ओक, वामन दाजी : (१८४५—१८९७). प्राचीन मराठी काव्याचे अभ्यासक आणि संशोधक. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील हेदवी या गावी. शिक्षण हेदवी आणि रत्नागिरी येथे. त्यांनी मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृतची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळविली. काही कारणांमुळे पदवी मिळविण्यापूर्वीच शिक्षण सोडून त्यांना शिक्षकाची नोकरी पतकरावी लागली. निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकरांशी मोरोपंतविषयक वादात यशस्वीपणे सामना दिल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. काव्यसंग्रह ह्या मासिकात त्यांनी मुक्तेश्वर, वामनपंडित, मोरोपंत इ. अनेक प्राचीन मराठी कवींची कविता साक्षेपाने संपादिली. काव्यमाधुर्य (१८८४) हा अर्वाचीन मराठी कवितेतील उत्तम वेच्यांचा संग्रह प्रसिद्ध केला. काव्येतिहाससंग्रह ह्या मासिकात नागपूरकर भोसल्यांची बखर आणि इतर कागदपत्र प्रसिद्ध केले. लॉर्ड बेकन ह्यांचे चरित्र (१८८४), बाबा नानक ह्यांचे चरित्र (१८८९), कादंबरीकथासार, मुद्राराक्षसकथासार, वासवदत्ताकथासार (सर्व १८८९), गणपतिनिधनविलाप (१८८०, ‘सार्वजनिक काका’ गणेश वासुदेव जोशी यांच्यावरील विलापिका) आणि श्रीमन्माधषनृपनिधन वर्णनात्मक पद्यरत्नमाला (१८८३) ही त्यांची स्वतंत्र ग्रंथरचना. प्रौढ भाषा, गाढा अभ्यास आणि चिकित्सक दृष्टी हे त्यांच्या लेखनाचे विशेष. त्यांची कविता जुन्या वळणाची होती. काव्यरत्नावलीच्या संपादनकार्यात ते भाग घेत. विविधज्ञानविस्ताराशीही संपादनकार्याबाबत त्यांचा निकटचा संबंध होता. १८९० मध्ये काव्यसंग्रहाचे ते संपादक झाले. आयुष्याच्या अखेरीस रामपूर येथील शाळेत ते शिक्षक होते.
संदर्भ :
- https://epustakalay.com/book/184183-kavitaa-sangrah-by-vaman-daji-ok/