(सस्टेनेबल डेव्हलपमेंट). भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला बाधा पोहोचू न देता वर्तमानकाळातील गरजा पूर्ण करण्याच्या विकासाला शाश्वत विकास म्हणतात. शाश्वत विकासात पृथ्वीवरील संसाधनांचा वापर विकासासाठी करताना पुढील पिढ्यांनीही संसाधनांचा वापर काळजीपूर्वक करणे अपेक्षित असते.
विकास हा नैसर्गिक संसाधनांच्या वापरावर अवलंबून असतो. नैसर्गिक संसाधने निसर्गनिर्मित असून ती मर्यादित प्रमाणात असतात. नैसर्गिक संसाधनांवर कोणत्याही एका विशिष्ट समाजाचे स्वामित्व नसून ते संपूर्ण सजीव सृष्टीचे असते. तसेच ते केवळ एका पिढीपुरते नसून भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी असते. नैसर्गिक संसाधनांचा वापर अमर्याद केल्यास भावी पिढीसाठी संसाधने शिल्लक राहणार नाहीत, ही बाब लक्षात घेऊन शाश्वत विकास संकल्पना मांडली गेली आहे. ही संकल्पना नैसर्गिक संसाधनांचा काटकसरीने व प्रभावी वापर, नूतनीक्षम संसाधनांच्या वापरातून भौतिक विकास, सामाजिक न्याय व समता यांवर आधारित विकास इ. बाबींवर आधारलेली आहे.
‘शाश्वत विकास’ यात शाश्वतता आणि विकास अशा दोन संज्ञा आहेत. शाश्वतता म्हणजे चिरकाल टिकणे, ऱ्हास न होणे. मानव आणि परिसंस्था यांच्यातील संतुलन टिकण्यासाठी शाश्वतता ही संज्ञा विचारात घेतली जाते. नैसर्गिक जैवप्रणालीची अवनती न होता वापरलेल्या संसाधनांच्या जागी त्या दर्जाची दुसरी संसाधने उपलब्ध करणे ही शाश्वतता असते, तर विकास म्हणजे वाढ, प्रगती, सकारात्मक बदल. हे बदल प्राकृतिक, आर्थिक, पर्यावरणीय, सामाजिक व लोकसांख्यिकीय इ. घटकांमध्ये होतात. विकास हा दृष्टिपथात येणारा व उपयुक्त असतो. विकास हा आर्थिक व सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया सांस्कृतिक व पर्यावरणीय घटक आणि त्यांच्यातील आंतरक्रिया यांवर आधारित असते.
सन १९८७ मध्ये ब्रुटलँड अहवालातून शाश्वत विकासाची आधुनिक संकल्पना मांडण्यात आली. मुळात शाश्वत वन व्यवस्थापन यासाठी सुचवली गेलेली ही संकल्पना आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संरक्षण या अंगांनी विकसित करण्यात आली आहे. २००८ मध्ये युनायटेड नेशन्स इन्व्हायरन्मेन्ट प्रोग्रॅममध्ये हरित अर्थव्यवस्था ही संकल्पना स्वीकारली. पर्यावरणाला हानी न पोहोचवता नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करून त्यांचा कार्यक्षमपणे वापर करणे म्हणजे ‘हरित अर्थव्यवस्था’ होय. पृथ्वी परिषद-२०१२ मध्ये हरित अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकास यासंबंधी चर्चा करण्यात आली असून परिषदेत दारिद्र्य निर्मूलन, सर्वंकष आर्थिक विकास, सहस्राब्दी विकास ध्येय, महिलांसहित विकास, लिंग असमानता दूर करणे इत्यादींवर भर दिलेला आहे.
