हबीब, इरफान : (१२ ऑगस्ट १९३१). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय मार्क्सवादी इतिहासकार आणि विचारवंत. त्यांचा जन्म बडोदा (वडोदरा, गुजरात) येथे एका सुशिक्षित कुटुंबात मोहम्मद हबीब व सोहैल्ला या दाम्पत्यापोटी झाला. वडील मोहम्मद हे प्रसिद्ध इतिहासकार आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठात प्राध्यापक होते, तर आई सोहैल्ला या विख्यात न्यायमूर्ती बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या नात होत्या. इरफान हबीब यांचे आजोबा मोहम्मद नसीम हे प्रसिद्ध विधिज्ञ होते आणि मातुल आजोबा अब्बास तय्यबजी हे भूतपूर्व बडोदा संस्थानचे माजी न्यायमूर्ती होते.

हबीब यांनी बी.ए. (१९५१) आणि इतिहास विषयात एम. ए. (१९५३) या पदव्या अलीगढ मुस्लीम विद्यापीठातून संपादन केल्या. एम. ए. परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. तद्नंतर त्यांनी त्याच विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीस सुरुवात केली (१९५३). पुढे त्यांनी न्यू कॉलेज, ऑक्सफर्ड (इंग्लंड) येथून डि. फिल. पदवी प्राप्त केली. ‘ॲग्रेरिअन सिस्टिम ऑफ मोगल इंडियाʼ हा त्यांच्या शोधप्रबंधाचा विषय होता. त्याचे संशोधकांकडून चांगले स्वागत झाले. पुढे हा प्रबंध ग्रंथरूपात प्रकाशित झाला. हबीब यांनी पुढे अलीगढ मुस्लीम विद्यापीठात प्रपाठक, प्राध्यापक म्हणून काम केले (१९६९–१९९१). त्यांच्या पत्नी सायरा या अलीगढ मुस्लीम विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. हबीब दाम्पत्यास तीन मुले आणि एक मुलगी झाली.

हबीब यांनी मार्क्सवादी परिप्रेक्षातून भारताचा इतिहास, विशेषतः मोगलकालीन इतिहास, मांडण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठात अध्यापन करत असताना ‘सेंटर फॉर द ॲडव्हान्स्ड स्टडी ऑफ हिस्टरीʼ या संस्थेचे ते संचालक (१९७५-७७ आणि १९८४-९४) होते. शिवाय केंब्रिज इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया  या ग्रंथमालेचे ते सहसंपादक होते. ऑक्सफर्डमध्ये राधाकृष्णन व्याख्यानमालेतही त्यांनी अध्यापन केले (१९९१). हबीब यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी ॲग्रेरिअन सिस्टिम ऑफ मोगल इंडिया, १५५६-१७०७ (१९६३), ॲटलास ऑफ द मोगल एम्पायर (१९८२), एसेज इन इंडियन हिस्टरी : टूवर्डस अ मार्क्सिस्ट पर्सेप्शन (१९९५), अकबर अँड हिझ इंडिया (१९९९), द इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ मेडिईव्हल इंडिया: अ सर्व्हे (२००१), कन्फ्रंटिंग कलोनिॲलिझम: रेझिस्टन्स अँड मॉडर्नायझेशन अंडर हैदर अली अँड टिपू सुलतान (२००२), मौर्यन इंडिया (२००४), केंब्रिज इकॉनॉमिक हिस्टरी ऑफ इंडिया (२००५), कार्ल मार्क्स ऑन इंडिया (२००६), मेडिईव्हल इंडिया: द स्टडी ऑफ सिव्हिलायझेशन (२००८), क्लास, कास्ट अँड कॉलनी : इंडिया फ्रॉम द मोगल पिरियड टू ब्रिटिश राज (२०१०) इत्यादी त्यांचे संशोधनात्मक व महत्त्वाचे ग्रंथ होत. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक ग्रंथांचे संपादन केले असून भारतीय आणि जागतिक इतिहासावरील त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. प्राचीन भारतासह मध्ययुगीन प्रशासकीय आणि आर्थिक इतिहास, वसाहतवाद आणि त्याचा भारतावरील प्रभाव, तसेच इतिहास लेखनपद्धती यांवरील त्यांचे विवेचन मौलिक ठरले. हबीब हे पोथीनिष्ठ मार्क्सवादी नाहीत किंवा मार्क्सने लिहिलेला प्रत्येक शब्द, मांडलेले प्रत्येक प्रमेय ते शिरोधार्य मानतात, असे नाही. तथापि मार्क्सने प्रतिपादीत केलेला मानवी जीवनाच्या विकासामागील आर्थिक हेतू मूलकतेचा आणि भौतिकवादी विरोध विकासचा सिद्धांत हे मानवी समाजाच्या अध्ययनाचे मौलिक आधार आहेत, अशी त्यांची वैचारिक निष्ठा आहे. या भूमिकेतून ते प्राचीन भारतीय इतिहासापासून आधुनिक भारताच्या इतिहासाचे विश्लेषण करतात.

हबीब यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांना जवाहरलाल नेहरू अधिछात्रवृत्ती (१९६८), तसेच अमेरिकन हिस्टॉरिकल असोसिएशनचे वाट्मूल हे सुप्रतिष्ठित पारितोषिक विभागून (भारतीय इतिहासकार तपन रायचौधरी यांच्या समवेत) मिळाले (१९८२). ते ब्रिटिश रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीचे अधिछात्र होते (१९९७) होते. त्यांनी अखिल भारतीय इतिहास परिषद आणि इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च यांचे अध्यक्षपद भूषविले. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविले (२००५). तसेच त्यांना मुझफ्फर अहमद मेमोरियल पारितोषिक (२००६), बनारस हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी आणि कालिकत विद्यापीठ, केरळ यांच्याकडून सन्मान्य डी. लिट. (२००८; २०१०) आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

हबीब हे निवृत्तीनंतर अलीगढ विद्यापीठात गुणश्री प्राध्यापक म्हणून कार्यरत होते (२००७). सध्या ते अलीगढ येथे वास्तव्यास आहेत.

संदर्भ :

  • Habib, Irfan, Essays in Indian History-Towards a Marxist Perception, Tulika Books, New Delhi, 2015.
  • Habib, Irfan, Medieval India 1: Researches in the History of India 1200-1750, Oxford University Press, New Delhi, 1998.
  • http://aligarhmovement.com/aligarians/irfan_habib
  • https://peoplepill.com/people/irfan-habib-1

                                                                                                                                                                          समीक्षक : सरोजकुमार मिठारी