गोव्यातील मेरिटाइम आणि मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ. सध्याचे गोवा वेल्हा. हे स्थळ झुआरी नदीच्या मुखाजवळ आहे. सन १०४९ मध्ये राजा वीरविक्रमदेव याने राजधानी चंद्रपूरहून (चांदोर, जि. दक्षिण गोवा) हलवून गोपकपट्टण येथे आणल्याचा उल्लेख कदंब राजा पहिला जयकेशी (१०५०–१०८०) याच्या ताम्रपटात आहे. त्या अगोदर गोपकपट्टण हे शिलाहार काळात (७५०–१०१०) भरभराटीला आलेले बंदर होते. गोपकपट्टण बंदरात पूर्व आणि पश्चिमेकडील व्यापारी जहाजे येत असत. विजापूर आणि विजयनगरशी व्यापार करण्यासाठी अरब व्यापारी याच बंदराचा वापर करत असत. बाराव्या शतकातील कदंब राजा शिवचित्त परमादिदेव याची सोन्याची नाणी आणि स्थानिक मौखिक परंपरा बघता गोपकपट्टण हे एक वैभवशाली व्यापारी शहर असावे, असे दिसते.
या ठिकाणी संशोधकांना सर्वेक्षणात अनेक अवशेष मिळाले आहेत. त्यांत विविध प्रकारची खापरे, चिनी मातीची भांडी, काचेच्या वस्तू आणि रोमन व कदंबांची नाणी मिळाली आहेत. दोन रोमन नाणी कॉन्स्टटाईन द ग्रेट (३०९–३३७) या रोमन सम्राटाची होती. गोव्यातील प्राच्यविद्या अभ्यासक प्रकाशचंद्र शिरोडकर यांना सन १९९० मध्ये अगाशिम व गोवा वेल्हा यांच्या दरम्यान पाच किमी. लांबीची भिंत आढळली होती. गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानमधील (NIO) पुरातत्त्वज्ञांनी गोवा शासनाच्या मदतीने १९९२ मध्ये येथे प्राथमिक संशोधन केले. त्यांनी दोंडा गावाजवळ नदीच्या मुखापाशी भरती-ओहोटीच्या क्षेत्रात उत्खनन केले. उत्खननात एका १.५ मी. उंचीच्या भिंतीचे अवशेष मिळाले. ही भिंत जांभ्या दगडांनी बांधलेली होती. यातील खालचा स्तर कदंब-शिलाहार, तर वरचा स्तर पोर्तुगीज कालखंडातील होता. पुरातत्त्वीय अवशेषांवरून असे दिसते की, हा भाग कदंब-शिलाहार काळातील बंदराचा होता.
विजापूरचा युसूफ अली अदिलशहा याने १४९० मध्ये गोवा जिंकल्यानंतर मांडवी नदीच्या मुखापाशी इला (ओल्ड गोवा) ही आपली राजधानी केली. दरम्यान गाळ साचल्याने व वापर कमी झाल्याने गोपकपट्टणचे बंदर म्हणून महत्त्व कमी होत गेले.
संदर्भ :
- Costa, J. C. The Heritage of Govapuri: A study of the Artefacts in and around the Pilar Seminary Museum, Pilar Publications, Goa, 2002.
- Gaur, A. S. ‘Excavation of ancient port of Gopakapattanʼ, Journal of Marine Archaeology, 3:57-60, 1992.
- Gune, V. ‘Goa’s coastal and overseas tradeʼ, Goa through the Ages-II (Ed., De Souza T. R.), pp. 117-135, New Delhi, Concept Publishing Company, 1990.
समीक्षक : सचिन जोशी