात विलीन झालेला दिसतो. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात, तसेच सोमाली व मोझँबिकचा द्रोणीप्रदेश या भागांत अशा अवसादी शंकूंची जाडी किमान १.६ किमी. आढळते. ऑस्ट्रेलियाच्या वायव्येस ह्वॉर्टन द्रोणी प्रदेशात सर्वांत जुना गाळ आढळतो. गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखासमोरील अवसादी शंकू ११ किमी. पेक्षा अधिक जाडीचा असून त्याचा विस्तार १०° दक्षिण अक्षवृत्तापर्यंत आढळतो. अवसादाचे अल्प प्रमाण दक्षिण सूंदा बेटांच्या किनाऱ्यावर आढळते. कदाचित जावा खंदकाचा अवसादाच्या वहनात अडथळा येत असावा. तेथे अवसादाऐवजी सिलिकायुक्त ज्वालामुखी राख आढळते. तपकिरी आणि लाल चिकणमातीयुक्त अवसादाचे आधिक्य १०° उ. ते ४०° द. अक्षवृत्तांच्या दरम्यान, परंतु बेटे आणि खंडांच्या किनाऱ्यापासून दूर असलेल्या खोल सागरी भागात आढळते. येथील थरांची जाडी सुमारे ३०० मी. आहे. विषुववृत्तीय पट्टा सर्वाधिक महासागरी उत्पादकतेचा असून तेथे कॅल्शियम व सिलिकायुक्त जीवपंक मोठ्या प्रमाणात आढळतात. दक्षिणेस ५०° द. अक्षवृत्ताच्या दरम्यान असलेल्या अंटार्क्टिक अभिसारण या संक्रमण पट्ट्यात दुसरा उच्च उत्पादकतेचा प्रदेश आहे. या प्रदेशात डायाटोमीय शैवल जीवपंक आढळतात. महासागरीय कटकांच्या माथ्यावरील सुमारे ७२ किमी. रुंदीच्या भागात अवसाद आढळत नाहीत; पण त्यांच्या उतारांवर अवसादाचे अल्प प्रमाण आढळते. सागरतळावर निर्मितिप्रक्रियेतील वेगवेगळ्या टप्प्यांवरील बेसाल्ट खडक तसेच विविध खनिजे आढळतात. सुमारे ४० ते  ४०० मी. खोलीच्या दरम्यान फॉस्फोराइटाचे थर, १,००० ते २,५०० मी. दरम्यान लोह-मँगॅनिजाचे थर, ३,००० मी. पेक्षा अधिक खोलीच्या भागांत गाठाळ लोह-मँगॅनिजाचे थर, तर कार्ल्स्बर्ग आणि मध्यस्थ भारतीय पर्वतरांगेच्या माथ्याच्या भागात जलतापीय धातुयुक्त अवसाद आढळतात.

समीक्षक : संतोष ग्या. गेडाम