वाइक्लिफ, जॉन : (१३३० – ३१ डिसेंबर १३८४). जॉन विक्लिफ. प्रसिद्ध मध्ययुगीन इंग्रजी साहित्यिक आणि धर्मोपदेशक. चौदाव्या शतकातील प्रसिद्ध विद्वान, पंडित, तत्त्वज्ञ, अनुवादक आणि शिक्षक अशी त्याची ओळख आहे. त्याने सर्वप्रथम बायबलचे इंग्रजीमध्ये पूर्ण भाषांतर करण्यास सुरुवात केली. त्याचा जन्म नॉर्थ राइडिंग ऑफ यॉर्कशायर येथे झाला. त्याने १३६० मध्ये बॅलिओल येथे कला शाखेचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते आणि येथेच त्याला महाविद्यालयाचे मास्टर म्हणून नियुक्त करण्यात आले. पुढे त्याने फिलिंगहॅमचा धर्मोपदेशक होण्यासाठी १३६१ मध्ये महाविद्यालयाचा राजीनामा दिला. त्यानंतर १३६३ आणि १३६८ मध्ये लिंकनच्या वरिष्ठ धर्मगुरूकडून जॉन वाइक्लिफला ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकण्याची परवानगी मिळाली. तदनंतर जॉन वाइक्लिफला १३६९ मध्ये बॅचलर ऑफ डिव्हिनिटी (देव व धर्मशास्त्रातील पदवीधारक) आणि १३७२ मध्ये डॉक्टर ऑफ डिव्हिनिटी (विद्यावाचस्पती)या पदव्या प्राप्त झाल्या.

स्त्रोत : National Portrait Gallery, London.

त्याने आपले जीवन धर्मशास्त्रीय विषयांच्या लेखनासाठी समर्पित केले होते. तो असा धर्मशास्त्र अभ्यासक, तत्त्ववेत्ता आणि धर्मसुधारक होता की ज्याने त्याच्या काळात चर्चमध्ये अस्तित्वात असलेल्या विविध चुकीच्या रूढी परंपरावर टीका केली. पुढे तो इंग्रजीमधील बायबलच्या पहिल्या पूर्ण अनुवादाचा प्रवर्तक बनला. बायबल हे मुळात लॅटिन भाषेत होते आणि म्हणून जे लोक शिक्षित नव्हते त्यांना ते समजणे अशक्य होते. जॉन वाइक्लिफने सामान्य लोकांना ज्ञात असणाऱ्या सरळ – सोप्या,सुलभ इंग्रजी भाषेत बायबलचे भाषांतर करण्याचा सल्ला दिला. जॉन वाइक्लिफ हा प्रोटेस्टंट सुधारणेचा अग्रदूत होता. त्याने विकसित केलेल्या राजकीय-धर्मशास्त्रीय सिद्धांतांमुळे चर्चला त्याच्या ऐहिक संपत्तीचा त्याग करणे भाग पडले होते. त्यानुसार त्याने चर्चच्या कार्यपद्धतींवर पद्धतशीर टीका करण्यास सुरुवात केली. त्याच्यामते धर्मग्रंथ हे देवाबद्दलच्या सत्यासाठी एकमेव अधिकृत विश्वसनीय मार्गदर्शक स्रोत आहे आणि त्यामुळेच त्याने बायबलचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यास सुरुवात केली.

७ एप्रिल १३७४ रोजी तिसऱ्या एडवर्डने लुक्झरशॉलच्या जागी जॉन वाइक्लिफला लटरवर्थच्या रेक्टरीमध्ये (चर्चमधील आधिशिक्षकांच्या निवासस्थान) मुख्याधिष्ठाता म्हणून नियुक्त केले. ऑगस्ट १३८० ते १३८१ च्या उन्हाळ्यापर्यंत तो क्वीन्स कॉलेजमधे राहिला आणि त्याने स्वतःला बायबलच्या भाषांतराच्या कामाला वाहून घेतले होते. १३८१ मध्ये तोलटरवर्थच्या रेक्टरी मधून सेवानिवृत्त झाला. याच वर्षी कामगार वर्गाचा असंतोष उफाळून आला आणि कामगारांनी विद्रोह केला. त्याने आपली सहानुभूती कामगार वर्गाच्या प्रती व्यक्त केली होती आणि गरीबांबद्दल त्याला नेहमीच प्रेम राहिले होते.