संयुक्त राष्ट्रांनी २०१५ साली शाश्वत विकासाची पुढील उद्दिष्टे मांडली आहेत : दारिद्र्य निर्मूलन करणे, भूक संपवणे, अन्न सुरक्षा, पोषक आहार उपलब्ध करून देणे, शाश्वत शेतीला प्राधान्य देणे, आरोग्यदायी जीवन निर्माण करणे आणि नागरिकांचे कल्याण साधणे, सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, स्त्री-पुरुष समानता व महिला-मुली यांना सक्षम करणे, पाणी व स्वच्छता यांच्या संसाधनांची उपलब्धता निश्चित करणे, अल्पखर्चिक, शाश्वत व आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादनशील रोजगार उपलब्ध करणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, सर्वसमावेशक व शाश्वत औद्योगिकीकरण करणे, वेगवेगळ्या राष्ट्रांतील असमानता दूर करणे, शहरे व वस्त्या सुरक्षित आणि शाश्वत करणे, उत्पादन व उपभोगपद्धती शाश्वत रूपात आणणे, हवामान बदल आणि त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाययोजना करणे, महासागर व समूहाचे संधारण आणि संबधित संसाधनांचा शाश्वत वापर, परिसंस्थांचा शाश्वत वापर, वनांचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीभवन टाळणे, मृदेतील कस घटण्याच्या प्रक्रिया रोखणे, जैवविविधता राखणे, शांततापूर्ण आणि सर्वंकष समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे, शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वांना न्याय मिळावा यासाठी विविध स्तरावर प्रभावी संस्था उभारणे आणि शाश्वत विकासाकरिता जागतिक भागीदारीसाठी अंमलबजावणीची साधने उपलब्ध करणे.
वरील उद्दिष्टांमध्ये १६९ साध्ये असून सदस्य राष्ट्रांनी २०३० सालापर्यंत ही उद्दिष्टे साध्य करावीत, असे अपेक्षित आहे. शाश्वत विकासाची (१) पर्यावरण, (२) अर्थव्यवस्था, (३) राजकीय स्थिती, (४) संस्कृती ही प्रमुख क्षेत्रे आहेत.
(१) पर्यावरण : मानवी वस्ती ही मनुष्य आणि त्याचे नैसर्गिक, सामाजिक व विशिष्ट पर्यावरण यांचा अविभाज्य भाग असते. याला मानवी पारिस्थितिकी म्हणतात. यात मानवी आरोग्य या बाबीचा समावेश होतो. हवा, पाणी, अन्न आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांची उपलब्धता ही शाश्वत विकासासाठी पारिस्थितिकीय पाया असून याला पर्यावरणीय शाश्वतता म्हणतात. पर्यावरणीय शाश्वतता नैसर्गिक पर्यावरणाशी संबंधित असते. पर्यावरण किती वैविध्यपूर्ण आणि उत्पादक आहे यांवर पर्यावरणीय शाश्वतता अवलंबून असते. पृथ्वीवरील जीवनाधार प्रणालींचे जतन करून मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी कार्याचा आराखडा तयार करणे आवश्यक असते.
मानवी कृतींमध्ये नैसर्गिक संसाधनांच्या वापराचे प्रमाण हे त्या संसाधनांचे नैसर्गिक रीत्या पुनर्भरणाच्या प्रमाणात राहणे गरजेचे असते. म्हणजेच शाश्वत विकास हा धारणक्षमतेशी जोडला गेला पाहिजे. दीर्घकालीन पर्यावरणीय अवनती मानवी जीवनाला हानीकारक असते.
कृषी : शाश्वत शेतीतील शेतकरी हा स्वयंपूर्ण आणि स्वयंविश्वसनीय असतो. तज्ज्ञांच्या माहितीचा वापर शेतीसाठी केला जातो. परस्पर-सहकार्य आणि संयुक्तिक विचार तसेच विविध कौशल्यांचा वापर शेतीविषयीच्या आणि नैसर्गिक संसाधनांच्या समस्या सोडविण्यासाठी केला जातो. यात शेतीमध्ये जैविक आणि पारिस्थितिकीय दृष्ट्या अपायकारक आदान घटकांचा वापर केला जात नाही. कृषिवानिकी, मिश्रशेती, बहुपीक प्रणाली, चक्रिय पीक प्रारूप इत्यादींचा समावेश शाश्वत शेतीमध्ये होतो. पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन शेती तंत्रज्ञान वापरून, पर्यावरणाची गुणवत्ता वाढवून बिगरशेतजमीन शेतीयोग्य केली जाऊ शकते.
(२) अर्थव्यवस्था : पर्यावरणीय संसाधने ही आर्थिक संपत्तीचे महत्त्वाचे स्रोत असतात. शाश्वत विकासात संसाधनाचा वापर न वाढविता जीवनमान सुधारण्यास महत्त्व दिले जाते. परंतु त्यात घट होणे गरजेचे असते. पर्यावरण संधारण आणि आर्थिक विकास या बाबी परस्परविरोधी किंवा संघर्षाच्या नसून त्या एकमेकांना पूरक असतात. संपूर्ण पर्यावरणात पृथ्वीवरील जीवावरणाचाच नव्हे तर हवा, पाणी, भूमी यांसह मानवी आंतरक्रिया, निसर्ग व मानवनिर्मित परिसर यांचाही समावेश होतो. पर्यावरणाची प्रदूषण पातळी न वाढता आर्थिक वृद्धी होणे आवश्यक असते.
