बुद्धीमध्ये असणाऱ्या धर्म, अधर्म, ज्ञान, अज्ञान, राग (आसक्ती), वैराग्य, ऐश्वर्य (अष्टसिद्धी) आणि अनैश्वर्य (सिद्धींचा अभाव) या आठ भावांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे व बुद्धीतील सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या विषमतेमुळे ती विविध रूपांमध्ये प्रकट होते. बुद्धी या तत्त्वाची प्रकट होणारी विविध रूपे म्हणजेच प्रत्ययसर्ग होय. यालाच बौद्धिक (बुद्धीपासून निर्माण होणारा) सर्ग असेही म्हणतात. सर्ग या शब्दाचा अर्थ सृष्टी असा आहे. सांख्यदर्शनामध्ये दोन प्रकारची सृष्टी मानली गेली आहे. बुद्धीद्वारे प्रकट होणारे वेगवेगळे भाव म्हणजे बौद्धिक सृष्टी होय; तर पंचमहाभूतांच्या कमी-अधिक प्रमाणामुळे उत्पन्न होणारी जीवांची शरीरे आणि स्थूल जगत् ही भौतिक सृष्टी होय.

प्रत्ययसर्गाचे (बौद्धिक सृष्टीचे) विपर्यय, अशक्ती, तुष्टी आणि सिद्धी असे चार मुख्य भेद होतात. त्यातही विपर्ययाचे ५, अशक्तीचे २८, तुष्टीचे ९ आणि सिद्धीचे ८ असे सर्वांचे मिळून एकूण पन्नास उपप्रकार होतात. या सर्व भेदांचे स्वरूप पुढीलप्रमाणे —

(१) विपर्यय : विपर्यय म्हणजे विपरीत ज्ञान होय. बुद्धीमध्ये तमोगुणाचे आधिक्य झाल्यामुळे जीवाला विषयांचे यथायोग्य ज्ञान प्राप्त होत नाही, यालाच विपर्यय असे म्हणतात. विपर्ययाचे पाच उपभेद म्हणजे तम, मोह, महामोह, तमिस्र आणि अंधतमिस्र होय. यांनाच योगदर्शनामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या संज्ञा वापरलेल्या आहेत. यांनाच पंचक्लेश असे म्हणतात. यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे – (१) तम : तम किंवा अविद्या ही आठ प्रकारची आहे. प्रकृति, महत्, अहंकार आणि पाच तन्मात्र ही आठ तत्त्वे पुरुषापेक्षा (आत्म्यापेक्षा) वेगळी असूनही त्यांना पुरुष (आत्मा) समजणे, हे तमाचे आठ प्रकार होत. (२) मोह : अणिमा, महिमा इत्यादी आठ सिद्धी प्राप्त झाल्यानंतर योगी त्यांना नित्य मानू लागतो आणि स्वत:ला अमर समजू लागतो. आठ सिद्धींचे हे ऐश्वर्य तात्कालिक असूनही त्याला नित्य समजणे, हे मोहाचे आठ भेद होत. (३) महामोह : शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाच विषय अदिव्य (सामान्य जीवांना होणारे विषयाचे आंशिक ज्ञान) आणि दिव्य (योग्यांना होणारे विषयाचे संपूर्ण ज्ञान) या भेदांनी दहा प्रकारचे असतात. या दहा प्रकारच्या विषयांप्रति असणारी आसक्ती म्हणजेच महामोहाचे दहा प्रकार होय. महामोहालाच योगदर्शनात राग असे म्हणतात. (४) तमिस्र : वर उल्लेखिलेले शब्दादि दहा विषय आणि अणिमा इत्यादी आठ सिद्धी यांचा अनुभव घेतल्यावर काही कारणामुळे त्यांविषयी उत्पन्न होणारा द्वेष म्हणजे १८ प्रकारचा तमिस्र होय; व (५) अंधतमिस्र : शब्दादि दहा विषय आणि अणिमा इत्यादी आठ सिद्धी यांपासून उत्पन्न होणारे मृत्यूचे भय म्हणजे १८ प्रकारचा अंधतमिस्र होय.

(२) अशक्ती : अशक्ती म्हणजे शक्तीचा अभाव होय. अशक्तीचे एकूण २८ प्रकार आहेत. ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेंद्रिये व मन ही अकरा इंद्रिये यांमध्ये योग्य प्रकारे काम करण्याची शक्ती नसेल, तर त्यांच्यातील क्रियाशीलतेच्या अभावामुळे बुद्धीही काम करण्यास असमर्थ होते. अकरा इंद्रियांच्या अशक्तीमुळे बुद्धीमध्ये येणारी असमर्थता हे अशक्तीचे ११ प्रकार होत. (१) बाधिर्य – बहिरेपणा, (२) कुष्ठिता – स्पर्शाचा अनुभव न होणे, (३) अंधत्व – आंधळेपणा, (४) जडता – चव ओळखता न येणे, (५) अजिघ्रता – वास ओळखता न येणे हे ज्ञानेंद्रियांचे पाच दोष आहेत. (६) मूकता – मुकेपणा, (७) कौण्य – हाताने वस्तू ग्रहण करता न येणे, (८) पंगुत्व – पांगळेपणा, (९) क्लैब्य – नपुंसकत्व, (१०) उदावर्त – पायु (गुद) इंद्रियाची अशक्ती हे पाच कर्मेंद्रियांचे दोष आहेत, (११) मंदता – मन योग्य प्रकारे काम करू न शकणे. अशा अकरा प्रकारच्या अशक्ती आहेत व यांमुळे बुद्धीमध्येही ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा क्रिया करण्यासाठी असमर्थता उत्पन्न होते. या ११ व पुढे वर्णिलेल्या ९ तुष्टी आणि ८ सिद्धी यांचा अभाव असणे या १७ अशा एकूण २८ प्रकारच्या अशक्ती आहेत.

