बक,पर्ल : (२६ जून १८९२ – ६ मार्च १९७३). साहित्यातील नोबेल पुरस्कारप्राप्त अमेरिकन कादंबरीकार. पर्लचा जन्म पश्चिम व्हर्जिनियातील हिल्सबोरो येथे सायडेनस्ट्रिकर या धर्मप्रचारक कुटुंबात झाला. वडील चीनमध्ये धर्मोपदेशक असल्याने तिचे बालपण चीनमध्ये गेले. पर्लचे सुरुवातीचे इंग्रजीचे शिक्षण तिच्या आईकडे व चीनी भाषेचे शिक्षण कुंग यांच्याकडे झाले. १५ वर्षांची असताना पर्ल शांघाय येथील एका बोर्डिंग शाळेत शिकायला गेली. त्यानंतर अमेरिकेत येवून तिने लिंचबर्ग (व्हर्जिनिया) येथील रँडॉल्फ-मेकन महिला महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९१४ मध्ये पदवी संपादन करून ती ६ महिने मानसशास्त्राची शिक्षिका म्हणून कार्यरत होती. १९१७ मध्ये तिने जॉन बक या धर्मप्रचारकाशी विवाह केला. १९२५ मध्ये तिने कलेतील स्नातकोत्तर पदवी संपादन केली. १९२१ ते १९३१ या काळात तिने नानकिंग विद्यापीठात शिक्षिका म्हणून नोकरी केली. १९३५ मध्ये जॉन बक पासून घटस्फोट घेऊन पर्लने रिचर्ड वॉल्श या तिच्या जॉन डे पब्लिशर्स मधील संपादक-सहकाऱ्याशी विवाह केला व ती अमेरिकेला परतली. तिच्या पहिल्या लग्नाची एक मुलगी (कॅरल) व एक दत्तक घेतलेली मुलगी (जॅनिस) असून रिचर्ड बरोबरच्या संसारात पर्लने ६ मुले दत्तक घेतली. पुढे अमेरिकन सैनिक व आशियायी महिला यांच्या अपत्यांना दत्तक घेणे सोयीचे व्हावे म्हणून पर्लने पती रिचर्ड आणि इतर सहकाऱ्यांबरोबर वेलकम हाऊस नावाची संस्था सुरु केली. या कार्यात ती एवढी गुंतून गेली की १९६४ मध्ये पर्ल एस. बक फाउंडेशन नावाची संस्था स्थापन करून तिने ७ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली. म्हणजेच पर्लने जवळ जवळ आपल्या आयुष्यभराची पूंजी त्या संस्थेला दान केली. १९६० मध्ये रिचर्डचा मृत्यू झाला व पर्लची थिओडोर हॅरिस नामक नृत्य प्रशिक्षकाशी घनिष्ट मैत्री झाली. हॅरिस तिचा आर्थिक सल्लागारही झाला आणि पर्ल त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून राहू लागली. पुढे हॅरिसवर संस्थेच्या निधीमध्ये अफरातफर केल्याचा आरोप ठेवण्यात आला; परंतु पर्लने ते अमान्य केले. एवढेच काय पण पर्लने तिच्या मृत्यूआधी हॅरिसच्या अखत्यारीत असलेल्या संस्थेला मोठी देणगी दिली ज्यामुळे तिच्या परिवाराला तिच्या मालमत्तेतील फारच कमी वाटा मिळाला. पर्लच्या मृत्यूनंतर तिच्या परिवाराने तिच्या मृत्युपत्रावर आक्षेप घेतला. हॅरिस खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने पर्लच्या परिवाराच्या बाजूने निकाल दिला.
