शाल्मली (बाँबॅक्स सैबा) : (१) वनस्पती, (२) फुल, (३) फळे, (४) तडकलेली फळे.

(रेड सिल्क कॉटन ट्री). एक पानझडी वृक्ष. शाल्मली ही वनस्पती माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बाँबॅक्स सैबा आहे. हा वृक्ष मूळचा आशिया व ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग येथील असून भारत, मलेशिया, चीन, इंडोनेशिया, व्हिएटनाम, पाकिस्तान या देशांतील उष्ण प्रदेशांत वाढलेला आढळतो. महाराष्ट्रात सह्याद्री परिसरातील वनांमध्ये तो दिसून येतो. महाराष्ट्रात लाल सावर, शेवरी या नावांनी हा वृक्ष ओळखला जातो. माल्व्हेसी कुलातील सैबा पेंटॅड्रा असे शास्त्रीय नाव असलेल्या आणि पांढरी सावर म्हणून ओळखला जात असलेल्या वृक्षाचा उल्लेखदेखील शाल्मली म्हणून केला जातो.

शाल्मली वृक्ष सु. २० मी. उंच वाढतो. परंतु काही प्रदेशांत तो ६० मी. पर्यंत उंच वाढल्याचे आढळले आहे. याच्या खोडावर शंकूच्या आकाराचे मोठे काटे असतात, जे कालांतराने झिजून जातात. पाने मोठी, संयुक्त, हस्ताकृती असून पर्णिका ६ व पर्णवृंतापासून पसरलेल्या असतात. पर्णिका भालाकार, १३–१७ सेंमी. लांब, ७–१० सेंमी. रुंद असतात. पर्णवृंत २० सेंमी.पर्यंत लांब असतो. फुले मोठी, लालभडक, ७–१० सेंमी. कपाच्या आकाराची, एकेक किंवा ५-६ च्या गुच्छात असतात. हिवाळ्यात पाने गळून पडतात आणि मार्च-एप्रिल महिन्यात या वृक्षाला नवीन पाने येतात. निदलपुंज ५, संयुक्त व हिरवा असतो. पाकळ्या लाल असून फुलात ६० पेक्षा जास्त पुंकेसर असतात. फळ बोंड प्रकारचे, स्फुटनशील, फिकट हिरवे, १०–१५ सेंमी. लांब असून पिकल्यावर तपकिरी होते. फळात बिया अनेक असतात आणि बियांभोवती लांब, पांढरे रेशमी कापसासारखे केस असतात.

शाल्मली हा शोभिवंत वृक्ष असून बऱ्याच ठिकाणी शोभेसाठी त्याची रस्त्याच्या कडेला लागवड करतात. फळातील कापूस गाद्या, गिर्द्या, उशा भरण्यासाठी करतात. खोडावरील काट्यांचे चूर्ण चेहऱ्यावरील मुरुम घालवण्यासाठी ‍केला जातो. लाकूड मऊ असल्यामुळे ते फारसे उपयोगी नसते.