(३) तुष्टी : तुष्टी म्हणजे संतुष्ट होणे. सांख्यदर्शनात चार प्रकारच्या आध्यात्मिक आणि पाच प्रकारच्या बाह्य अशा एकूण ९ प्रकारच्या तुष्टी मानल्या आहेत. प्रकृति, उपादान, काल आणि भाग्य अशा चार प्रकारच्या आध्यात्मिक तुष्टी आहेत. त्यांचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे – (१) प्रकृति :  प्रकृतीपेक्षा पुरुष (आत्मा) वेगळा आहे अशा प्रकारचे विवेकज्ञान बुद्धीद्वारेच प्राप्त होते. हे विवेकज्ञान प्राप्त झाल्यावर पुरुषाला कैवल्य प्राप्त होते. ‘बुद्धी ही प्रकृतीचाच परिणाम असल्यामुळे हे विवेकज्ञान पर्यायाने प्रकृतीद्वारेच प्राप्त होते. त्यामुळे मला (पुरुषाला) ज्ञान किंवा कैवल्य प्राप्त करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे प्रयत्न करण्याची गरज नाही’ अशी समजूत करून घेऊन प्रकृतीच कैवल्य प्राप्त करवून देईल, असे मानून संतुष्ट राहणाऱ्या मनुष्याच्या बुद्धीची अवस्था म्हणजे ‘प्रकृति तुष्टी’ होय. (२) केवळ संन्यास घेतल्यानेच मला ज्ञान प्राप्त होईल अशा धारणेने जर संन्यास घेऊन त्यानंतर कोणतेही प्रयत्न केले नाहीत, तर ती ‘उपादान तुष्टी’ होय. (३) ‘ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी मला विनायास मुक्ती मिळेल’ अशा धारणेने जर काळावर विसंबून राहून ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, तर ती काल तुष्टी होय. (४) जेव्हा माझ्या भाग्यात, नशिबात असेल तेव्हा मला विनायास मोक्ष मिळेल, असे दैववादावर विसंबून ज्ञान प्राप्त करण्यासाठी जर प्रयत्न केले नाहीत, तर ती भाग्य तुष्टी होय. या चार आध्यात्मिक तुष्टींव्यतिरिक्त पाच बाह्य तुष्टी आहेत. ज्ञानेंद्रियांद्वारे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाच बाह्य विषयांचे ज्ञान होते. चित्तामध्ये या विषयांचा उपभोग करण्याची आसक्ती असल्यास जीव पुन: पुन्हा विषयांकडे आकृष्ट होतो; परंतु, या विषयांमध्ये दोष दिसून आल्यास तो त्यापासून विरक्त होतो. दोषदर्शनामुळे त्या त्या विषयाप्रति वैराग्य उत्पन्न होते. बाह्य विषय हे तात्कालिक सुख देतात; परंतु ते दीर्घकालीन दु:ख उत्पन्न करतात, याचे ज्ञान झाल्यावर त्या विषयांप्रति विरक्ती उत्पन्न होते. विषयांच्या अर्जन, रक्षण, क्षय, भोग आणि हिंसा या पाच गोष्टींशी दु:ख संबंधित आहे, त्यामुळे त्यांमध्ये दोष पाहून त्यांपासून विरक्ती उत्पन्न होऊन संतुष्ट होऊन राहणे म्हणजे बाह्य तुष्टी होय.

(४) सिद्धी : योगदर्शनानुसार काही विशिष्ट साधनेमुळे प्रकट होणाऱ्या इंद्रिय, शरीर, चित्त यांच्या असाधारण शक्ती म्हणजे सिद्धी होय, तर सांख्यदर्शनानुसार कैवल्य प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी आठ साधने म्हणजे सिद्धी होय. सांख्यदर्शनातील आठ सिद्धी पुढीलप्रमाणे आहेत – (१) अध्ययन : गुरूकडून विधिवत् अध्यात्मविद्येचे वर्णन करणाऱ्या उपनिषदे इत्यादी ग्रंथांचे अक्षरज्ञान प्राप्त करवून घेणे. (२) शब्द : त्या ग्रंथांमधील शब्दांचे अर्थ विस्ताराने समजावून घेणे. (३) ऊह : ग्रंथांमध्ये वर्णिलेल्या विषयांना तर्काच्या आधारे तपासून पाहणे. (४) सुहृत्प्राप्ति : तर्काच्या आधारे जे विषयस्वत: जाणले आहेत, त्या विषयांची चर्चा सहाध्यायी मित्रांसोबत करून ज्ञानामध्ये अधिक सुस्पष्टता प्राप्त करणे. (५) दान : प्रत्यक्ष अनुभवाद्वारे अंतिम सत्याचे ज्ञान होणे. (येथे दान शब्द हा ‘दैप् शोधने’ या संस्कृत धातूपासून निष्पन्न झाला आहे. याचा अर्थ ज्ञानाची शुद्धी असा होय). (६, ७ व ८) आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक दु:खांचा नाश होणे. सांख्यदर्शनानुसार या आठ सिद्धी आहेत. यांची परिणती कैवल्यप्राप्तीमध्ये होते. यातील १, २ यांचा संबंध वेदान्तातील श्रवण, ३ चा संबंध मनन व ५ चा संबंध निदिध्यासन या साधनप्रक्रियेशी आहे.

अशा प्रकारे विपर्यय, अशक्ती, तुष्टी व सिद्धी ही बुद्धीची विविध रूपे असून सांख्यदर्शनात बुद्धीच्या या सृष्टीला प्रत्ययसर्ग असे म्हटले जाते.

पहा : तुष्टि, क्लेश.

समीक्षक : कला आचार्य