केरळ राज्यातील प्रसिद्ध सागरी पुरातत्त्वीय स्थळ. ते तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) जिल्ह्यात तिरुअनंतपुरमपासून दक्षिणेस १७ किमी. अंतरावर आहे. विळिंजमच्या परिसरात पाषाणात कोरलेली गुहा, किल्ला, अनेक मंदिरे, सेंट  मेरी चर्च आणि एक मशीद अशी इ. स. आठव्या ते एकोणिसाव्या शतकातील वारसास्थळे आहेत. तसेच या परिसरात अनेक वीरगळ सापडले आहेत.

विळिंजम येथील उत्खनन.

पेरिप्लस ऑफ द इरिथ्रियन सी या इ. स. पहिल्या शतकातील प्राचीन ग्रीक प्रवासवर्णनात विळिंजमचा उल्लेख ’बलित’ (Balita) असा आहे. सातव्या ते नवव्या शतकात विळिंजम ही आय (Ay) या दक्षिण केरळमधील स्थानिक राजवटीची राजधानी (कुलपुरी) होती. मारन छादन या पांड्य राजाने विळिंजमचे वैभव हस्तगत करण्यासाठी इ. स. ७८१ मध्ये स्वारी केली व त्याने करुणानंदन या आय राजाचा पराभव करून त्याचा कोट नष्ट केला. चोल सम्राट राजराजा याच्या अकराव्या शतकातील तिरुवलंगड ताम्रपटात विळिंजमचा उल्लेख ’विलिंद’ असा असून या अभेद्य किल्ल्याला खंदक असल्याची माहिती आहे. काही संशोधकांच्या मते, दक्षिण भारतातील कांतलूर सलाई हे प्राचीन विद्याकेंद्र विळिंजम येथे होते आणि राजराजाच्या स्वारीमुळे इ. स. ९९९ मध्ये ते नष्ट झाले. १५०५ मध्ये विळिंजम डचांनी जिंकले आणि नंतर ते पोर्तुगीज व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १६४४ मध्ये विळिंजमला वखार स्थापन केली, पण ती १६९० मध्ये बंद केली. यामुळे विळिंजमला यूरोपीय वसाहतींच्या कालखंडातील अवशेषही आढळतात.

विळिंजम येथील पुरावशेष.

विळिंजमच्या एक चौरस किमी. विस्तृत परिसरात ३.२० सेंमी. खोलीपर्यंत पुरातत्त्वीय अवशेष मिळतात. केरळ विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाने १९९७ ते २०१० या काळात येथे पुरातत्त्वीय सर्वेक्षण केले आणि २०११ ते २०१३ दरम्यान येथे उत्खनन केले. उत्खननात प्रारंभिक ऐतिहासिक-मध्ययुगीन (इ. स. पहिले ते आठवे शतक), मध्ययुगीन (इ. स. नववे ते चौदावे शतक) आणि मध्ययुगीन-आधुनिक (इ. स. पंधराव्या शतकापुढे) असे तीन काळातील वसाहतींचे पुरावे मिळाले. विळिंजमची सर्वांत जुनी रेडिओकार्बन तिथी इ. स. २६० ते २८० अशी आहे.

संशोधकांना आय काळातील कोटाचे अवशेष एका दहा मीटर उंचीच्या जांभ्या दगडाच्या टेकाडावर आढळले. या टेकाडाच्या बाजूला एक प्राचीन जलप्रवाह (कप्पलचल) असून बहुधा त्यामधून नौका या कोटापर्यंत येत असाव्यात. स्थानिक परंपरेनुसार या प्रवाहात अनेक नौका बुडालेल्या आहेत. हा कोट आय राजांनी बांधला असल्याचा उल्लेख पांड्य राजा नेदुंजदैयन याच्या आठव्या शतकातील श्रीवरमंगलम ताम्रपटात आहे.

विळिंजमला मिळालेली सर्वांत प्राचीन वस्तू ही इजिप्तचा समाट दुसरा टॉलेमी (इ.स.पू. २८५ ते २४६) याचे सोन्याचे नाणे आहे. तसेच प्रारंभिक ऐतिहासिक काळातील खापरे आंध्र प्रदेशातील कोट्टापट्टनम व पुदुच्चेरीतील अरिकामेडु येथे मिळालेल्या आग्नेय आशियातील खापरांप्रमाणे आहेत. विळिंजमला मिळालेल्या खापरांचा पेट्रोग्राफी तंत्र वापरून अभ्यास करण्यात आला. अँफोराचे (रोमन कुंभ) तुकडे, रूलेटेड प्रकारची खापरे आणि टॉरपेडोच्या आकाराचे कुंभ वैशिष्ट्यपूर्ण आहेत. टॉरपेडोच्या (पाणतीर) आकाराचे कुंभ पश्चिम आशियातील असून त्यांच्या आतल्या बाजूने बिटुमेनचा थर लावून ते सीलबंद केलेले आहेत. हे कुंभ बहुधा द्रव पदार्थाची वाहतूक करण्यासाठी वापरले जात होते. मातीची ही भांडी इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. दुसरे शतक या काळातील आहेत.

एगशेल वेअर (Eggshell Ware) या नावाने ओळखली जाणारी मातीची भांडी इराकमधून आलेली आहेत. झिलईदार मातीची भांडी प्रामुख्याने निळ्या-हिरव्या रंगाची असून ती इराक अथवा इराणमधून आयात झालेली आहेत. त्यांचा कालखंड चौथे ते सातवे शतक असा आहे. पांढऱ्या रंगाची चिनी मातीची भांडी इ. स. सातव्या ते बाराव्या शतकातील आहेत. ही भांडी चीनमधील लोंगोक्वान व जिंगडेझेन या भागात तयार झालेली होती. त्याचप्रमाणे चिनी मातीची काही भांडी म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांमधून आलेली आहेत. या भांड्यांचा कालखंड चौदावे ते सोळावे शतक असा आहे. या सर्व पुराव्यांवरून असे दिसते की, विळिंजम हे दीर्घकाळ म्हणजे सु. दोन हजार वर्षे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरचे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र होते.

संदर्भ :

  • Abhayan, G. S.; Joglekar, P.P.; Kumar, Ajit & Rajesh, S.V. ‘Utilization of Animal Resources at Vizhinjam, Kerala: A Study based on Faunal Remainsʼ, Heritage: Journal of Multidisciplinary Studies in Archaeology Heritage, 2: 253‐271, 2014.
  • Kumar, Ajit, ‘History and Archaeology of the Recently Discovered Fort at Vizhinjamʼ, Adhaaram ‐ A Journal of Kerala Archaeology and History, 33‐36, 2006.

                                                                                                                                                                                        समीक्षक : सचिन जोशी