बायर, फ्रिद्रिक : (२१ एप्रिल १८३७ – २२ जानेवारी १९२२). डॅनिश मुत्सद्दी व १९०८ च्या  शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. जन्म व्हेस्टर एगोंद (झीलंड) येथे. काही काळ त्याने सेनादलात काम केले. पुढे त्याने फ्रेंच, स्वीडिश, नॉर्वेजियन इ. भाषांचा अभ्यास केला आणि नंतर अध्यापनाचे कार्य अंगीकारले. फ्रेदेरीक पासी याने स्थापन केलेल्या शांताता लीगला त्याने सक्रिय पाठिंबा दिला आणि स्कँडिनेव्हियन देशांत (स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, फिनलंड व आइसलंड) किमान भाषिक क्षेत्रात सलोखा करून संयुक्त करार घडवून आणण्याचा त्याने प्रयत्न केला. कोपनहेगन येथे उदारमतवादाच्या प्रसारासाठी संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेऊन त्याने राजकारणात पदार्पण केले (१८६९).

RETUSCHERAD

तो डॅनिश राष्ट्रीय संसदेचा १८७२ ते १८९५ दरम्यान सदस्य होता. तेथे त्याने स्कँडिनेव्हियन देशांतर्गत शांततामय सहजीवनाचा पुरस्कार केला. कोपनहेगनच्या तटबंदीला होणाऱ्या खर्चाला मात्र त्याने विरोध केला. स्त्री-मुक्ती-आंदोलनास चालना मिळावी म्हणून त्याने डॅनिश वुमेन्स ॲसोसिएशनची स्थापना केली (१८७१). डेन्मार्कच्या संरक्षणासाठी तटबंदी व शस्त्रपुरवठा यांवर भर देण्यापेक्षा नॉर्डिक तटस्थतेस आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून हा सुरक्षिततेचा प्रश्न शांततामय मार्गाने हाताळावा, असे मत त्याने मांडले. त्यासाठी सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ डॅनिश न्यूट्रॅलिटी या संस्थेची स्थापना केली (१८८२). या संस्थेचेच पुढे डॅनिश पीस ॲसोसिएशनमध्ये रूपांतर झाले (१८८५). दुसऱ्या महायुद्धानंतर ही घटना डॅनिश नेशन्स पीस ॲसोसिएशन या नावाने ओळखली जाऊ लागली. तटस्थतेच्या प्रश्नाचा सूक्ष्म अभ्यास करून जिनीव्हा येथील काँग्रेस ऑफ पीस सोसायटीज या परिषदेत परस्परांमध्ये सहकार्य असावे, या आशयाचा एक ठराव त्याने मांडला (१८८३). तो संमतही झाला. याचवेळी स्कँडिनेव्हियन देशांत समझोता करण्यासाठी त्याने अविश्रांत परिश्रम घेतले. या सर्व शांतता कार्यासाठी बर्न येथे त्याने एक आंतराराष्ट्रीय माहिती केंद्र स्थापन केले (१८९०). या केंद्राचा तो अनेक वर्षे अध्यक्ष होता. त्याने बर्न (१८८४) व पॅरिस (१८८९) येथील आंतरराष्ट्रीय शांततेच्या परिषदांत भाग घेतला आणि जागतिक शांततेचा हिरिरीने पुरस्कार केला. तसेच त्याने स्कँडिनेव्हियन ऑर्गनायझेशनची स्थापना केली (१९०७). त्यास १९०८ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक क्लास पोंटस आर्नुल्डसॉन याच्याबरोबर देण्यात आले.

शांतता कार्य करीत असताना त्याला बराच प्रवास घडला. या प्रवासात त्याने असंख्य पत्रे लिहिली. त्या पत्रांचा संग्रह प्रकाशित झाला (१८८६). तटस्थेतेसंबंधीचे आपले मौलिक विचार द स्कँडिनेव्हियन न्यूट्रॅलिटि सीस्टम (१९०६) या ग्रंथात त्याने मांडले आहेत. कोपनहेगेन येथे तो निधन पावला.

 

संदर्भ :

  • https://www.nobelprize.org/prizes/peace/1908/bajer/facts/