रुई (कॅलॉट्रॉपिस जायगँशिया; Calotropis gigantea; कुल : ॲस्क्लेपीएडेसी; Asclepiadaceae). यात फुलांमध्ये पुं-केसराचे वृंत (Fillaments) संमिश्रित होतात आणि एक पंचकोनी सुंदर आकाराचा मेजासारखा स्तंभ तयार होतो. स्तंभाच्या पायथ्याशी आतल्या भागात अंडाशय असून या पुमंग-जायांग सान्निध्याचा स्तंभ (Gynostegeum) नक्षीदार (Corona) असल्याने कीटक याकडे आकर्षिले जातात. या स्तंभाच्या पायथ्याशी मध तयार होतो. पुं-केसरातील पराग एकत्र येऊन त्यांच्या पिशव्या (Pollinia) तयार होतात. पुं-केसराच्या दोन वेगळ्या परागकोशामध्ये तयार झालेल्या पराग-पिशव्या एका चिकट ग्रंथीने (Corpusculum किंवा Retinaculum) जोडल्या जातात आणि पंचकोनी स्तंभाच्या (Gynostegeum) पाच कोपऱ्यावर स्थिरावतात. जेव्हा कीटक मधाच्या शोधात एखाद्या फुलास भेट देतात, तेव्हा पराग-पिशव्यांची चिकट ग्रंथी कीटकाच्या पायाला चिकटते आणि जेव्हा कीटक सरकतो, तेव्हा परागकणाची पिशवी बाहेर येऊन कीटकांच्या अंगास चिकटते. जेव्हा तो कीटक दुसर्‍या फुलास भेट देतो, तेव्हा ही परागकणाची पिशवी कुक्षीवर चिकटते आणि परपरागीभवनाची क्रिया पूर्ण होते.

संदर्भ :

समीक्षक : शरद चाफेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.