(टायफॉइड). साल्मोनेला टायफाय (साल्मोनेला एंटेरिका उपजाती टायफाय) नावाच्या जीवाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगाला ‘विषमज्वर’ म्हणतात. याला आंत्रज्वर, संततज्वर असेही म्हणतात. विषमज्वराची लक्षणे संसर्गापासून ६ ते ३० दिवसांनंतर दिसू लागतात आणि ती सौम्य ते तीव्र असू शकतात. बहुधा विषमज्वराची सुरुवात बारीक तापाने होऊन ताप हळूहळू वाढत जातो. यासोबत अशक्तपणा, पोटदुखी, डोकेदुखी, मलावरोध आणि उलट्या इ. लक्षणे दिसून येतात. काही वेळा अंगावर पुरळ व गुलाबी रंगाचे डाग दिसतात. विषमज्वराचा प्रसार अनेक देशांत आढळतो. औद्योगिक दृष्ट्या प्रगत देशांत हा रोग क्वचितच आढळतो, तर विकसनशील देशांत खासकरून मुलांमध्ये ही गंभीर समस्या आहे.
विषमज्वराच्या जीवाणूचा वाहक फक्त मनुष्य असून इतर कोणत्याही प्राण्यांद्वारे त्याचा प्रसार होत नाही. सा. एंटेरिका उपजाती टायफाय या जीवाणूचा प्रसार विष्ठा-अन्ननलिका मार्गाने (बाधित झालेल्या रुग्णाकडून आणि अलक्षणी वाहकाकडून) होतो. बाधित व्यक्ती बरी झाल्यावरही तिच्या विष्ठेतून हे जीवाणू वर्षभर बाहेर टाकले जातात. अशा व्यक्तीला अलक्षणी वाहक म्हणतात.
सा. टायफाय हे जीवाणू दूषित पाणी आणि अन्न यांबरोबर पोटात जाऊन लहान आतड्यातील लसीका वाहिन्यांद्वारे शरीरात पसरतात. हे जीवाणू लहान आतड्यातील लसीका क्षेत्रे, आंत्रयोजी (मेसेंटरी; आतडे उदरगुहेला जोडणारे इंद्रिय) लसीका ग्रंथी, प्लीहा, यकृत, पित्ताशय इ. ठिकाणी वाढतात. आतडे, वृक्क, यकृत इ. इंद्रियांमधून हे जीवाणू शरीराबाहेर पडतात. त्यांचे प्रजनन होऊन ते रक्तात आले की लक्षणे दिसू लागतात. या रोगात आळीपाळीने चढणारा-उतरणारा ताप, प्लीहेची वाढ, आतड्याचा दाह ही मुख्य लक्षणे दिसून येतात. तसेच लहान आतड्याला जखमा, आंत्रयोजीतील लसीका ग्रंथींची वाढ अशीही लक्षणे आढळतात.
सा. टायफाय हा लांबट, दंडगोलाकार असून त्याची लांबी सु. ३ मायक्रॉन (१ मायक्रॉन = ०.००१ मिमी.) असून जाडी ०.६ मायक्रॉन असते. त्यावर कशाभिका असल्याने तो गतिशील असतो. उकळत्या पाण्याइतक्या तापमानात हा जीवाणू तत्काळ मरतो. ६०० से. तापमानात तो १५ मिनिटांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाही. मात्र बर्फात तसेच खाऱ्या पाण्यात तो अधिक काळ जीवंत राहू शकतो.
विषमज्वर झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे चार टप्पे दिसून येतात आणि प्रत्येक टप्पा एकेका आठवड्याने बदलतो. उदा., दिवस जातात तसा रुग्ण थकत जातो आणि रोडावतो. पहिल्या आठवड्यात, शरीराचे तापमान हळूहळू वाढते. तापाबरोबर डोकेदुखी, अस्वस्थता आणि खोकला ही लक्षणे असतात. विशेष म्हणजे नाडी अगदी संथ चालत असते. ताप ३६.७० से. (९८.०६ फॅ.) पासून सु. ३९.५० से, (१०३.१ फॅ.) इतका वाढत जातो. अतितीव्र प्रकारात तो ४०.५० से. (१०४.९ फॅ.) इतका होतो. त्वचा कोरडी आणि उष्ण, तर काही रुग्णांमध्ये नाकाचा शेंडा लाल होणे, पोटदुखी इ. लक्षणे दिसून येतात. पहिल्या आठवड्यात विडाल–चाचणी नकारात्मक येते.
दुसऱ्या आठवड्यात, रुग्ण एवढा थकलेला असतो की, त्याला अंथरुणात उठून बसणे अशक्य होते. ताप सु. ४०० से. (१०२ फॅ.) आसपास राहतो आणि हृदयाचे ठोकेही हळूहळू पडतात. या काळात रुग्णामध्ये बडबड, बेशुद्धी, भ्रमिष्टपणा अशी लक्षणे दिसतात. काही रुग्णांमध्ये छातीच्या खालच्या भागेत, पोटावर गुलाबी रंगाचे ठिपके दिसतात. श्वास घेताना फुप्फुसाच्या खालच्या भागाकडून आवाज ऐकू येतो. प्लीहा, यकृत हाताला मोठे व मऊ लागतात. प्रतिजन ओ- आणि एच- प्रतिद्रव्यांची केली जाणारी विडाल–चाचणी सकारात्मक येते.