पर्लचे बालपण व पहिल्या विवाहानंतरची वर्षे चीन मध्येच गेली. १९०० साली झालेल्या बॉक्सर उठावात पर्लच्या आईने मुलांना घेऊन शांघाय मध्ये आश्रय घेतला. पर्लच्या वडिलांनी मात्र चीनी लोकांवरच्या विश्वासापोटी जेन्ज्यांग मधले राहते घर सोडण्यास नकार दिला. असाच आग्रह त्यांनी पुढे १९२७ सालच्या नानकिंग इंसिडेन्ट मध्ये धरला. मात्र त्या वेळी चीनी बंडखोरांनी त्यांच्या घरावर हल्ला करून लुटालूट केल्याने पर्ल व तिच्या कुटुंबाला जीव वाचवण्यासाठी एका चीनी कुटुंबाच्या झोपडीत लपावे लागले. असे अनुभव आले असूनही पर्लला चीन व चीनी लोकांबद्दल खूप आत्मीयता होती. गोऱ्यांच्या वर्तनात चीनी लोकांबद्दल असलेला वर्णद्वेष तिला पटत नसे. चीनी संस्कृतीबद्दलचे पर्लचे आकर्षण व प्रेम तिच्या लिखाणातून व्यक्त होते. पुढे १९३५ मध्ये पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतल्यानंतरही पर्ल ने ‘बक’ हे आडनाव व्यावसायिक क्षेत्रात वापरले.
१९२२ पासून पर्लने मासिकांत लघुकथा व लेख लिहिण्यास सुरुवात केली. १९३० मध्ये ईस्ट विंड, वेस्ट विंड ही तिची पहिली कादंबरी प्रकाशित झाली. १९३१ मध्ये द गुड अर्थ ही पर्लची पुलित्झर पुरस्कृत कादंबरी प्रकाशित झाली. १९३२ मध्ये सन्स व १९३५ मध्ये अ हाऊस डिव्हाइडेड ह्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या व पुढे ही त्रयी (trilogy) द हाऊस ऑफ अर्थ या नावाने १९३५ मध्ये प्रकाशित झाली. या लेखनाबद्दल आणि स्वतःच्या आई व वडिलांच्या चरित्र लेखनाबद्दल पर्लला १९३८ मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. अमेरिकन साहित्यात नोबेल पुरस्कार मिळवणारी पर्ल ही पहिली महिला ठरली.
१९७३ पर्यंत पर्लची जवळपास ७० पुस्तके प्रकाशित झाली. यामध्ये ड्रॅगन सीड (१९४२), इंपिरियल वूमन (१९५६) या कादंबऱ्या, लघुकथासंग्रह, द वॉटर बफेलो चिल्ड्रेन (१९४३) व द ख्रिसमस घोस्ट (१९४३) ही लहान मुलांची पुस्तके, जॉन सेजेस या टोपणनावाखाली ५ कादंबऱ्या, नाटकं, व मरणोत्तर प्रकाशित झालेली कादंबरी द इटर्नल वंडर (२०१३), या व्यतिरिक्त वास्तववादी लेखनामध्ये आपल्या आईचे द एक्झाइल (१९३६) व वडिलांचे द फायटिंग एंजेल (१९३६) ही चरित्रे, मानसिकदृष्ट्या अक्षम असलेल्या कॅरल या स्वतःच्या मुलीबद्दल द चाईल्ड हू नेव्हर ग्रू (१९५०), व माय सेव्हरल वर्ल्ड्स (१९५४) हे आत्मचरित्र, चायना ॲज आय सी इट (१९७०) हे चीन व अमेरिकेबद्दलचे भाष्य व आशियायी पाकशास्त्राबद्दल असलेले पर्ल एस. बक्स ओरिएंटल कूकबूक (१९७२) यांचा समावेश होतो.
द गुड अर्थ ही वांग लुंग व त्याची पत्नी ओ-लान या चीनी शेतकरी जोडप्याची कथा आहे. त्यांना आयुष्यात आलेले अनुभव, अडचणी, व त्यावर केलेली मात यांचे चित्रण पर्लने या कादंबरीत केले आहे. खडतर कष्ट व उपासमार सहन करून, एका प्रसंगी दंगेखोर जमावाबरोबर एका श्रीमंत घरात घुसून काही दागिने चोरून, ओ-लान हरतऱ्हेने स्वतःच्या संसाराला हातभार लावते. ओ-लान स्वतःसाठी चोरलेल्या दागिन्यातील फक्त २ मोती ठेऊन घेते. वांग लुंगला आयुष्यभर ओ-लान साथ देते; परंतु पुढे आर्थिक समृद्धी आल्यावर वांग लुंग श्रीमंतांचे सगळे छंद जोपासतो. लोटस नावाची स्त्री उपपत्नी म्हणून घरी आणून ठेवतो व ओ-लानने स्वतःसाठी मागितलेले मोती तो लोटसला देऊन टाकतो. पुढे त्याला कळते की लोटस त्याच्या मोठ्या मुलाशी संबंध ठेऊन वांग लुंगला फसवत असते. ओ-लानच्या मृत्यूनंतर कौटुंबिक कलहामुळे वांग लुंगच्या आयुष्यातले स्वास्थ्य संपते. कादंबरीच्या अखेरीस वांग लुंगच्या मुलांच्यात त्याच्या इच्छेविरुद्ध शेतजमीनी विकून पैसे आपसात वाटून घ्यायचा निर्णय झालेला दिसून येतो.
