गॉवर, जॉन : (१३३०? – १४०८). मध्ययुगीन इंग्रजी कवी. जेफ्री चॉसर या सुप्रसिद्ध साहित्यिकाचा समकालीन. तो आजही त्याच्या प्रामुख्याने स्पेक्युलुम मेदितांतिस किंवा मिर्‌वार द लॉम  (फ्रेंच), व्हॉक्स क्लेमँटिस (लॅटिन) आणि कन्फेशिओ आमांतिस (इंग्रजी) या प्रदीर्घ काव्यासाठी प्रसिद्ध आहे. जॉन गोवरच्या कुटुंबाबद्दल आणि आणि त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. बहुधा गॉवर यॉर्कशायर परगण्यातून लंडन येथे आला असावा. तो न्यायालयीन कामकाज बघणारा अधिकारी असावा. त्याने लंडन येथे न्यायालयीन कामाचा सराव केला असावा. गॉवरच्या उत्पन्नाचे स्त्रोत एक गूढ राहिले आहे. त्याच्या संदर्भातील तपशील प्रामुख्याने त्याच्या साहित्यकृतींमधून प्रतिबिंबित झालेला आहे. गॉवर हा दुसरा रिचर्ड  (कन्फेशिओ आमांतिसच्या प्रस्तावनेत उल्लेख) आणि चौथा हेन्री (ज्याला कन्फेशिओ आमांतिसच्या आवृत्त्या समर्पित करण्यात आल्या होत्या) यांना भेटत होता. चौथा हेन्री याने  त्याला निवृत्तिवेतनही दिलेले होते. जॉन गॉवरची जेफ्री चॉसरशी असलेल्या मैत्री संदर्भातील पुरावे उपलब्ध आहेत. जेव्हा चॉसरला १३७८ मध्ये इटलीला मुत्सद्दी म्हणून पाठवण्यात आले होते तेव्हा चॉसरने जॉन गॉवरला इंग्लंडमधील त्याचा कारभार चालविण्यासाठी मुखत्यारपत्र दिले होते. दोन्ही कवींनी त्यांच्या कवितांमधून एकमेकांची प्रशंसा केलेली आहे. चौसरने त्याला नैतिक गॉवर म्हणून गौरवले होते. त्याने प्रामुख्याने रूपककथेचा (allegory) वापर आपल्या धार्मिक, राजकीय, ऐतिहासिक आणि नीतीपर कवितांमध्ये केलेला आहे. १३७० च्या सुमारास जॉन गॉवर सेंट मेरी ओवेरी (सध्याचे साउथवार्क कॅथेड्रल) येथे वास्तव्यास आला आणि १३९८ मधे येथे राहत असतांनाच त्याने (कदाचित दुसऱ्यांदा) एग्नेस ग्राउंडॉल्फ हिच्याशी लग्न केले. त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात आणि बहुदा १४०० च्या सुरुवातीला तो अंध झाला. एग्नेस ग्राउंडॉल्फने त्याला त्याच्या कठीण काळात आधार दिला.

स्त्रोत : National Portrait Gallery, London.

जॉन गॉवरची पहिली ज्ञात दीर्घ कविता स्पेक्युलुम मेदितांतिस किंवा मिर्‌वार द लॉम (Speculum Meditantis, or Mirour de l’omme,१३७६-१३७९, मानवाचा आरसा) फ्रेंचमध्ये आहे. यात अंदाजे ३०००० ओळी आहेत आणि १२ ओळीच्या कडव्याची रचना आहे. सैतानाने पापाच्या ७ मुलींशी केलेल्या लग्नाच्या वर्णनाने या काव्याची सुरुवात केली गेली आहे. यातील प्रमुख केंद्रविषय म्हणून धर्म आणि नैतिकता यांचा समावेश होतो. जॉन गॉवरची दुसरी दीर्घ कविता लॅटिनमध्ये व्हॉक्स क्लामांतिस (Vox Clamantis, १३८२) सुमारे १०१०० ओळीत रचलेली आहे. रोमन कवी ओविड याचा या कवितेवर प्रकर्षाने प्रभाव जाणवतो. ही कविता मूलत: राजा आणि समाजासाठी एक उपदेशपाठ (प्रवचन) आहे. यात जॉन गॉवरने मांडलेले राजकीय सिद्धांत पारंपारिक असले तरीही त्याची लॅटिन भाषेवरील पकड, तिचा ओघवत्या शैलीतील अभिजात वापर प्रशंसनीय आहे. जॉन गॉवरची तिसरी दीर्घ कविता कन्फेशिओ आमांतिस (Confessio Amantis,१३९३,प्रेमीकांची कबुली) सुमारे ३०,००० ओळींची द्विपदी (couplets) स्वरूपात रचली गेली. यात ख्रिश्चन धर्मात सांगितल्याप्रमाणे प्रेमाविरुद्ध पापांचा कबुलीजबाब नोंदविला गेला आहे. त्यासाठी प्रेमीकांच्या वैयक्तिककथा या कवितेत सांगितल्या गेल्यात. त्याच्या अगोदरच्या कवितांप्रमाणेच प्रस्तुत कविता नैतिकता या विषयाशी केंद्रित आहे. अनेक समीक्षकांच्या मते कन्फेशिओ आमांतिसने जॉन गॉवरची काव्यात्मक प्रतिमा आणि प्रतिष्ठा सर्वदूर पोहोचवली. कन्फेशिओ आमांतिसची एकोणपन्नास (४९) पूर्ण हस्तलिखिते अस्तित्वात होती.

