कोरनई, जानोस (Kornai, Janos) : (२१ जानेवारी १९२८ – १८ ऑक्टोबर २०२१). विख्यात हंगेरियन अर्थतज्ज्ञ. कोरनई यांचा जन्म बुडापेस्ट येथे एका सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण हंगेरीमधील जर्मन शाळेत झाले. त्या काळात हिटलरची हुकूमशाही अस्तित्वात होती. कोरनई १६ वर्षांचे असताना दुसऱ्या महायुद्धात त्यांचे वडिल व मोठे बंधू यांचे निधन झाले; मात्र ते बचावले. नाझीवाद्यांपासून स्वत:चे रक्षण व्हावे यासाठी ते कम्युनिस्ट बनले आणि एकोणिसाव्या वर्षी कम्युनिस्ट पक्षाच्या स्झॅपद नेप या केंद्रीय दैनिकाचे पत्रकार बनून काही काळ पत्रकारिता केली. कालांतराने स्टालीनवादी नेतृत्वावर टीका केल्यामुळे त्यांना पत्रकारिता सोडावी लागली. कोरनई यांनी १९५५ मध्ये हंगेरियन अकादमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी येथे १९६७ पर्यंत आधुनिक अर्थशास्त्राचा अभ्यास करून गणितीय अर्थशास्त्राचे ज्ञानार्जन केले. त्यानंतर १९६७ ते १९९२ या काळात त्यांनी बूडापेस्ट येथील प्रसिद्ध अर्थशास्त्र संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्य केले. सन १९९२ ते २००२ या दशकात ते हार्व्हर्ड विद्यापीठ, अमेरिका येथे प्राध्यापक पदावर अध्यापन, संशोधन आणि लेखन कार्यात मग्न होते. त्यानंतरही ते हार्व्हर्ड विद्यापीठ व बूडापेस्ट येथील कॉर्व्हिनस विद्यापीठ येथे सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून काम पाहात होते. जगातील अनेक ख्यातनाम विद्यापीठांशी ते अभ्यागत प्राध्यापक या नात्याने संबंधित होते. हंगेरियन नॅशनल बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ते १९८७ मध्ये यूरोपीयन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष होते.

कोरनई यांचे ‘प्रस्थापित आर्थिक सिद्धांत झुगारणारा अर्थतज्ज्ञ’ असे वर्णन करता येईल. अर्थशास्त्राचे विवेचन आणि विश्लेषण केवळ सिद्धांतानुसारी असण्यापेक्षा ते निरीक्षण आणि अनुभवावर आधारित असावे, असा त्यांचा कटाक्ष होता. समाजवादी राज्यव्यवस्था असलेल्या हंगेरीमध्ये असून त्यांनी आदेशित अर्थप्रणाली आणि नियोजित अर्थप्रणाली यांच्या आकृतिबंधावर टीका केली. समाजवादी अर्थव्यवस्थांमध्ये सतत टंचाई – कमतरता यांचा अनुभव येतो. ते तात्पुरते संकट किंवा असंतुलन नसून त्या यंत्रणेतील अंगभूत संरचनात्मक विसंगती आणि अपूर्णता यांचा परिणाम आहे, असे त्यांनी अभ्यासपूर्ण रीतीने मांडले. ‘कमतरतेचे अर्थशास्त्र’ हे त्यांचे विवेचन हे अर्थशास्त्रातील क्रांतिकारी आणि अभिनव योगदान मानले जाते. त्याच वेळेस ‘भांडवलशाही स्थिर समतोलात येऊ शकते हेही तितकेसे खरे नाही’ असे प्रतिपादन त्यांनी केले. आर्थिक नियोजनाच्या प्रतिमानामध्ये गणिती तंत्राचा कसा वापर करता येतो, हे त्यांनी इकोनोमेट्रिका या प्रतिष्ठित नियतकालिकातील १९६५ सालच्या एका शोधनिबंधात स्पष्ट केले होते. समाजवाद आणि भांडवलशाही यांचा समन्वय साधणारा बाजाराधिष्ठित समाजवाद यशस्वी होणार नाही, असे त्यांचे भाकित होते.

भारतासारख्या अर्थव्यवस्थेत बाजाराधिष्ठित समाजवाद यशस्वी झाला नाही आणि विसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी तर समाजवादी अर्थव्यवस्थाही लयाला गेली. सप्टेंबर १९८८ ते डिसेंबर १९९१ या काळात सोव्हिएट रशियासारख्या पारंपरिक समाजवादी अर्थव्यवस्थेचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन त्यातून पंधरा स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रे निर्माण झाली. आदेशित अर्थव्यवस्थांमध्ये जर उचित नियमन / नियंत्रण व्यवस्था नसेल, तर नोकरशाहीचा वरचष्मा वाढत जाऊन तेथे गंभीर समस्या निर्माण होतील, असे कोरनई यांनी केलेले प्रतिपादन प्रत्यक्षात खरे ठरलेले आढळते. एकविसाव्या शतकात तर पूर्व यूरोपातील बहुतेक सर्व अर्थव्यवस्थांनी पारंपरिक समाजवादी नियंत्रित व्यवस्था दूर सारून खुलेपणा, आर्थिक सुधारणा, बाजार यंत्रणा, उदारीकरण यांचा स्वीकार केलेला दिसतो. जगात व विशेष करून समाजवादी देशांमध्ये ही जी संरचनात्मक स्थित्यंतरे झाली, त्यामागे कोरनई यांच्या लेखनाचा प्रभाव होता. चीनमधील आर्थिक सुधारणांच्या मागेही त्यांच्या लेखनाची प्रेरणा होती. कोरनई यांचे १९९० नंतरचे लेखन बाजार यंत्रणा आणि खासगीकरण यांची भलावण करणारे आढळते.

कोरनई यांनी १९७५ मध्ये भारतास भेट दिली आणि भारतातील पंचवार्षिक योजनांचा आकृतिबंध त्यांनी बारकाईने अभ्यासला होता. जानेवारी १९८६ मध्ये त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबईत तिसरे सी. डी. देशमुख स्मृती व्याख्यान दिले होते. सार्वजनिक क्षेत्राला अधिक व्यावसायिकता आणि स्वायत्तता यांची गरज आहे, असे त्यांनी हंगेरीतील आपल्या अनुभवावरून त्या भाषणात म्हटले होते. त्यांचे फोर्स ऑफ थॉट हे वैचारिक आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

कोरनई यांनी एकूण ३४ पुस्तके लिहिली. त्यांची अनेक पुस्तके जगातील विविध भाषांत भाषांतरित झाली आहेत. त्यांची प्रमुख पुस्तके पुढीलप्रमाणे : ओव्हर सेंट्रलायझेशन इन इकॉनॉमिक ॲडमिनिस्ट्रेशन, १९५३; अँटि-इक्विलिब्रिअम, ९१७१; रश व्हरसस हार्मोनिक ग्रोथ, १९७२; इकॉनॉमिक्स ऑफ शॉर्टेज, १९८०; द सोशिॲलिस्ट सिस्टिम : द पोलिटिकल इकॉनॉमी ऑफ कम्युनिझम, १९८८; रोड टू फ्री इकॉनॉमी, १९९०; हायवेज अँड बायवेज, १९९५; स्ट्रगल अँड होप, १९९७; वेलफेअर इन ट्रान्झिशन, २००१; फोर्स ऑफ थॉट, २००६; फ्रॉम सोशिॲलिझम टू कॅपिटॅलिझम, २००८; डायनामिझम, रिव्हलरी अँड द सर्प्लस इकॉनॉमी, २०१३ इत्यादी.

संदर्भ :

  • विल्क्झीन्स्की, जोसेफ; अनु., दास्ताने, संतोष, समाजवादाचे अर्थशास्त्र, १९८१.
  • Frontline Magazine, Vol. 38, 2021.

समीक्षक : सुनील ढेकणे