सॅल्व्हिया ही लॅमिएसी (Lamiaceae) कुलातील एक सदस्य असून यामध्ये पुंजावली किंवा संयुक्त फुलोऱ्यामध्ये उभयलिंगी फुले असतात. फुलाच्या पाच पाकळ्या दोन ओठांच्या आकारांत जुळलेल्या असतात (bilabiate). उपलब्ध दोन परागकोशापैकी प्रत्येक परागकोशातील अर्धा भाग वांझ (Sterile) असून त्यात पराग तयार होत नाही. दुसऱ्या अर्ध्या भागातील पराग हे फलनाची प्रक्रिया पार पाडण्यास सक्षम असतात. दोन्ही परागकोशातील अर्धा वांझ भाग एकमेकांना जोडून वांझ – पट्टी तयार होते. एक वक्र संयोजिका सक्षम आणि वांझ भागाना जोडते, प्रदलाच्या खालच्या ओठावर भेटणाऱ्या कीटकांसाठी बसण्याची जागा बनते (landing stage). जेव्हा मधमाशी फुलांच्या खालच्या ओठांवर बसते आणि मकरंद गोळा करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती वांझ पट्टी दाबली जाऊन दोन्ही बाजूला असलेले सक्षम भाग त्या माशीच्या पाठीवर आदळतात व घासले जातात. हे भाग सक्षम पराग तयार करीत असल्यामुळे असंख्य परागकण माशीच्या पाठीवर जमा होत असतात. जेव्हा ती मधमाशी दुसऱ्या फुलाला भेट देते तेव्हा त्या फुलांमधील वक्र स्थितीतील कुक्षीला तिच्या पाठीवरील आधीच्या फुलातील परागकण चिकटतात व परपरागीकरणाची प्रक्रिया पूर्ण होते. या प्रकियेत एका फुलातील परागकणातील जनुके दुसऱ्या झाडाच्या फुलांमध्ये जाऊन तेथे दोघा फुलातील जनुकांचे मिश्रण होऊन जास्त सक्षम बीज बीजांडात तयार होते.

संदर्भ :

  • Resupinate Dimorphy, a novel pollination strategy in two-lipped flowers of Eplingiella (Lamiaceae) https://doi.org/10.1590/0102-33062016abb0381                                                                                                                                                                                              समीक्षक: शरद चाफेकर