क्लास पोंटस आर्नुल्डसॉन : (२७ ऑक्टोबर १८८४-२० फेब्रुवारी १९१६) हा स्वीडिश मुत्सद्दी असून नॉर्वे-स्वीडन संघातील अनेक समस्या सोडविणारा जागतिक राजनीतिज्ञ होता. जन्म येतबॉर्य (स्वीडन) येथे. रेल्वेमधील नोकरी सोडून त्याने शांतता कार्यास वाहून घेतले (१८८१). त्याचे नॉर्वे-स्वीडनमधील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. यूरोपात १८६० व १८७०-७१ मध्ये झालेल्या युद्धांमुळे त्याने शांततावादी चळवळीचा पुरस्कार केला. पुढे स्वीडिश संसदेत (रिक्सडॅग) तो निवडून आला.
शांतताकार्य हेच जीवनाचे ध्येय मानून त्याने नॉर्डिक देशांच्या तटस्थतावादी धोरणास पाठिंबा दिला आणि ‘स्वीडिश ॲसोसिएशन फॉर पीस ॲड कन्सिलिएशन’ या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. त्याच्याच प्रयत्नाने स्वीडन-नॉर्वे संघाबद्दलचे तीव्र मतभेद मिटले. त्याच्या या शांतताकार्याबद्दल त्याला बायरबरोबर नोबेल परितोषिक देण्यात आले (१९०८). त्याने ही रक्कम शांतताकार्यासाठी दिली. त्याने आपले विचार होम ऑफ द सेंचुरीज : ए बुक ऑन वर्ल्ड पीस (इं. शी. १९००) यात प्रभावीपणे मांडले आहेत. स्टॉकहोम येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ :