थापर, रोमिला : (३० नोव्हेंबर १९३१). आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या इतिहास संशोधिका व विदुषी. विशेषतः प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती यांवरील लेखन-संशोधनासाठी प्रसिद्ध. त्यांचा जन्म लखनौमधील एका संपन्न पंजाबी कुटुंबात झाला. थापर यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या जन्मगावी झाले. त्यांचे वडील दया राम थापर सैन्यात वैद्यकीय अधिकारी होते. थापर यांना लहानपणापासून इतिहास विषयात रुची होती. वडिलांबरोबर त्यांनी एकदा दक्षिण भारतातील चेन्नई येथील संग्रहालयास भेट दिली होती. तेथील शिल्पकला पाहून त्यांच्या मनात प्राचीन इतिहासाविषयी अधिकच कुतूहल निर्माण झाले.

थापर यांनी काही काळ पुणे येथील वाडिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. पुढे त्यांनी पंजाब विद्यापीठातून बी. ए. ही पदवी विशेष प्रावीण्याने प्राप्त केली (१९५२). इंग्रजी साहित्य आणि इतिहास हे त्यांचे पदवीचे विषय होते. त्यानंतर त्या उच्च शिक्षणासाठी लंडनला गेल्या. तेथे त्यांनी लंडन विद्यापीठाची पीएच.डी पदवी संपादन केली (१९५८). या काळात त्यांना आंतरराष्ट्रीय क्रॉस्बी हॉल, सर विल्यम मेयर, विल्यम लिंकर अशा इतिहासविषयक संशोधनास उत्तेजन देणाऱ्या शिष्यवृत्त्या मिळाल्या. सुरुवातीस त्यांनी लंडन विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून काम केले (१९५९-६१). पुढे भारतात परतल्यावर हरयाणा येथील कुरुक्षेत्र विद्यापीठ (१९६१-६३) आणि दिल्ली विद्यापीठ (१९६३-७०) येथे प्रपाठक म्हणून त्यांनी अध्यापन केले. पुढे त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास या विषयाच्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या (१९७०) आणि तेथूनच त्या निवृत्त झाल्या (१९९३).

थापर यांनी प्राचीन भारतीय इतिहासाचे बहुमोल संशोधन केले. त्यांचे निष्कर्ष सत्यान्वेषणावर व पुरातत्त्वीय अवशेषांवर आधारित आहेत. प्राचीन इतिहासाविषयी विशेषतः मौर्य साम्राज्याचा ऱ्हास, याविषयी त्यांनी काढलेली अनुमाने तर्कशुद्ध मानली जातात. अशोक अँड द डिक्लाइन ऑफ द मौर्याज  (१९६१) हा त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ. या ग्रंथात त्यांनी सम्राट अशोक यांच्याबद्दलचा ऐतिहासिक दृष्टीकोन मांडताना सम्राट अशोक आणि माणूस अशोक, या दोन व्यक्तित्वांची स्वभाववैशिष्ट्ये विचारात घेऊन आपले अन्वयार्थ मांडले. थापर यांच्या मते, अहिंसा हे राजनीतीचे मूल्य म्हणून स्वीकारणारे अशोक हे पहिले राजे असतील. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाचे कारण विशद करताना थापर म्हणतात, जेव्हा एखादे साम्राज्य फार मोठे होते, तेव्हा त्याची प्रशासन यंत्रणा ताठर, क्वचित जुलमी होऊ लागते. परिणामतः अर्थव्यवस्था कमकुवत होऊ लागते. मौर्य साम्राज्य या नियमाला अपवाद नव्हते. शकुंतला : टेक्स्ट्स, रीडिंग्ज, हिस्टरीज (२००२) या ग्रंथात त्यांनी महाभारतातील शकुंतलेवर भाष्य करताना वेगवेगळ्या समाजव्यवस्थांमध्ये ती कशी रंगविली गेली, तिची स्वभाव वैशिष्ट्ये कशी बदलत गेली याची मांडणी केली. स्वतंत्र बाण्याची शकुंतला विविध ललित साहित्यात भिन्न रूपात आली, याचे कारण तत्कालीन समाजधारणांनुसार पात्रांची रचना बदलत असते, हे सूत्र थापर यांनी मांडले.

इतिहास लेखनाबाबत थापर यांचा दृष्टीकोन आधुनिक स्वरूपाचा आहे. पुरातत्त्वीय उपलब्ध साधने, आपली संमिश्र समाजरचना, परंपरा, लोकजीवन या सर्वांची उत्कृष्ट सांगड घालून लेखन करण्याची हातोटी त्यांच्याजवळ आहे. या दृष्टीने त्यांचे ए हिस्टरी ऑफ इंडिया  (दोन खंड – १९६३; १९६६) हे ग्रंथ उल्लेखनीय आहेत. याशिवाय त्यांचे अन्य ग्रंथ पुढीलप्रमाणे : पास्ट अँड प्रेजुडिस (व्याख्यानांचा लेखसंग्रह, १९७५); एन्शंट इंडियन सोशल हिस्टरी : सम इंटरप्रिटेशन (१९७८), द मौर्याज रिव्हिजिटेड (१९८७), कल्चरल ट्रँझॅक्शन अँड अर्ली इंडिया (१९८७), इंटरप्रिटींग अर्ली इंडिया (१९९२), नॅरटिव्ह अँड द मेकिंग ऑफ हिस्टरी (२०००), कल्चरल पास्ट्स (२०००), द पेंग्विन हिस्टरी ऑफ अर्ली इंडिया : फ्रॉम द ओरिजिन्स टू ए डी १३०० (२००२), सोमनाथ : द मेनी व्हॉइसेस ऑफ हिस्टरी (२००५), द पास्ट ॲझ प्रेझेंट (२०१४) इत्यादी. यांशिवाय काही पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे.

थापर यांना अनेक मानसन्मान लाभले आहेत : जवाहरलाल नेहरू छात्रवृत्ती (१९७३-७७); अखिल भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्षपद (१९८३); कोलकाता, ऑक्सफर्ड आणि पेरॅडेनिया विद्यापीठ यांच्याकडून सन्मान्य डी. लिट.; आंतरराष्ट्रीय इतिहासशास्त्र समितीच्या उपाध्यक्षा (२०००); प्रतिष्ठीत क्लुग हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार (विभागून आयरिश इतिहासकार पीटर ब्राउन यांच्यासह, २००८); बिजिंग, पेनसिल्व्हेनिया आणि केंब्रिज विद्यापीठांत अभ्यागत प्राध्यापक इत्यादी. याशिवाय त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळ, वर्ल्ड बुक ऑफ एन्सायक्लोपिडियाचे सल्लागार मंडळ आदी ठिकाणी सभासदत्व भूषविले आहे.

थापर यांची भूमिका तत्त्वनिष्ठ आणि परखड राहिली आहे. सध्या त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गुणश्री प्राध्यापिका (इमेरिटस प्रोफेसर) म्हणून कार्यरत आहेत.

संदर्भ :

  • Thapar, Romila, Asoka and the Decline of the Mauryas, Oxford University Press, 2012.
  • Peterson, Indira Viswanathan, ‘Romila Thaparʼ, Encyclopedia of Historians And Historical Writing, Vol. 2, (Ed., Boyd, Kelly), Routledge, New York, 2019.

                                                                                                                                                                              समीक्षक : सरोजकुमार मिठारी