ऊर्जा : ही अत्यंत महत्त्वाचा आर्थिक घटक असून स्वच्छ व दीर्घकाळ वापरता येणारी ऊर्जा ही शाश्वत ऊर्जा असते. जल, सौर, पवन अशा नूतनीक्षम ऊर्जास्रोतांमुळे प्रदूषण कमी होते. जीवाश्म इंधनाऐवजी नूतनीक्षम ऊर्जास्रोत वापरले, तर लोकांचे आरोग्य सुधारते आणि लोकसमूहात सामाजिक समानता येऊ शकते. ऊर्जाक्षेत्रातील शाश्वत विकास हा आर्थिक शाश्वतता आणि राष्ट्रीय सुरक्षा यांसाठी सहायक ठरते. खनिज तेल, दगडी कोळसा ही ऊर्जा संसाधने संपुष्टात येऊ शकतात. आजच्या गतीने दगडी कोळशाचा वापर होत राहिल्यास पुढील सु. १५० वर्षांत कोळशाचे साठे संपुष्टात येऊ शकतात.
वस्तुनिर्माण : वापरासाठी किंवा विक्रीसाठी जी उत्पादिते तयार केली जातात त्याला वस्तुनिर्माण म्हणतात. याकरिता कामगार आणि यंत्रे, साधने, रासायनिक व जैविक प्रक्रिया इ. बाबींचा वापर केला जातो. ज्या उत्पादितांची निर्मिती करताना आर्थिक दृष्ट्या योग्य प्रक्रियांद्वारे ऊर्जेचा व नैसर्गिक संसाधनांचा जपून वापर करतात, त्या पर्यावरणासाठी फायदेशीर ठरतात. शाश्वत वस्तुनिर्मितीमुळे कर्मचारी, समाज आणि उत्पादिते यांची सुरक्षा वाढते.
तंत्रज्ञान : हा घटक शाश्वत विकासासाठी आवश्यक असलेल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी उपयुक्त ठरतो. शाश्वत विकासात तंत्रज्ञान ही एक मध्यवर्ती संकल्पना मानली जाते. उचित ठिकाणी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असते.
परिवहन : परिवहन व्यवस्थेमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित होतात. ही व्यवस्था मानवी आरोग्यास तसेच हवामान बदलास कारणीभूत ठरते. म्हणूनच परिवहन व्यवस्थेचा शाश्वत विकास साधण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे, जीवाश्म इंधनाशिवाय चालणारी वाहतुकीची साधने बनवणे, इंधन-कार्यक्षम वाहन-निर्मिती करणे, पादचारी मार्गांचा विकास करणे, सायकलींचा वापर करणे इत्यादींची गरज असते. सार्वजनिक वाहनांचा उपयोग आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना होऊ शकतो. त्यातून सामाजिक विषमतेसारखी समस्या सोडविण्यास मदत होऊ शकते. अशा प्रकारे शाश्वत परिवहनाचे सामाजिक आणि आर्थिक असे अनेक उपयोग आहेत.
व्यापार : शाश्वततेसाठी नैसर्गिक भांडवलाचा उचित व कार्यक्षम वापर आवश्यक असतो. परंतु पारिस्थितिकीय घटकांचा प्रभाव आणि आर्थिक मूल्य यांचा मेळ घालणे अनेकदा कठीण बनते. आर्थिक क्षमता आणि सामाजिक क्षमता या दोन्ही बाबी शाश्वत व्यापारासाठी महत्त्वाच्या असतात. व्यापार अधिक फायदेशीर होण्यासाठी नैसर्गिक आणि सामाजिक भांडवल वापरले जाते. अशा प्रकारे शाश्वत विकासासाठी आर्थिक परिणामकारकता, सामाजिक परिणामकारकता, स्वयंपूर्णता आणि आर्थिक समानता या चार निकषांची आवश्यकता असते.
उत्पन्न : शाश्वत विकासामुळे गरिबीचे उच्चाटन करता येऊ शकते. शाश्वत विकासांतर्गत चांगले अंदाजपत्रक, चांगल्या जीवनमानासाठी चांगले पर्यावरण आणि उत्पन्नातील समानता अशा वित्तीय, पर्यावरणीय आणि सामाजिक उपायांनी गरिबी दूर होऊ शकते.
