आगरवाला, ज्योतिप्रसाद : (१७ जून १९०३–१७ जानेवारी १९५१). एक असमिया नाटककार, कवी व संगीतकार. असमिया साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या आगरवाला घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या घराण्यातील हरिबिलास, चंद्रकुमार व आनंदचंद्र ह्या व्यक्ती नावाजलेल्या साहित्यिक होत्या आणि त्यांचाच साहित्यिक वारसा ज्योतिप्रसादांनी पुढे चालविला. ते आयुष्यभर क्रांतिकारक देशभक्त म्हणून वावरले. १९३० पासून स्वातंत्र्य चळवळीत ते आघाडीवर होते. पाश्चिमात्य संगीताच्या अभ्यासासाठी ते बी. ए. होण्यापूर्वीच यूरोपात गेले. तथापि तेथून परत आल्यावर मात्र त्यांनी स्वत:ला भारतीय संगीतास वाहून घेतले. स्वत:च्या नाटकांत आणि चित्रपटांत त्यांनी या ज्ञानाचा चांगलाच उपयोग करून घेतला. ते आसाममधील आद्य चित्रपटदिग्दर्शक व निर्माते होते. त्यांची कविता प्रामुख्याने गीतात्मक व देशभक्तिपर आहे. कारेंगर-लिगिरी (१९३०), लभिता (१९४८) व रूपलिम (लेखनकाल १९३६, प्रकाशन १९६१) ही त्यांची प्रसिद्ध नाटके होत. शोणित–कुवारी (१९२५) हे ऐन विशीत लिहिलेले त्यांचे पहिले नाटक, लोक आजही आवडीने वाचतात. आधुनिक नाटकाचे वास्तववादी तंत्र त्यांनीच असमिया नाटकात प्रथम अवलंबिले. खुसखुशीत संवाद वास्तवादी तंत्र व नाविण्यपूर्ण स्वभावपरिपोष ही त्यांच्या नाटकांची वैशिष्ट्ये‍ होत.असमिया साहित्यात नाटककार म्हणूनच त्यांना विशेष मानाचे स्थान आहे. रुपोही, बोगीतोरा, झोनतोरा, झुन्तूर अभिमान,निलासोराई हे त्यांची कथासंग्रह होत.

संदर्भ :