(ओबेसिटी). स्थूलता म्हणजे सामान्य भाषेत लठ्ठपणा. शरीरात घेतल्या जाणाऱ्या गरजेपेक्षा अधिक आहारामुळे मेदऊतींमध्ये मेद साचत जाते आणि स्थूलता उद्भवते. ‘शरीराच्या आदर्श वजनापेक्षा २०% वजन अधिक’ अशी स्थूलतेची व्याख्या केली जाते. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी आदर्श वजन वेगवेगळे मानतात. शरीराची ऊंची व वजन यांच्या तुलनात्मक प्रमाणावरून आदर्श वजन ठरवितात.

वैज्ञानिकदृष्ट्या स्थूलता ही एक वैद्यकीय स्थिती आहे. या स्थितीत व्यक्तीच्या आरोग्यावर विपरित परिणाम घडून येईल इतक्या अतिरिक्त प्रमाणात शरीरात मेद साचलेले असते. व्यक्ती वाजवीपेक्षा कमी वजनाची, आदर्श वजनाची, अधिक वजनाची किंवा स्थूल आहे हे शरीर वस्तुमान निर्देशांकानुसार (बॉडी मास इंडेक्स – बीएमआय) ठरते.

२० वर्षे वयाच्या प्रौढ व्यक्तीसाठी शरीरवस्तुमान निर्देशांक २० किंवा त्यापेक्षा कमी असलेला योग्य मानला जातो. एखाद्या व्यक्तीचा शरीरवस्तुमान निर्देशांक २५ ते ३० यांदरम्यान असल्यास ती व्यक्ती ‘स्थूल’ आणि ३० पेक्षा अधिक असल्यास ‘अतिस्थूल’ अशी वर्गवारी करतात. शरीरवस्तुमान निर्देशांक ३५ पेक्षा अधिक असणे हे ‘स्थूलविकृती’ दर्शक असते.

शरीर वस्तुमान निर्देशांकांसंबंधी असलेला आक्षेप असा की, या निर्देशांकावरून केवळ व्यक्तीचे वस्तुमान व शरीर पृष्ठफळ यांचे गुणोत्तर समजते. त्यामुळे उत्तम शरीरसौष्ठव असलेल्या आणि बळकट बांधा असलेल्या व्यक्तीचा शरीरवस्तुमान निर्देशांक बहुधा जास्त येतो. या निर्देशांकावरून व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेबद्दल किंवा सामान्य आरोग्याबद्दल माहिती मिळत नाही. हा निर्देशांक काढताना व्यक्तीचे वय विचारात घेतले जावे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

स्थूलतेची कारणे : स्थूलता उद्भवण्याची अनेक कारणे आहेत. एखाद्या कुटुंबामध्ये पिढ्यांपिढ्या स्थूलता आढळून येण्यामागे जनुकीय स्थूलप्रवणता (आनुवंशिकता) असते. १९८० च्या दशकाआधी एकूण लोकसंख्येच्या मानाने स्थूल व्यक्तींची संख्या तुलनेने कमी होती. २०१४ नंतर जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या पाहणीनुसार असे आढळले आहे की, आहारात झपाट्याने आलेल्या नवीन तयार अन्नामुळे (प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमुळे) जागतिक पातळीवर अठरा वर्षांवरील स्थूल व्यक्तींचे प्रमाण १३% एवढे झाले आहे.

भारतात स्थूलतेची साथ एकविसाव्या शतकात आली, असे इंडियन हार्ट असोसिएशनचे म्हणणे आहे. भारताच्या लोकसंख्येपैकी ५% व्यक्ती तीव्र स्थूल विकाराने त्रस्त आहेत. भारतातील वाढती खाद्यपदार्थांची बाजारपेठ, मध्यमवर्गीय कुटुंबांच्या उत्पन्नात झालेली वाढ आणि अधिक उष्मांक असलेल्या खाद्यपदार्थाचा आहारात समावेश हीदेखील स्थूलतेची कारणे आहेत.

एका पाहणीनुसार मेद साचण्याशी संबंधित एमसी ४ आर जनुकावरील आरएस १२९७०१३४ क्रमांकाच्या बदलामुळे पोटाचा घेर वाढत जातो. या पाहणीत भारतीय वंशाच्या सु. २,००० व्यक्तींचा समावेश होता. पोटाचा घेर वाढलेल्या सर्व व्यक्तींमध्ये आरएस १२९७०१३४ जनुकामध्ये बदल झालेला आढळून आला.

आंतरराष्ट्रीय संकेतानुसार शरीरवस्तुमान निर्देशांक २५ किग्रॅ./मी. असल्यास ती स्थूल समजली जाते. परंतु, पोटाचा घेर अधिक असलेल्या भारतीय व्यक्तींच्या जनुकीय प्रवृत्तीमुळे २०१२ मध्ये भारतातील व्यक्तींसाठी शरीरवस्तुमान निर्देशांक २३ किग्रॅ./मी. हा निर्देशांक मानावा, असा निर्देश इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिला आहे. भारतीय निर्देशांक १८ किग्रॅ./मी. ते २२.९ किग्रॅ./मी. सामान्य वजन, २२.९ किग्रॅ./मी. ते २४.९ किग्रॅ./मी. असल्यास जास्त वजन आणि २५ किग्रॅ./मी. पेक्षा अधिक असल्यास स्थूल असे वर्गीकरण केलेले आहे.

