(शिक्रा). एक लहान आकारमानाचा शिकारी पक्षी. शिकरा पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या ॲक्सिपिट्रिफॉर्मिस गणाच्या ॲक्सिपिट्रिडी कुलात केला जात असून त्याचे शास्त्रीय नाव ॲक्सिपिटर बॅडियस आहे. या पक्ष्याच्या सहा उपजाती असून आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांत तो दिसून येतो. भारतात त्याची ॲ.बॅ.डुसुमिरी ही उपजाती कायमची निवासी आहे आणि भारतात तो सगळीकडे व हिमालयात सु. १,४०० मी. उंचीपर्यंत आढळतो. शिकरा हा दिसायला ससाण्यासारखाच असतो. त्याची तीव्र दुहेरी शीळ आणि पंखांची फडफड करीत हळूवारपणे उडण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे तो ओळखता येतो.
शिकरा साधारणपणे कबुतराएवढा असतो. शरीराची लांबी २६–३० सेंमी. असते. ॲक्सिपिटर प्रजातीतील इतर पक्ष्यांप्रमाणे पंख लहान गोलाकार असतात. शेपटी अरुंद, निमुळती व लांब असून शेपटीवर चार-पाच आडवे काळसर पट्टे असतात. प्रौढ पक्ष्यांच्या छातीकडील पांढऱ्या भागावर रेखीव लालसर-तपकिरी आडवे पट्टे असतात, तर पाठीचा भाग राखाडी असतो. पोटाकडील भागावर पट्टे तुरळक असतात. मांडीचा भाग पांढरा आणि पाय गडद पिवळे असतात. हनुवटी व गळा पिवळसर असून त्यांच्यावर मध्यभागी गडद पट्टा असतो. मादी नरापेक्षा आकारमानाने मोठी असते. नराची बुबुळे लाल, तर मादीची बुबुळे पिवळसर नारिंगी असतात.
शिकरा विरळ वनांत, जंगलात, वृक्षांच्या राई तसेच शेतीच्या आसपासच्या झाडीत राहतात. घनदाट वने ते टाळतात. हे पक्षी सामान्यपणे एकेकटे किंवा जोडीने वावरतात. लहान पक्षी, लहान सरपटणारे प्राणी, उंदीर, बेडूक, टोळ इत्यादी त्यांचे भक्ष्य असते. भक्ष्याला आश्चर्यचकित करून किंवा भक्ष्याला काहीही समजायच्या आधी ते भक्ष्याला पकडतात. त्यासाठी एखाद्या वृक्षाच्या फांदीवर पानांच्या आड लपून ते सरडे, उंदीर, टोळ आणि इतर लहान प्राण्यांवर नजर ठेवतात, भक्ष्य पकडण्याच्या क्षणी हवेत भक्ष्याच्या दिशेने झेप घेतात आणि भक्ष्याला धोक्याची जाणीव होण्याआधीच त्याच्यावर झडप घालून पकडतात आणि झाडावर नेतात. ते भक्ष्याला नखांनी ओरबाडून, फाडून खातात. बऱ्याचदा ते आकाशात घिरट्या मारतात. अन्यथा ते जमिनीपासून थोड्या अंतरावर घिरट्या घालीत भक्ष्याची टेहळणी करीत फिरतात. उतरताना ते थेट वृक्षाच्या फांदीवर जाऊन विसावतात. खेड्यापाड्यातून कोंबडीच्या पिलांवर अचानक झडप घालून ते पळवितात. लावा, होला, सातभाई यांसारख्या लहान पक्ष्यांचा पाठलाग करून पकडतात. ते धाडसी व क्रूर असतात आणि वेळेप्रसंगी त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या पक्ष्यांवर हल्ला करतात. शिकरा दिसला की जवळपासच्या खारी आणि लहान पक्षी भीतीने ओरडून इतरांना सूचना देतात.
शिकऱ्याचे ओरडणे कोतवाल पक्ष्याप्रमाणे परंतु मोठ्या आवाजाचे असते. मार्च–जून असा त्यांचा विणीचा हंगाम असतो. विणीच्या हंगामात नर-मादी हवेत नाना कसरती करतात. तेव्हा हे पक्षी ‘टिटुई’ असा तीव्र आवाज काढतात. दोघेही घरटे बांधण्यात सहभागी होतात आणि पायांनी काटक्या वाहून नेतात. आंबा, वड किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या शेंड्याजवळ दाट पानांत त्यांचे घरटे असते. घरटे कावळ्याच्या घरट्यासारखे काटक्याकुटक्यांचे असून त्याला बारीक गवत व मुळ्यांचे अस्तर असते. काही वेळा कावळ्याप्रमाणे धातूंच्या तारांचे तुकडे वापरतात. मादी तीन–चार अंडी घालते. अंडी निळसर पांढऱ्या रंगाची असून त्यांच्यावर करड्या रंगाचे पुसट डाग असतात. अंडी उबविण्याचे काम मादी करते. हा कालावधी १८–२१ दिवस असतो. शिकरा पक्ष्याचे सरासरी आयुर्मान २–८ वर्षांपर्यंत (जातीनुसार) असते.