शेळके, उद्धव जयकृष्ण : (०८ आक्टोबर १९३१ – ०३ एप्रिल १९९२). महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक. प्रामुख्याने वऱ्हाडी या बोलीभाषेतील त्यांचे लेखन विशेष प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे कपडे शिवण्याचा पिढीजात व्यवसाय असणाऱ्या एका कुटुंबात झाला. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव (ठाकूर) हे त्यांचे मूळ गाव होय. हिंगणघाट व अमरावती येथे त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले.एवढ्या शिक्षणानंतर त्यांनी अमरावती शहरातील छापखान्यात अक्षरजुळवणीचे काम केले. अमरावती येथील दैनिक हिंदुस्थान या वृत्तपत्राच्या कार्यालयात त्यांनी काही काळ नोकरी केली. शिवाजीराव पटवर्धन यांच्या तपोवन या सेवाभावी संस्थेच्या मुद्रणालयात त्यांनी व्यवस्थापक म्हणून काही वर्षे नोकरी केली. उदरनिर्वाहासाठी सतत संघर्ष करण्याच्या या काळात त्यांनी वैशिष्ट्य नावाचे एक नियतकालिक सुरू केले पण अल्पकाळातच हे नियतकालिक बंद पडले. पुढे ते उदरनिर्वाहासाठी मुंबईला गेले. तेथे काम न मिळाल्याने ते पुण्याला गेले. तेथे सोबत या नियतकालिकात काही काळ काम केल्यानंतर ते किशोर या नियतकालिकाचे संपादक झाले. काही वर्षे पुण्यात राहिल्यानंतर ते विदर्भात परत आले आणि शेवटपर्यंत विदर्भातच राहिले.

इ.स.१९५० च्या आसपास त्यांनी लेखनास प्रारंभ केला. इ.स.१९५८ मध्ये शिळान अधिक आठ कथा हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांचे आसरा, वानगी, कथावली, संसर्ग, हिरवी झुळूक, घुसळण, गरिबाघरची लेक, किल्ली हरवते तेव्हा, कडुनिंबाची सावली, बाबला, उमरखा कुलकर्णी, बिंदिया, उमलली कळी हे आणि आणखी काही कथासंग्रह प्रकाशित झाले. यापैकी शिळान अधिक आठ कथा हा संग्रह विशेष लोकप्रिय ठरला. या संग्रहातील माय ही कथा सत्यकथा या नियतकालिकात प्रथम प्रकाशित झाली होती. विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरण कवेत घेणाऱ्या संग्रहातील कथांतून तळपातळीवरील ग्रामीण जीवनाचा वेध घेतला. विदर्भातील गावगाड्यातील माणसांच्या जगण्याचे ताणेबाणे, अत्यंत उत्कटपणे, गंभीरपणे या कथांमधून अभिव्यक्त झाले आहेत. शेळके यांच्या या कथा माणसांच्या व्यथा-वेदनांचे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या आहेत. विदर्भातील ग्रामीण बोलीभाषेमध्ये या कथा साकार झाल्या आहेत. गावगाड्यातील तळपातळीवरच्या कष्टकरी शेतमजूर स्त्रीच्या व्यथा, तिचा जगण्याचा संघर्ष, कुटुंबासाठीची सर्व पातळ्यांवरची तडफड आणि तगमग, तिची मानसिक कुचंबणा तिचे शब्दांतून न मांडता येणारे कष्ट हे आणि असे विविधलक्षी वास्तव शेळके यांनी माय या कथेपासून पुढे त्यांच्या अनेक कथांमधून-कादंबऱ्यांमधून मांडले आहे. शिळान अधिक आठ कथा या संग्रहातील कथा सशक्त आशयबीज असलेल्या आणि मराठी कथेच्या प्रवाहात लक्षणीय ठरणाऱ्या आहेत.

उद्धव शेळके यांनी विपुल कादंबरी लेखन केले. नांदत घर ही त्यांची पहिली कादंबरी १९५५ मध्ये कथासृष्टी या नियतकालिकाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली, त्यानंतर १९५६ मध्ये ग्रंथरूपाने प्रकाशित झाली. त्यानंतर १९६० मध्ये त्यांची धग ही कादंबरी प्रकाशित झाली. धग ही कादंबरी मराठी कादंबरीच्या प्रवाहात महत्त्वाची ठरली. शेळके यांनी नांदतं घर, धग, अगतिका, बाई विना बुवा, येथे जिद्द संपते, गर्विता, धुंदी, पुरुष , वळणावरचं वय, असे हे असे हे, सौदा, हरवले ते, दाह, कोवळीक, गोल्डन विला, रग, देवदासी, आग, लेडीज होस्टेल, अनौरस, आडवाट, डाळिंबाचे दाणे, नर्तकीचा नाद, ऋणांकिता, नागीण, हव्यास, महापाप, म्हणून, डाग, बाप, डार्करूम, गुड बाय बॉम्बे, जायबंदी, लाल दिवा, निर्माता, साहेब, मनःपूत, खंजिरीचे बोल, महामार्ग या आणि आणखीही काही कादंबऱ्या लिहिल्या. यापैकी धग ही त्यांची एकमेव कादंबरी आशय आणि अभिव्यक्तीदृष्ट्या मराठी कादंबरीच्या प्रवाहात नवीन आणि मौलिक ठरली. भाषा, व्यक्तिरेखा, सांस्कृतिक वास्तव आणि दुःखाचे उत्कट दर्शन या वैशिष्ट्यांमुळे ही कादंबरी आशय, कलात्मकता, भाषा या तीनही पातळ्यांवर यशस्वी ठरली. १९६० नंतरच्या मराठी साहित्य प्रवाहात धग ही कादंबरी मैलाचा दगड मानली जाते. साहेब ही कादंबरी आचार्य प्र.के.अत्रे यांचे चरित्र कथन करणारी कादंबरी होय. मन:पूत ही साहित्यिक पु.भा.भावे यांच्या जीवनाविषयीची चरित्रात्मक कादंबरी आहे. तर खंजेरीचे बोल ही कादंबरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन व कार्याचा वेध घेणारी चरित्रात्मक कादंबरी आहे.