सन्स ही कादंबरी या त्रयीचा दुसरा भाग आहे. वांग लुंगचा थोरला मुलगा जमिनदार, दुसरा व्यापारी आणि सावकार, तर धाकटा वांग हा सशस्त्र टोळीत सामील झालेला असतो. त्यांच्या लेखी वांग लुंगने आयुष्यभर जपलेली जमीन आता केवळ एक श्रीमंतीचे साधन बनून राहिली आहे. त्यांच्यातला कौटुंबिक कलह हा चीनमध्ये घडणाऱ्या सामाजिक क्रांतीचे प्रतीक म्हणुन पाहायला हरकत नाही. हाच दुवा अ हाऊस डिवाईडेड मध्ये दिसून येतो. वांगचा मुलगा वांग युआन हा आपल्या पित्याच्या विचारधारेशी फारकत घेऊन आपल्या मातीशी पुन्हा संबंध जोडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. ६ वर्ष अमेरिकेत राहिलेला युआन द गुड अर्थ व सन्स मधील महत्त्वाच्या टप्प्यांची उजळणी करत अंततः जुने व नवीन यांचा मेळ लावण्यास शिकतो. परंपरा व आधुनिकता यांची कास धरून युआन त्याच्या कुटुंबात अखेर समझोता घडवून आणतो.
द गुड अर्थ ही कादंबरी जरी अमेरिकेत व जगभरात नावाजली गेली तरी चीन मध्ये तिच्यावर टीका झाली. अमेरिकी साम्राज्यवादामुळे व धर्मप्रचारकांच्या कृत्यांमुळे झालेले चीन व चीनी संस्कृतीच्या नुकसानाबद्दल पर्ल उल्लेख करत नाही; पर्लने केलेले चीनचे चित्रण वास्तवाशी विसंगत असून चीनी संस्कृती व समाजाबद्दल दिशाभूल करणारे आहे असा आक्षेप घेतला गेला. या उलट वाचकांच्या मते पर्लने चीनी समाजाचे अत्यंत बारीक पैलू टिपले आहेत जे खुद्द चीनी लेखनातही आढळत नाहीत कारण त्या बाबींवर वेगळे भाष्य करण्याची त्यांना गरज भासत नाही.
पर्लने तिच्या लेखनातून माओ त्से तुंगवर केलेली टीका व अमेरिकेच्या चीनबद्दलच्या धोरणामुळे पर्ल पुन्हा चीनला कधीही परतू शकली नाही. या गोष्टीची तिला आयुष्यभर खंत होती. १९४९ मध्ये चीन मध्ये साम्यवादी राजवट लागू झाली आणि पर्लच्या पुस्तकांवर बंदी घालण्यात आली. ही बंदी १९९४ पर्यंत कायम होती. सध्या पर्लच्या साहित्यावर चीनमध्ये जरी बंदी नसली तरी अजूनही पूर्णपणे त्यास स्वीकृतीही मिळालेली नाही. चीनी अभ्यासकांना आशा आहे की ही स्थिती लवकरात लवकर बदलून पर्लच्या लेखनाला योग्य तो न्याय दिला जाईल.
फुफ्फुसाच्या कर्करोगाने ऐंशीव्या वर्षी पर्लचे निधन झाले.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/literature/1938/buck/biographical/
- https://www.britannica.com/biography/Pearl-S-Buck
- https://www.encyclopedia.com/arts/educational-magazines/good-earth
- https://notevenpast.org/good-earth-1931/
- https://www.washingtonpost.com/archive/lifestyle/1992/04/05/pearl-bucks-return-to-the-good-earth/c5e5ef90-ccd8-4546-8b8b-d66fc730351c/
- https://www.theatlantic.com/international/archive/2012/08/what-the-remarkable-legacy-of-pearl-buck-still-means-for-china/260918/