नगररचना : नवीन नागरीकरण आणि नवअभिजात स्थापत्यशास्त्रामुळे बांधकामांमध्ये शाश्वत दृष्टीकोन वाढीस लागला आहे. यात पारंपरिक स्थापत्यशास्त्र, अभिजात रचना, बांधकामासाठी स्थानिक साहित्याचा वापर इत्यादी बाबी दिसून येतात.
(३) राजकीय स्थिती : शाश्वत विकासासाठी राजकीय धोरण उपयुक्त ठरते. आंतरराष्ट्रीय व्यापार, भांडवल गुंतवणूक, आर्थिक धोरण, हवामान बदल व उपाय, ऊर्जानिर्मिती, मापन व मूल्यमापन, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, संदेशवहन तंत्रज्ञान इ. शाश्वत विकासाचे निदर्शके आहेत. राजकीय उपक्षेत्रात संघटना व शासन, विधी व न्याय, संदेशवहन, निदर्शन व वाटाघाटी, सुरक्षा व तडजोड संवाद आणि पुनर्समुपदेशन, नैतिकता आणि उत्तरदायित्व इत्यादींचा समावेश होतो.
(४) संस्कृती : शाश्वत विकासाचे चौथे क्षेत्र संस्कृती आहे. शाश्वततेच्या चार क्षेत्रातील सांस्कृतिक शाश्वतता महत्त्वाची आहे. समाजाची सांस्कृतिक विविधता विचारात घेऊन नव्या धोरणाची आखणी करावी लागते. प्रत्येक राष्ट्रात, प्रदेशात समाजामध्ये सांस्कृतिक भिन्नता असते. प्रत्येक समाज आपल्या संस्कृतीचे जतन करून जीवन जगतो. जगातील काही देश प्रगत, काही विकसनशील, तर अनेक अप्रगत आहेत. त्यानुसार लोकांचे सांस्कृतिक जीवनदेखील भिन्न असते. अप्रगत देशांना प्रगतीसाठी संघर्ष करावा लागतो. सांस्कृतिक भिन्नतेचा परिणाम शाश्वत विकासावर होतो. प्रदेशाच्या सांस्कृतिक स्थितीत संसाधनांचा वापर अवलंबून असतो. सांस्कृतिक स्थितीत लोकांचे शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. सामाजिक शाश्वत विकास समाजाच्या शैक्षणिक स्थितीवर अवलंबून असतो.
मानवी संसाधनाचा विकास शिक्षणावर अवलंबून असतो. समस्यांची सोडवणूक, सर्जनशीलता आणि निसर्गासह शांततेने, सहिष्णुतेने राहणे याकरिता शिक्षण उपयुक्त ठरते. प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यास सांस्कृतिक बदल होऊ शकतो. राष्ट्राला गतिमान करण्यासाठी शिक्षण उपयोगी ठरते. शिक्षण हे शाश्वत विकासाची गतिज ऊर्जा मानली जाते.
शाश्वत विकास हा सामाजिक, राजकीय व आर्थिक विचारप्रणालीशी निगडीत असतो. सामाजिक अस्तित्वाची जाणीव ठेवून राजकीय विचारप्रणालीची तत्त्वे समाज व निसर्ग कल्याणासाठी ठेवून मानवाच्या उन्नतीसाठी शाश्वत आर्थिक विकास साधणे शक्य आहे.
शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत लोकसहभाग असणे गरजेचे आहे. सूक्ष्मस्तरावर नियोजन, मूळ गरजांवर आधारित नियोजन हासुद्धा शाश्वत विकासाचा भाग आहे. नैसर्गिक पर्यावरण व नैसर्गिक संसाधने यांच्या संधारणासाठी लोकांनी सक्रिय होऊन निरनिराळे प्रकल्प वैयक्तिक व सामूहिक पातळीवर राबविणे आवश्यक आहे. पर्यावरणाच्या मर्यादेत राहून आपल्या जीवनाचा विकास करणे हे शाश्वत विकासाचे एक मध्यवर्ती तत्त्व आहे. शाश्वत विकास हा पर्यावरणापेक्षा विस्तृत किंवा व्यापक आहे. तो सशक्त व स्वास्थ्यपूर्ण मानवी समाजासाठी आहे. मात्र आपल्या जीवनाची गुणवत्ता घटवून भावी पिढ्यांची सोय करणे, हे अपेक्षित नाही. शाश्वत विकासाच्या संकल्पनेमुळे एक सामाजिक घटक म्हणून आपल्याला योग्य निर्णय घेता येतात.