उद्धव शेळके यांनी सुनबाई परत येते, मिस मंदा म्हात्रे, पोहा चाल्ला महादेवा ही नाटके लिहिली. पोहा चाल्ला महादेवा हे नाटक धग या कादंबरीवर आधारित होते. त्यांच्या डाळिंबाचे दाणे या कादंबरीवर रानपाखरं हा चित्रपट निघाला. रानपाखरं या चित्रपटाची कथा तर माणुसकी या चित्रपटाचे संवाद लेखन शेळके यांनी केले. दिसतं तसं सुचतं आणि उद्धव उवाच ही दोन ललितगद्यलेखांची पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी काही अनुवाद केले आहेत आणि बालसाहित्य देखील लिहिले आहे. याशिवाय त्यांनी आकाशवाणीसाठी श्रुतिकालेखन देखील केले आहे. शेळके यांनी आयुष्यभर विपुल लेखन केले. लेखन हेच शेळके यांच्या उपजीविकेचे साधन होते.

शेळके यांच्या कथात्मक लेखनामध्ये विविध प्रकारच्या स्त्रीव्यक्तिरेखा प्रामुख्याने आढळतात; तथापि त्यांच्या धग या कादंबरीतील कौतिक ही व्यक्तिरेखा त्यांच्या एकूणच लेखनामध्ये सर्वाधिक महत्त्वाची ठरली. मराठी कादंबरीच्या प्रवासातही त्यांची ‘कौतिक’ ही व्यक्तिरेखा संस्मरणीय ठरली आणि धग ही कादंबरी एकूण मराठी कादंबरीच्या प्रवाहात मौलिक ठरली. “कौतिकची व्यक्तिरेखा, खेड्यातील माणसे, कृषिसंस्कृतीचे जीवनचक्र आणि विदर्भातील बोलीभाषेतले संवाद निवेदनातून उभे झालेले ग्रामीण जीवनाचे तपशीलवार चित्रण यांमुळे आणि गंभीर कथानकामुळे ही कादंबरी कलात्मकतेचे नवे शिखर गाठणारी कृती ठरते ” अशा शब्दांत या कादंबरीची वैशिष्ट्ये संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशात टिपलेली आहेत. धग या कादंबरीएवढे यश गाठता आले नसले तरी शेळके यांच्या इतर एकूणच कथात्मक लेखनकृतींमध्ये सामाजिक वास्तवाचे प्रत्ययकारी दर्शन घडते. यासंदर्भात डाळिंबाचे दाणे, देवदासी आदी कादंबऱ्या लक्षणीय आहेत.

बाई विना बुवा ही त्यांची कादंबरी अश्लिलतेच्या आरोपांमुळे गाजली आणि त्यामुळेच वादग्रस्तही ठरली. या कादंबरीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही केली गेली. या कादंबरीच्या वादाचे पडसाद विधानसभेतही उमटले. राज्य शासनाने नेमलेल्या समितीने ही कादंबरी अश्लिल नसल्याची अहवाल दिला. या कादंबरीची चर्चा मात्र फार झाली. उद्धव शेळके यांच्या शिळान अधिक आठ कथा, धग आणि अगतिका या साहित्यकृतींना महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार लाभले. धग या कादंबरीचा नॅशनल बुक ट्रस्टने प्रमुख भारतीय भाषांत अनुवाद केला आहे. पोहा चाल्ला महादेवा या नाटकास १९८२ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक व एकूण २१ पारितोषिके मिळाली. त्यांच्या लेडिज होस्टल या कादंबरीची तेरा भागांची मालिका दूरदर्शन वरून प्रसारित झाली.

१९८१ मध्ये दर्यापूर ( जि.अमरावती) येथे झालेल्या पाचव्या वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९९२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या गावी झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

संदर्भ :

  • गणोरकर, प्रभा; टाकळकर, उषा ; डहाके, वसंत आबाजी; दडकर,जया; भटकळ, सदानंद (संपादक), संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९२० पासून २००३ पर्यंतचा कालखंड) : खंड दोन, मुंबई, २००४.
  • राजाध्यक्ष, विजया (संपादक), मराठी कादंबरी : आस्वादयात्रा, मुंबई, २००८.