श्ट्रेझमान, गुस्टाव्ह : (१० मे १८७ – ८३ ऑक्टोबर १९२९). जर्मन उदारमतवादी मुत्सद्दी व जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी (१९२६). जन्म बर्लिन येथे. त्याच्या वडिलांचा हॉटेल-व्यवसाय होता. सुरूवातीचे शिक्षण बर्लिनमध्ये. लाइपसिक विदयापीठातून पदवी घेतल्यानंतर (१९००) तो वडिलोपार्जित व्यवसाय करू लागला. पुढे राष्ट्रीय उदारमतवादी पक्षाच्या कार्याकडे तो आकृष्ट झाला आणि जर्मनीच्या संसदेवर निवडून गेला (१९०७). पुढे या पक्षाचे नेतृत्व त्याच्याकडे आले. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत राजेशाही संपुष्टात आली तेव्हा त्याने जर्मन पीपल्स पक्षाची स्थापना केली. अखेरपर्यंत तो या पक्षाच्या अध्यक्षपदी होता.
जर्मन प्रजासत्ताकाच्या चान्सेलरपदी १९२३ मध्ये त्याची निवड झाली. पुढे डॉ. हान्ट्स ल्यूथर (कार. १९२५-२६) यांची चान्सेलरपदी नियुक्ती झाल्याने परराष्ट्रमंत्री म्हणून त्याने सहा वर्षे काम केले. त्याच्या या मंत्रिपदाच्या कारकीर्दीतच यूरोपच्या दृष्टीने महत्त्वाचे असे ऱ्हाईनलँड करार (१९२५) व लोकार्नो करार (१९२५) संमत झाले. या करारांसाठी श्ट्रेझमानने फ्रान्स व इंग्लंड यांना सहभागी करून घेतले. ऱ्हाईनलँडच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांसाठी इटली, चेकोस्लोव्हाकिया, फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, ग्रेट ब्रिटन आणि पोलंड या देशांची लोकार्नो (स्वित्झर्लंड) येथे (५ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर १९२५) परिषद झाली. तिचा मुख्य उद्देश यूरोपात स्थायी स्वरूपाची शांतता प्रस्थापित करणे हा होता. जर्मनी व अन्य राष्ट्रांत समझोता व सहकार्याची भावना निर्माण करणे आवश्यक होते. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीकडे जितराष्ट्र म्हणून पाहिले जात होते. यावेळी प्रथमच जर्मनी एक मित्रराष्ट्र म्हणून या परिषदेत सहभागी झाले. परिषदेत सात करारांवर संबंधित राष्ट्रांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. त्यांपैकी ऱ्हाईनलँड सुरक्षा करार हा अत्यंत महत्त्वाचा होता. जर्मनी, फ्रान्स व बेल्जियम यांनी परस्परांबरोबर युद्ध न करण्याचा तह केला आणि ऱ्हाईनलँड हा टापू ‘ तटस्थ प्रदेश ’म्हणून जाहीर करण्यात आला. या करारांमुळे सामूहिक सुरक्षितता या तत्त्वाचा यूरोपीय राष्ट्रांनी पुरस्कार केला.
आंतरराष्ट्रीय व विशेषत: यूरोपीय शांतता-प्रयत्नातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. पुढे जर्मनीला राष्ट्रसंघाचे सभासदत्व देण्यात आले (१० सप्टेंबर १९२६). श्ट्रेझमानच्या या संदर्भातील कार्याबद्दल त्याला आरीस्तीद ब्रीआं ह्या फ्रेंच मुत्सद्यासमवेत १९२६ चे जागतिक शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. बर्लिन येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ :
- Bagachi, Asoke K. Hinduja Foundation Encyclopedia of Nobel Laureates, Delhi, 2002.
- शेख, रूक्साना, शांतिदूत, सातारा, १९८६.