अंजीर हा वड, पिंपळ, उंबर यांच्यासारखा फायकस (Ficus) च्या जातींतील एक प्रजाती असून मोरेसी (Moraceae) कुलातील आहे. या जातीतील पुष्पबंध कुंभाच्या आकाराचा असून त्यात अनेक लहान-लहान फुले असतात. या रचनेस कुंभासनी (Hypanthodium) म्हणतात. या कुंभाच्या मांसल भित्तीकेच्या आतल्या बाजूस अनेक लहान-लहान फुले असतात. कुंभाच्या वरच्या बाजूला एक छोटेसे छिद्र असते (Ostiole), जे आतल्या बाजूस टोके असलेल्या काटेरी केसांनी झाकलेले असते. आत तीन प्रकारची फुले असतात – नरफुले, लांब कुक्षीची मादीफुले आणि आखूड कुक्षीची मादी (gall) फुले. परागीकरण गांधील माशीद्वारे (Blastophaga wasp) होते. हे कीटक छिद्रातून कुंभात प्रवेश करतात आणि गालफुलाच्या बिजांड्यात अंडी घालतात. काटेरी केसांमुळे त्या गांधील माशीला आल्यामार्गे बाहेर पडता येत नाही व ती आतच फिरत राहते. बाहेरून आत येताना तिच्या शरीरावर अडकलेले परागकण अंडाशयावरील लांब कुक्षीवर पडून परागण होते. कालांतराने नरफुले विकसित होतात, परागकण मोकळे होतात आणि गांधील माशीच्या शरीराला चिकटतात. याच सुमाराला कुंभाच्या छिद्रामधील काटेरी केस गळून पडतात आणि गांधील माशी नव्याने शरीरावर गोळा झालेल्या परागकणांसह बाहेर पडते आणि अन्य ठिकाणी परागण करण्यास सिद्ध होते.
संदर्भ :
- https://www.cleariitmedical.com/2019/06/biology-notes-morphology-of-flowering-plants.html
- Video – https://www.youtube.com/watch?v=kctIFkVaZQs
समीक्षक : शरद चाफेकर