यूरोपियन वंशाच्या स्थूल व्यक्तींच्या जनुकीय अभ्यासावरून असे दिसून आले आहे की, काही गुणसूत्रांवरील सु. ३० जनुकांच्या लोप पावण्यामुळे लहान वयात स्थूलतेची लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे शरीरातील लेप्टिन आणि इन्शुलीन या संप्रेरकांचा समतोल बिघडतो. अधिक लेप्टिनाच्या प्रभावामुळे नेहमीपेक्षा अधिक अन्न खाण्याकडे कल वाढतो. परंतु, इन्शुलीन कमी स्रवल्याने अतिरिक्त कर्बोदकांचे रूपांतर मेदामध्ये होऊन ते पोटाच्या त्वचेखाली, पाठीवर, नितंबाच्या व मांडीच्या आतल्या भागात साचून राहते. शरीराचे पोषण कर्बोदके, मेद व प्रथिने या घटकांद्वारे होते. परंतु, साचलेल्या मेदाचे विघटन रक्तातील ग्लुकोज ६० ते ७० मिग्रॅ./१०० मिलि. इतके खाली आल्याशिवाय सुरू होत नाही. ग्लुकोजचे प्रमाण एवढे कमी झाल्याने भूक लागते आणि व्यक्ती काही ना काही आहार घेते. आहारानंतर ग्लुकोजचे प्रमाण पूर्ववत होते व मेदाचे विघटन थांबते. याच कारणाने वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती एका वेळेस कमी खातात. परंतु, त्यांचे खाणे अनेक वेळा होते आणि त्यांचे वजन तेच राहते.

स्थूलता उद्भवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे व्यायामाचा अभाव. याचप्रमाणे आहाराच्या चुकीच्या सवयी, अनियमित आहार व निद्रा, आहाराच्या अनियमित वेळा, बैठे काम, कमी शारीरिक हालचाली, मानसिक ताणतणाव या कारणांमुळेही स्थूलता निर्माण होते. तसेच विविध विकारांमध्ये वापरली जाणारी कॉर्टिकोस्टेरॉइड यांसारखी औषधेही स्थूलता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात.

स्थूलतेचे दुष्परिणाम : शरीरात गरजेपेक्षा अधिक मेद साठल्यास अनेक आजार तसेच विकार उद्भवतात किंवा आजार उद्भवण्याची शक्यता वाढते. शरीरातील मेदांचे विघटन मुख्यत्वे यकृतात होत असल्याने यकृतावर अधिक ताण येतो. मेद इन्शुलीनला प्रतिबंध करते, त्यामुळे टाईप-२ मधुमेह होतो. तसेच कर्करोगाची शक्यता बळावते. रक्तवाहिन्या कठीण होतात, त्यामुळे रक्तदाब वाढतो व हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. स्थूलतेमुळे आळस येणे, मनःस्थितीत होणारे सततचे बदल, मनोविकार, श्वसनासंबंधीचे विकार, अंतःस्रावी ग्रंथी आणि प्रजननासंबंधीचे विकार, चेतासंस्थेचे विकार, शरीरातील अस्थींचे विकार घडू शकतात. लहान वयात शरीरात मेद साचत राहिल्यास प्रौढ वयात मधुमेह व हृदयविकार यांचा धोका अधिक वाढतो. थोडक्यात, स्थूलतेचा परिणाम आयु:कालावरदेखील होतो.

एकविसाव्या शतकात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्थूलता ही एक गंभीर समस्या बनली आहे. २०१३ मध्ये अमेरिकन मेडीकल असोसिएशन या संघटनेने स्थूलता हा एक रोग असल्याचे जाहीर केले आहे.

स्थूलतेमुळे उद्भवणारे आजार

उपचार : पुरेसा व्यायाम, जीवनशैलीतील आवश्यक बदल, आहारावरील नियंत्रण, नियमित आहार, आहारनियंत्रण या उपायांनी स्थूल व्यक्तीचे वजन आटोक्यात राहते आणि कालांतराने ते कमी होते. आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर कमी करून तंतुमय पदार्थांचा वापर वाढवावा. तसेच गोड व मैदायुक्त पदार्थांचा वापर टाळावा. आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या व मोड आलेले धान्य यांचा वापर अधिक प्रमाणात करावा. बाजारात मिळणारे प्रक्रिया केलेले तयार अन्न खाणे टाळावे. प्रसंगी स्थूलतेच्या कारणांचा अभ्यास करून समुपदेशक आणि आहारतज्ज्ञ यांच्या मदतीने आहार, व्यायाम आणि आवश्यक औषधे यांचे वेळापत्रक निश्चित करून स्थूलता नियंत्रणात आणता येते.

अतिस्थूलतेवर आहार, व्यायाम आणि औषधोपचार यांनी फरक होत नसेल, तर जठराचे आकारमान कमी करणे हा उपाय केला जातो. यासाठी जठरात फुगा ठेवतात किंवा शस्त्रक्रिया करतात. यामुळे अन्न कमी खाल्ले जाते आणि वजन आटोक्यात येते. वजन तत्काळ कमी करण्यासाठी शरीरात साठलेले मेद शस्त्रक्रियेने काढतात. मात्र, हा उपाय तात्पुरता असतो आणि काही महिन्यांत व्यक्तीचे वजन पूर्ववत झालेले आढळते. तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून लोकांमध्ये स्थूलतेविषयी जागृती निर्माण केल्यास स्थूलतेचे वाढते प्रमाण आटोक्यात आणण्यास मदत होईल.