सावंत, वसंत : (११ एप्रिल १९३५ – २३ डिसेंबर १९९६). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी. वसंत लाडोबा सावंत यांचा जन्म तेव्हाच्या रत्नागिरी जिल्हात व आताच्या सिंधूदूर्ग जिल्ह्यातील सांगूळवाडी येथे शेतकरी कुटुंबात झाला. बालपण व प्राथमिक शिक्षण कोकणातील फोंडाघाट येथे तर माध्यमिक शिक्षण १९४८ ते १९५३ या काळात मालवण येथून घेतले. सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई येथून एम. ए. मुंबई विद्यापीठात तर १९७४ साली कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून ‘अर्वाचीन मराठीतील प्रवासवर्णने (१८०० ते १९६५): प्रवासवर्णन एक वाङ्मयप्रकार’ या विषयात पीएच. डी. पदवी प्राप्त केली. काही काळ रेल्वेत कारकुनाची नोकरी केली. १९६३ पासून सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयात निवृत्तीपर्यंत अध्यापक म्हणून कार्यरत राहिले. १९७२ मध्ये त्यांनी ‘दक्षिण रत्नागिरी साहित्य संघ, सावंतवाडी’ या साहित्य संस्थेची स्थापना केली. वडील वारकरी असल्यामुळे वारकरी संतसाहित्याचे संस्कार तसेच पाडगावकर, बा. भ. बोरकर यांच्या सौंदर्यवादी कवितेच्या संस्कारातून सावंत यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व घडत गेले. तळकोकणातील सांस्कृतिक जीवनव्यवहारांचे काव्यात्म दर्शन, काव्यहेतूसाठी धार्मिक दर्शनांचा, धार्मिक संज्ञा-प्रतीकांचा आणि आत्मचरित्रातील तपशीलांचा उपयोग, गूढ-अव्यक्त दु:खाची अनुभूती, निसर्गकवितामधून ईश्वरीरूपाचा प्रत्यय नोंदविण्याची प्रवृत्ती हे त्यांच्या काव्यलेखनाचे विशेष. ओवी-अभंगासह विविध वृत्तछंदांचा वापर त्यांनी कवितालेखनात केला आहे.
स्वस्तिक (१९७३) हा त्यांचा पहिला कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशनने ‘नवे कवी नवी कविता’ या मालेत प्रकाशित केला. तरल संवेदनांनी भारलेल्या कविमनाची प्रचिती सावंत यांच्या या पहिल्याच संग्रहात आहे. सौंदर्यासक्त कविमन, प्रेमानुभूतीमधील अपूर्णता, उदासी, निसर्गरूपात ईश्वरी अनुभूती, सर्जनाचा ध्यास, गूढ, अव्यक्त दु:खाचा आत्मस्वर इत्यादी सूत्रे या संग्रहात पाहावयास मिळतात. अनुभवातील संवेद्यता, निसर्गाच्या रंगभोर प्रतिमा आणि संज्ञाप्रवाही भाषा यामुळे हा संग्रह लक्षणीय ठरला आहे. उगवाई (१९८४) संग्रहात सभोवतालच्या परिसराला कविताबद्ध करण्याची वृत्ती, मानवता हरवत जात असल्याची खंत, निसर्गरूपांशी एकरूप होऊ पाहणारे कविमन, घराने नाकारल्याची खंत अशा विविध भावना या संग्रहात प्रकट झाल्या आहेत. देवराई (१९९०) हा संग्रह कोकणातील संस्कृतीची सश्रद्धतेने भारलेली विभिन्न रूपे साकार करतो. ‘अशा लाल मातीत जन्मास यावे जिचा रंग रक्तास दे चेतना, इथे नांदते संस्कृती भारताची घरातून दारात वृंदावना’ असे मातीचे गायन यात आहे. माझ्या दारातले सोनचाफ्याचे झाड (१९९३) मधील संग्रहात प्रेमातील अभाव, अतृप्तता, सर्जनामागील ईश्वरी प्रेरकता, मानवेतरांत जीवनाची प्रेरकता शोधणे, विश्वाच्या विनाशकतेतून आलेल्या दु:खावर कवितेतून फुंकर घालण्याची वृत्ती हे त्यांच्या काव्यलेखनाचे विशेष दिसतात. सागरेश्वर (१९९७) या संग्रहात समुद्र आणि परिसराशी संवादी झालेले मन, कोकणातल्या पशूपक्षांच्या लोककहाण्या, जत्रा- यात्रा आणि आत्मपर संवेदन आहे. ‘दगड तरे पाण्यावर’ ही रामकथेवर आधारित एक संगीतिका या संग्रहात आहे.
वसा हे त्यांचे खंडकाव्य (२००७) प्रसिद्ध आहे. आधुनिक आघातांनी नाश पावत जाणाऱ्या कोकणच्या सौंदर्यराशी अक्षरांतून जोजावण्याची प्रेरणा या कवितेमागे आहे. साडेतीन चरणी ओवीतील या कवितेत प्रारंभी पराशर या गोत्रपुरुषाला, व्यासांना, शारदेला, पृथ्वीमातेला आणि कोकणातील देवदेवातांना केलेले वंदन आहे. कोकणातील समृद्धी, संस्कृती, लोककथा, बदलते कालवास्तव आणि शापित भूमीचे भोग असे प्रदेशचित्र हा या खंडकाव्याचा गाभा आहे. स्त्रीत्वाच्या विविधरूपांचे चिंतनही या काव्यात आहे.
प्रवासवर्णन एक वाङ्मयप्रकार (१९८७) हा त्यांचा समीक्षाग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. प्रवासवर्णन या साहित्यप्रकाराची चर्चा करणारा मराठीतील हा पहिलाच ग्रंथ आहे. भारतीय साहित्य-संस्कृतीतील प्रवासविषयक भूमिकेपासून प्रवासवर्णनाची संकल्पना, प्रवासी, प्रवासवर्णन या वाङ्मयप्रकाराचे वेगळेपण इत्यादी घटकांची चर्चा करून अर्वाचीन कालखंडातील प्रवासवर्णनपर साहित्याचा आढावा या ग्रंथात आहे. त्यांना महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा कविवर्य केशवसुत पुरस्कार, संत नामदेव पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, तसेच उगवाई या संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचे ह. स. गोखले परितोषिक प्राप्त आहे.
संदर्भ :
- सावंत, वसंत, उगवाई, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९८४.