जॉन गॉवरच्या इतर साहित्यिक कृतींमध्ये ट्रेटे पेर एस्साम्प्लर लेस अमैंट्स मारिएट्ज़ (Traité pour essampler les amantsmarietz,१३९७,फ्रेंच भाषेत विवाहित प्रेमीकांसाठी ग्रंथ); सिंकांटे बालेड्स (Cinkante Balades) (१३९९-१४००, फ्रेंच भाषेतील पोवाड्यांची मालिका); क्रोनिका ट्रिपर्टिटा (Cronica Tripertita,१४००,लॅटिन भाषेतील कविता) आणि इन प्रेझ ऑफ पीस (In praise of peace, इंग्रजी भाषेतील एक राजकीय कविता ज्यामध्ये चतुर्थ हेन्रीची इंग्लंडचा तारणहार म्हणून प्रशंसा केलेली आहे) आदीचा समावेश होतो.

जॉन गॉवरने आपले प्रमुख काव्य फ्रेंच, इंग्रजी आणि लॅटिन भाषेमध्ये लिहिले आहे. याचबरोबर त्याने इंग्रजी न्यायालयातील अधिकाऱ्यांच्या रंजनासाठी फ्रेंच भाषेत पोवाड्यांची मालिका देखील लिहिली आहे. पोवाड्यांतील त्याच्या सौहार्दपूर्ण स्वरापासून ते नैतिक आणि तत्त्वज्ञानाच्या स्वरापर्यंतचा प्रवास त्याच्या प्रमुख कवितांमधून उलगडत जातो आणि त्याचा काव्यात्मक प्रवास समजण्यासही मदत होते. एकंदरीतच मानव आणि समाजाच्या स्वरूपावर तसेच वैयक्तिक सद्‌गुण, कायदेशीर न्याय आणि प्रशासकीय जबाबदारी यावर पद्धतशीर चर्चा त्याने आपल्या काव्यातून केलेली आहे. गॉवरच्या काव्यात काव्यगुणांपेक्षा कारागिरीचाच प्रत्यय अधिक येतो. केवळ रचनेची सफाई व भाषेचा अप्रतिहत ओघ हेच त्याचे प्रमुख गुण. चॉसरचा नर्मविनोद आणि वैशिष्ट्यपूर्ण उपरोध त्याच्या काव्यात नाही मात्र मध्ययुगीन जीवनदृष्टी आणि कलामूल्ये ह्यांचा तो एक लक्षणीय प्रतिनिधी आहे. १९०१ मध्ये जि. सी. मॅकॉलेने गॉवरच्या पूर्ण वाङ्मयीन कारकिर्दीसंदर्भात आवृत्ती प्रकाशीत केल्यानंतर जॉन गॉवरला साहित्यिक म्हणून अधिक मान्यता मिळाली.

१४०० मध्ये गॉवरने स्वतःचे “वृद्ध आणि अंध” म्हणून वर्णन केल्याची नोंद आहे आणि २४ ऑक्टोबर १४०८ रोजी त्याच्या मृत्युपत्रात नोंदवल्या प्रमाणे आपली सर्व संपत्ती त्याने साउथवर्क प्रियोरीला (चर्चचा पथिकाश्रम) प्रदान केली. साउथवर्क येथे तो निधन पावला आणि त्याच भूमीत त्याला दफन केले गेले.

 संदर्भ :

  •  https://www.britannica.com/biography/John-Gower. Accessed 1 August 2021.

समीक्षण :  लीना पांढरे