(एजिंग). सजीवांमध्ये वाढत्या वयानुसार शरीरक्रियात्मक बदलांमुळे जीर्णता उद्भवते म्हणजे सजीवांमधील जैविक प्रक्रियांचा वेग कमी होऊ लागतो आणि चयापचय क्रियांवर येणारे ताण झेपण्याची क्षमता कमी होते. या प्रक्रियेला वार्धक्य म्हणतात. ही प्रक्रिया वयानुसार पेशी, इंद्रिये किंवा सजीवांमध्ये घडून येत असते. येथे मुख्यत: मनुष्याच्या वार्धक्यासंबंधीची माहिती दिलेली आहे.
व्यक्तीचे वय वाढते, तसतसे ती व्यक्ती दुखापती, आजार आणि मृत्यू यांना बळी पडण्याची संभाव्यता वाढते. मनुष्याला वृद्धापकाळात अनेक रोग जडू शकतात; जगात रोज सु. दीड लाख लोक मृत्यू पावतात; त्यांपैकी सु. एक लाख हे वृद्धापकाळातील रोगांमुळे दगावतात. वाढ, हालचाल, प्रजनन इ. लक्षणांप्रमाणे वार्धक्य हेही सजीवांचे एक लक्षण आहे. मात्र वेगवेगळ्या जातींमध्ये या प्रक्रियेचा दर वेगवेगळा असतो. वास्तविक वार्धक्याशी संबंधित सर्व जैविक बदल फलनापासून सुरू होतात. अनेक व्यक्तींमध्ये हे बदल वयाच्या ३०–४० वर्षांनंतर दिसून येतात. वार्धक्य का येते, याची कारणे निश्चित माहीत नसली, तरी वाढत्या वयाची लक्षणे बाल्यावस्थेपासून दिसतात. उदा., बाल्यावस्थेतील मुले किशोरवयात आली की २० किलोहर्ट्झपेक्षा उच्च-कंप्रतेचा आवाज ऐकण्याची क्षमता गमावतात. बोधनक्षमता २०-३० या वयादरम्यात कमी होते. साधारणपणे ३५ वर्षानंतर डोळ्यांतील रोमक स्नायू (सिलियरी मसल) कमजोर झाल्याने अशा व्यक्तींना ४५-५० वयानंतर जवळचे स्पष्ट दिसत नाही. स्त्रियांमध्ये ४५ वर्षांनंतर रजोनिवृत्ती येते, ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धांपैकी जवळपास अर्ध्या वृद्धांना स्पष्ट ऐकू येत नाही. परिणामी त्यांच्या बोलण्यात अडथळा येतो. वयाच्या ८५ वर्षांनंतर सु. २५% व्यक्तींमध्ये स्नायू दुबळे झाल्याने चलनवलन कमी होते व चालण्यात डळमळीतपणा येतो, वाढत्या वयानुसार बुद्धिनाश उद्भवतो. याशिवाय केस पांढरे होणे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे इ. लक्षणे वार्धक्य प्रक्रियेशी निगडीत असतात.
वार्धक्यासंबंधी विविध सिद्धांत आहेत. मागील शतकापर्यंत वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञ यांची अशी समजूत होती की, वार्धक्य ही नैसर्गिक प्रक्रिया असून तिच्याद्वारे वृद्ध बाजूला सारले जातात आणि तरुणांसाठी संधी उपलब्ध होते. यातून असे सूचित होते की कोणत्याही जातीचा आयु:काल जनुकांद्वारे निश्चित होतो; प्राण्यांच्या जनुकांमध्ये आयु:कालाची विशिष्ट आज्ञावली असते. या सिद्धांताला पुष्टी मिळण्याचे कारण म्हणजे जे पालक दीर्घायुषी होतात, त्यांची अपत्येही दीर्घायुषी झाल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. तसेच जुळ्या अपत्यांचा आयु:काल जवळपास सारखाच असतो. परंतु आता वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, वार्धक्य हे पूर्वनियोजित किंवा जनुकीय माहितीशी निगडीत नसून विविध नैसर्गिक जैविक प्रक्रियांशी संबंधित असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये वार्धक्य व मृत्यू यांचा दर व काळ वेगवेगळा असतो आणि याकरिता जनुकीय विविधता, जीवनशैली व वार्धक्यात भर घालणाऱ्या जैविक प्रक्रियांची यादृच्छिकता अशा बाबी कारणीभूत असतात. अनेक सजीवांमध्ये मृत्यूची वेळ ही प्रजननाच्या वेळी आयु:कालाशी जुळलेली असते. पौगंडावस्था आणि रजोनिवृत्ती यांच्या वेळा खासकरून महत्त्वाच्या असतात. प्रजननकाळानंतर पेशी, ऊती आणि शरीरातील घटकांची एवढी हानी होते की ते पूर्वीप्रमाणे कार्य करू शकत नाहीत. अवयवांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे वार्धक्याशी निगडीत रोग आणि विकार जडतात.
एका सिद्धांतानुसार प्राण्यांच्या पेशी, ऊती, अवयव इत्यादींची झीज होत असते. प्राण्यांमध्ये ही झीज भरून काढण्यासाठी यंत्रणा असते. मात्र झीज होताना निर्माण झालेली अपशिष्टे पेशीत साठून राहतात आणि पेशींच्या कार्यात बिघाड निर्माण करतात. अशी अपशिष्टे अविद्राव्य असतात; ती बहुधा हृदयाच्या पेशी, चेतापेशी यांच्यात आढळून येतात. दुसरा सिद्धांत असे सांगतो की वाढत्या वयानुसार कंडरा, त्वचा, रक्तवाहिन्या इत्यादींची लवचिकता कमी होते. ही स्थिती कोलॅजेन रेणूंमध्ये तिरकस बांधणी झाल्याने उद्भवते. याचा परिणाम विकरांवर होऊन त्यांमुळे पेशींच्या कार्यात बिघाड होतो.
एका सिद्धांतानुसार पेशींमधील अभिक्रियांमधून प्रथिने व इतर रेणूंचे ऑक्सिडीभवन होत असते. या अभिक्रियांमध्ये या रेणूंद्वारे इलेक्ट्रॉन गमावले जातात. हे रेणू अस्थिर व अतिक्रियाशील असल्याने त्यांची पेशीतील घटकांबरोबर, पेशीपटलांबरोबर, अभिक्रिया झाल्याने पेशीपटलाची हानी होते. या कणांना मुक्त मूलके म्हणतात. मानवी शरीरात मुक्त मूलकांमुळे होणारी हानी टाळण्यासाठी, तसेच झालेली हानी भरून काढण्यासाठी प्रतिक्षम यंत्रणा असतात. मात्र, कालांतराने मुक्त मूलकांमुळे झालेली हानी साचत जाते आणि वार्धक्याच्या प्रक्रियांमध्ये भर घालतात. मुक्त मूलकांद्वारे होणारी हानी कमी करण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठी आणि शक्यतो वार्धक्य प्रक्रिया विलंबित होण्याकरिता योग्य पर्याय वैज्ञानिक शोधत आहेत.
वार्धक्याचा ‘मनोसामाजिक’ ( सायको सोशिओलॉजिकल) सिद्धांत आहे. त्यानुसार व्यक्ती वृद्ध होतात तसे त्यांचे वर्तन बदलते, त्यांची सामाजिक आंतरक्रिया बदलते आणि ते ज्या कामांमध्ये व्यस्त राहतात, ती कामे बदलतात. या सिद्धांताचे चार उपघटक आहेत; रिकामेपण, क्रियाशीलता, जीवनक्रम आणि सातत्य. व्यक्ती आणि समाजातील इतर सदस्यांशी संपर्क तुटला की रिकामेपण उद्भवते. व्यक्तीने क्रियाशील राहणे महत्त्वाचे असते आणि व्यक्तीची स्वयंप्रतिमा त्या व्यक्तीच्या समाजातील भूमिकेवर अवलंबून असते. जीवनक्रमाचा विचार करता, प्रौढत्व ही प्रक्रिया वृद्धापकाळातही चालू राहते. प्रत्येक विशिष्ट ‘मनोसामाजिक’ गरजा असतात. सातत्य असे म्हणते की वृद्ध व्यक्ती त्यांची लक्षणे जसे मूल्ये, व्यक्तिमत्त्व, सवयी इ. टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात.
वार्धक्यावर मात करण्यासाठी सौंदर्यप्रसाधने वापरून किंवा प्लास्टिक शस्त्रक्रिया करून वाढलेल्या वयाचे परिणाम काही प्रमाणात लपवता येतात. अनेक जण असा दावा करतात की जीवनसत्त्वे, प्रतिऑक्सिडीकारके, संप्रेरके तसेच काही पदार्थांमध्ये वार्धक्यरोधी गुणधर्म असतात. परंतु यासंबंधी अद्याप संशोधन अपूर्ण आहे. काही संशोधनातून असे आढळले आहे की, प्राण्यांना अन्न कमी दिले तर ते अधिक काळ जगतात. संशोधकही उष्मांक निर्बंध उपचार (कॅलरिक रिस्ट्रिक्शन थेरपी) कशी घडते, हे समजावून घेत आहेत. अनेक वैज्ञानिकांचे मत असे आहे की, वार्धक्याची प्रक्रिया थांबवणे किंवा उलटी फिरवणे अशक्य आहे.
वार्धक्य आणि या स्थितीतील रोग यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणारी वैद्यकशाखा आहे. तिला जराशास्त्र (जेरिॲट्रिक्स; जेरॉण्टोलॉजी) म्हणतात. या शाखेत डॉक्टर वृद्धापकाळातील रोगांचा अभ्यास करतात आणि उपचार करतात. याकरिता मध्यम वयातील व्यक्तींच्या शरीरात कोणते बदल होतात, हे डॉक्टर समजून घेत आहेत. काळानुसार वृद्धापकाळाच्या समस्या वाढल्याने त्या समस्यांची दखल घेणे आवश्यक आहे, कारण अधिकाधिक व्यक्ती वृद्ध होत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील वैज्ञानिक डॉक्टरांशी वार्धक्याच्या समस्या व प्रक्रिया समजून घेण्यासाठी एकत्र कार्य करतात. मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ हेदेखील वृद्ध व्यक्तींच्या मानसिक कृती, भूमिका इ.बाबत अभ्यास करतात. जगातील अनेक रुग्णालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये केवळ वृद्ध लोकांवर उपचार करण्यासाठी दवाखाने आहेत.
सजीव आणि अमरत्व : मनुष्य आणि सजीवांच्या अनेक जातींमध्ये वार्धक्य आणि मृत्यू अटळ असतात. कवकेही वृद्ध होतात. याउलट सजीवांच्या अनेक जाती अमर असल्याचे मानता येते. उदा., जीवाणूंच्या विखंडनातून मूळ जीवाणूंसारखे दोन जीवाणू निर्माण होतात, स्ट्रॉबेरीसारख्या वनस्पतींमध्ये तिच्या धावत्या खोडांपासून स्वत:ची कृंतके (क्लोन) निर्माण होतात. हायड्रा प्रजातीतील प्राण्यांमध्ये पुनरुत्पादनाची अशी क्षमता असते की ते वृद्धच होत नाहीत. आदिकेंद्रकी, आदिजीव, शैवाले अमरच आहेत कारण ते विखंडनाने गुणित होतात.
पृथ्वीवर सु. ३७ लाख वर्षांपूर्वी एकपेशीय सजीवसृष्टी उत्पन्न झाली. सजीवांना वार्धक्य तसेच अमरत्व लैंगिक प्रजननाच्या उत्क्रांतीमुळे प्राप्त झाले. सु. ३२ कोटी वर्षांपूर्वी बीजनिर्मिती करणाऱ्या वनस्पती उत्क्रांत झाल्या, तसेच सु. १० कोटी वर्षांपूर्वी कवके आणि प्राणिसृष्टी अस्तित्वात आली, तेव्हा हे घडले. लैंगिक प्रजनन करणारे सजीव आपले जनुकीय द्रव्य वापरून पुढच्या पिढीला जन्म देतात. त्यानंतर या सजीवांना स्वत: जगत राहण्याची गरज उरत नाही.
मनुष्य आणि अन्य मर्त्य सजीवांच्या काही पेशींमध्ये अमर होण्याची क्षमता असते. उदा., कर्करोगाच्या काही पेशी किंवा जननपेशींसारख्या मूल पेशी वृद्धिमाध्यमात ठेवल्यास मरण्याची क्षमता गमावतात. कृत्तक प्रक्रियेत (क्लोनिंग) प्रौढांच्या पेशींचे भ्रूण अवस्थेतील पेशींमध्ये रूपांतर केले जाऊन त्यांच्यापासून नवीन ऊती किंवा सजीव निर्माण करता येतात. सामान्य पेशी मात्र प्रयोगशाळेतील वृद्धिमाध्यमात सु. ५० पेशीविभाजनानंतर मरतात.