जॉन वाइक्लिफ हा एक धर्मसुधारक असल्याने त्याने चर्चमधील भ्रष्टाचारावर सडेतोड टीका केली. धर्मग्रंथ वाचताना सामान्य लोकांना येणाऱ्या अडचणींविषयी त्याने जाणून घेतले. जॉन वाइक्लिफने सांगितले की सर्वात महत्वाचा धार्मिक अधिकार चर्च नसून बायबल हा आहे. यातूनच त्याने बायबलचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यास सुरुवात केली. ज्या गटाने – अनुयायांनी त्याच्या विचारांचे समर्थन केले त्यांना लॉलार्ड्स म्हणतात. मात्र चर्चने त्याकाळी अशा अनुयायांना धर्मद्रोही ठरवून त्यांचा छळ केला. जॉन वाइक्लिफ एका अर्थाने भाग्यवानच ठरला कारण त्याकाळी त्याला धर्मभ्रष्ट अथवा धर्मविरोधक म्हणून जाळले गेले नाही. मे १३८२ मध्ये जॉन त्याचा ब्लॅकफ्रायर्स कौन्सिलमध्ये निषेध करण्यात आला होता. राजेशाही आणि चर्चच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी त्याला वारंवार बोलावले गेले मात्र आयुष्यभर त्याला त्याच्या मित्रांनी संरक्षण दिले.

जॉन वाइक्लिफच्या साहित्यकृतीत वाइक्लिफस बायबल  उल्लेखनीय आणि जगप्रसिद्ध आहे. त्याच्या इतर साहित्यिक योगदानात: द लास्ट एज ऑफ द चर्च (१३५६), डी लॉजिका (ऑन लॉजिक,१३६०), डी युनिव्हर्सलिबस (ऑन युनिव्हर्सल,१३६८), डी डोमिनियो डिव्हिनो (१३७३), डी मांडाटिस डिव्हिनीस (१३७५), डी स्टेटु इनोसेन्सी (१३७६), डी सिव्हिली डोमिनियो  (१३७७), रिस्पॉन्सिओ (१३७७), डी एक्लेशिया (१३७८), ऑन द पास्टरल ऑफिस (१३७८), डी अपोस्टेसिया (१३७९), डी यूकेरिस्टिया (१३७९), ट्रायलॉगस  इ. चा समावेश होतो. त्याचे शेवटचे  ऐतिहासिक पुस्तक ओपस इव्हँजेलिकम अपूर्ण राहिले.

जॉन वाइक्लिफने १४व्या शतकातील इंग्लंडच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपले अर्थपूर्ण स्थान निर्माण केले. त्याने केलेल्या लिखाणाचा प्रभाव शेकडो वर्षे समाज मनावर टिकून राहिला. त्याच्या कल्पनांनी इंग्लंडमध्ये झालेल्या धार्मिक सुधारणेचा पाया घातला होता. त्याने बऱ्याच धार्मिक बाबीबद्दल दिलेली शिकवण कॅथोलिक चर्चने धर्मनिष्ठ मानली. त्यामुळेच १६व्या शतकात ‘द मॉर्निग स्टार ऑफ द रिफॉर्मेशन’ (सुधारणेचा तारा) म्हणून जॉन वाइक्लिफला गौरवण्यात आले.

झेक सुधारक जॅन हसच्या (१३६९-१४१५) तत्त्वज्ञान आणि शिकवणूकीवर जॉन वाइक्लिफच्या लॅटिन भाषेतील लिखाणाचा खूप प्रभाव जाणवतो. अनेक संस्थांची नावे त्याच्या नावावरून दिली गेली आहेत उदा. वाइक्लिफ ग्लोबल अलायन्स ; वाइक्लिफ हॉल -ऑक्सफर्ड ; वाइक्लिफ कॉलेज- टोरोंटो आणि वाइक्लिफ कॉलेज-ग्लॉस्टरशायर इत्यादी.

१३८२ मध्ये जॉन वाइक्लिफला लटरवर्थ येथे पहिला लकवा आला होता तरीही तो लिहितच राहिला. डिसेंबर १३८४ मध्ये पुढील लकव्यामुळे मात्र त्याला लिखाण थांबवावे लागले. त्याचे १३८४मधे निधन झाले. परंतु त्याचे क्रांतीकारी विचार आजही स्फुर्तीदायी व चिरंतन आहेत.

संदर्भ :

  • https://www.britannica.com/biography/John-Wycliffe. Accessed 1 August 2021.

समीक्षण : लीना पांढरे