तिसऱ्या आठवड्यात काही गुंतागुंतीची लक्षणे उद्भवू शकतात. विषमज्वरामुळे आतड्याला व्रण पडतात किंवा रक्तस्राव होतो. आतड्याला छिद्रे पडून त्यातील घटक उदरगुहेत उतरू लागतात. परिणामी पोटदुखी, अन्नावरची वासना उडणे, उलट्या होणे आणि विक्षेपी (मेटास्टॅटिक) गळवे इत्यादी लक्षणे उद्भवतात. मस्तिष्कशोथ किंवा न्यूमोनिया होऊ शकतो, शरीरातील इंद्रियांना गळू होऊ शकतात. या काळात ताप वाढलेला राहतो. त्यामुळे निर्जलीभवनाची स्थिती येऊन थकवा वाढतो. नाडी पहिल्या आठवड्यापेक्षा वेगाने चालते.
तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस ताप हळूहळू उतरू लागतो. रुग्णाची बेशुद्धी आणि गुंगी कमीकमी होत जाते. त्याला भूक लागते. हा काळ सुधारणेचा असून २०-२५ दिवसानंतर ताप पूर्ण उतरतो आणि रुग्ण सामान्य होऊ लागतो. मात्र रोडावल्यामुळे चालणे, हालचाल करणे, आहार यांबाबत काळजी घ्यावी लागते. काही रुग्णांमध्ये विषमज्वर उलटू शकतो आणि ही चिंतेची बाब ठरू शकते.
निदान : विषमज्वराच्या निदानासाठी रक्त, विष्ठा किंवा अस्थिमज्जा वापरली जाते. पहिल्या काही दिवसांत रुग्णाच्या रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी झालेले असते. रक्ताच्या परीक्षणातून हे दिसून आल्यास रुग्णाला अन्य संसर्गजन्य रोग नाही हे ठरवितात. विष्ठेतील जीवाणूंचे संवर्धन काही वेळा उपयोगी ठरते.
या जीवाणूच्या शरीरापासून आणि कशाभिकेपासून दोन वेगवेगळी प्रतिजने उत्पन्न होतात. त्यांना अनुक्रमे ओ- आणि एच-प्रतिजने म्हणतात. या प्रतिजनांवरून या रोगाचे निदान केले जाते. या चाचणीला विडाल– चाचणी म्हणतात. याकरिता रुग्णाचा रक्तद्रव साल्मोनेलाच्या मृत जीवाणूयुक्त निलबंनात (विशिष्ट प्रतिजन असलेल्या) मिसळतात. जर द्रावणात गुठळी बनली, तर रुग्णाला विषमज्वर असल्याचे निदान होते. निदानासाठी ट्यूबेक्स, टायफीडॉट इ. चाचण्याही केल्या जातात.
उपचार : या रोगावर सामान्यपणे प्रतिजैविके दिली जातात. यांपैकी क्लोरँफेनिकॉल हे औषध गुणकारी असून अँपिसिलीन, ॲमोक्सिसिलीन, सल्फामेथॉक्सझोल इ. प्रतिजैविके वापरली जातात. वेळीच उपचार केल्यास बहुतांशी रुग्णांचा जीव वाचू शकतो. उपचार न केल्यास तिसऱ्या आठवड्यात आतड्याचे आणि मेंदूसंबंधीचे गुंतागुंतीचे विकार होऊ शकतात. तापानंतर रुग्णाला पुरेसा आराम मिळणे गरजेचे असते. आहारात दूध, पेय पदार्थ, जीवनसत्त्वयुक्त घटकांचा समावेश करावा.
प्रतिबंध : अधूनमधून हात धुऊन स्वच्छ ठेवणे, अन्न, दूध, फळे, भाज्या स्वच्छ करून वापरणे आणि पाणी उकळून पिणे, अन्न गरम खाणे इ. उपायांनी हा रोग रोखता येतो. या रोगावर दोन लसी उपलब्ध आहेत. एखाद्या रोगग्रस्त प्रदेशात जायचे असल्यास लस टोचून घेणे इष्ट असते.
जगात सन २००० मध्ये सु. २ कोटी १७ लाख लोकांना विषमज्वराची लागण झाली आणि अंदाजे २ लाख १७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांमध्ये मुख्यत: ५ ते १९ वर्षांच्या दरम्यानची बालके आणि तरुण होते. मुख्यत: दक्षिण-पूर्व आशियाच्या देशांतील अर्भके, बालके आणि कुमारवयीन मुले या आजाराने त्रस्त होती. आफ्रिकेच्या सहारा प्रदेशातील देश आणि दक्षिण-पूर्व आशियातील देश येथे अधूनमधून या रोगाचा उद्रेक झालेला दिसतो. प्रतिजैविकांचा शोध लागण्यापूर्वी या रोगामुळे मृत्यूचा दर १०-२० टक्के होता. आता तत्काळ मिळत असलेल्या उपचारांमुळे तो १ टक्का इतका खाली आला आहे. औद्योगिक दृष्ट्या प्रगत देशांमध्ये, निर्जंतुक पाणी आणि अन्न-हाताळण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा झाल्याने मृत्युदर कमी झालेला आहे. आशियाच्या आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये विषमज्वराचे रुग्ण दिसून येतात. कारण तेथे पिण्याचे स्वच्छ पाणी, निर्जंतुकीकरणाच्या सुविधा आणि चांगल्या आरोग्य-सेवा यांचा अभाव दिसून येतो.
लसीकरण, सार्वजनिक आरोग्यसेवांमधील सुधारणा, स्वच्छता आणि क्लोरिनयुक्त पाण्याचा वापर यांमुळे विसाव्या शतकात विषमज्वराचे प्रमाण कमी झाले आहे.
पराविषमज्वर : साल्मोनेला पॅराटायफाय या जीवाणूंच्या संसर्गामुळे हा रोग होतो. हा जीवाणू विषमज्वराच्या प्रजातीतील असून त्यामुळे उद्भवणारी लक्षणे सारखीच परंतु सौम्य असतात.