ज्या वस्तूंचे ज्ञान पाच ज्ञानेंद्रियांच्याद्वारे होऊ शकत नाही, त्या वस्तूंना अतीन्द्रिय असे म्हणतात. या विश्वात अस्तित्वात असणाऱ्या सर्व वस्तूंचे स्वरूप हे वेगवेगळे आहे. जे पदार्थ पाच महाभूतांनी बनलेले आहेत आणि ज्या पदार्थांमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांपैकी कोणताही एक गुण आहे, अशा पदार्थांचे ज्ञान आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून होऊ शकते. ज्या पदार्थांचे ज्ञान इंद्रियांनी होऊ शकते, त्यांना योगाच्या परिभाषेत इंद्रियगम्य किंवा ‘स्थूल पदार्थ’ म्हणतात व ज्या पदार्थांचे ज्ञान इंद्रियांनी होऊ शकत नाही त्यांना अतीन्द्रिय किंवा ‘सूक्ष्म पदार्थ’ म्हणतात. कधी कधी स्थूल पदार्थांचे ज्ञानही आपल्याला इंद्रियांनी होऊ शकत नाही, कारण त्यांचे ज्ञान होण्यामध्ये काही न काही प्रतिबंधक/अडथळा दिसून येतो. ज्या कारणांमुळे इंद्रियांनी वस्तूचे ज्ञान होऊ शकत नाही, अशी आठ कारणे सांख्यकारिकेमध्ये सांगितलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे आहेत —
(१) अतिदूर : फार दूरवर असणाऱ्या वस्तूचे ज्ञान इंद्रियांनी होऊ शकत नाही. मध्ये कोणताही अडथळा नसतानाही लांब अंतरावर असणारे फूल डोळ्यांना दिसू शकत नाही व त्याच्या सुगंधाचेही ज्ञानही होत नाही. दूर अंतरावर असणारे ग्रह-तारेही आपल्याला दिसत नाहीत.
(२) अतिसामीप्य : कोणतीही वस्तू इंद्रियांच्या अत्यंत जवळ असली तरी तिचे ज्ञान होऊ शकत नाही. जसे डोळ्यातील काजळ दिसू शकत नाही किंवा पुस्तक अगदी डोळ्यापाशी धरले तर वाचता येत नाही.
(३) इंद्रियघात : जर इंद्रियामध्ये दोष असेल असेल तर वस्तू इंद्रियांच्या संपर्कात येऊनही त्या वस्तूचे ज्ञान होऊ शकणार नाही. जसे, अंध व्यक्तीला रूपाचे, बहिऱ्या व्यक्तीला ध्वनीचे ज्ञान होत नाही.
(४) मनोऽनवस्थान : इंद्रियांचा वस्तूंशी संपर्क असला तरीही जर मन दुसऱ्या गोष्टीचा विचार करत असेल, तर त्या वस्तूचे ज्ञान होऊ शकत नाही. उदा., एखादी व्यक्ती कामात व्यग्र असताना जर कुणी हाक मारली तर ती ऐकू येत नाही. वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी जसे इंद्रियांचा त्या वस्तूशी संपर्क होणे आवश्यक आहे, तसेच त्या ठिकाणी मनही स्थिर असणे आवश्यक आहे.
(५) सूक्ष्मता : आकाराने अतिशय सूक्ष्म असणाऱ्या वस्तूचे इंद्रियांना ज्ञान होत नाही. जसे, परमाणु, हवेतील धूलिकण किंवा दह्यातील सूक्ष्म जीवाणू डोळ्यांना दिसत नाहीत.
(६) व्यवधान : व्यवधान म्हणजे अडथळा. वस्तू आणि इंद्रियांच्यामध्ये काही अडथळा असेल तरीही वस्तूचे ज्ञान होत नाही. जसे, भिंतीपलीकडच्या वस्तू दिसू शकत नाही.
(७) अभिभव : अभिभव म्हणजे दबले जाणे किंवा क्षीण होणे. दिवसा सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे आकाशातील ताऱ्यांचे तेज दबले जाते व ते दिसत नाहीत.
(८) समानाभिहार : समानाभिहार म्हणजे समान स्वरूप असणाऱ्या दोन वस्तू एकमेकांत मिसळून जाणे. जसे, पावसाचे थेंब तळ्यातील पाण्यात पडले तर त्यांचे वेगळे अस्तित्व जाणवत नाही किंवा दूध आणि पाणी एकत्र केले तर दोन्हीचे वेगवेगळे ज्ञान होऊ शकत नाही.
वरीलपैकी कोणत्याही एका कारणामुळे जर वस्तूचे ज्ञान इंद्रियांनी होऊ शकत नसेल, तर ती वस्तू अतीन्द्रिय होय. काही पदार्थ काही विशिष्ट काळापुरते अतीन्द्रिय असतात, तर काही पदार्थ हे कायमस्वरूपी अतीन्द्रिय असतात. उदा., ताऱ्यांचा प्रकाश हा दिवसा अतीन्द्रिय असतो, परंतु तो रात्री दिसू शकतो. सांख्य-योग दर्शनांनुसार स्वीकारलेल्या २५ तत्त्वांपैकी पुढील २० तत्त्वे ही अतीन्द्रिय आहेत – पाच तन्मात्र, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, मन, अहंकार, बुद्धी, प्रकृति व पुरुष. नाक, कान इत्यादी अवयव हे डोळ्यांना दिसतात; परंतु इंद्रिये ही अवयवांमध्ये असणाऱ्या सूक्ष्म शक्ती आहेत, त्यामुळे त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. थोडक्यात, इंद्रिये ही अतीन्द्रिय आहेत.
ज्या पदार्थांचे ज्ञान इंद्रियांनी (प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे) होत नाही, त्यांचे ज्ञान अनुमान प्रमाणाने होते. ज्या पदार्थांचे ज्ञान अनुमानानेही होऊ शकत नाही, अशा पदार्थांचे ज्ञान शब्द प्रमाणाद्वारे होते, असे सांख्य-योग दर्शनामध्ये स्वीकारले जाते.
संदर्भ :
- रस्तोगी,लीना, साङ्ख्यतत्त्वदीपिका, श्री मंगेश प्रकाशन, नागपुर, २०१०.
- शास्त्री, राकेश, साङ्ख्यकारिका, संस्कृत ग्रंथागार, दिल्ली, २००४.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर