बॅरन द एस्तौरनेल्स दी काँस्तां : फ्रेंच मुत्सद्दी व संसदपटू. पॉल हेन्री बेन्जामिन बुलेट असेही त्याचे नाव आहे. त्याचा जन्म ला फ्लेश (सार्त) येथे झाला. पुढे त्यास सिनेटचे सदस्यत्व आणि कालांतराने फ्रान्सचे मंत्रिपदही लाभले. १८८९ मध्ये सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदांत त्याने भाग घेतला. द हेग येथे १८९९ व १९०७ साली झालेल्या शांतता परिषदांत फ्रान्सचे त्याने प्रतिनिधित्व केले.

आंतरराष्ट्रीय सहकार्य, सामजस्य, निःशस्त्रीकरण व शांतता या तत्त्वांचा पुरस्कार करून आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयाच्या स्थापनेत त्याने पुढाकार घेतला; पण या न्यायालयाकडून कोणतीच कार्यवाही होत नाही, असे दिसताच अमेरिकेसारख्या देशांना शांततेसाठी पुढाकार घेण्यास उद्युक्त केले व अमेरिकेचे अनुकरण इतर देशांनी करावे, असा सल्ला त्याने दिला. व्याख्याने -लेखन यांद्वारे त्याने आपले मौलिक विचार प्रसृत केले. ला कन्सिलेशन इंटरनशॅनल (१९०६), पोअर ला सोसायटी देस नेशन्स (१९१२), अमेरिका अँड हर प्रॉब्लेम्स (१९१५ इं.भा.) इ. त्याचें काही महत्त्वाचे ग्रंथ होत. त्याच्या या कार्याचा गौरव नोबेल पारितोषिक देऊन करण्यात आला. तो बॉर्दो येथे मरण पावला

संदर्भ :