दारा शुकोह : (२० मार्च १६१५ – ३० ऑगस्ट १६५९). दिल्लीचा पाचवा मोगल बादशाह खुर्रम उर्फ शाहजहान (१५९२-१६६६) याचा मुलगा आणि चौथा बादशाह जहांगीर (कारकिर्द १६०५-२७) याचा नातू. शाहजहानची द्वितीय पत्नी अर्जुमंद बानो बेगमपासून अजमेर येथे हा जन्मला. त्याचे नाव जहांगीरने प्राचीन इराणी राजा दारियसच्या नावावरून ‘दारियसप्रमाणे राजबिंडाʼ अशा अर्थी ठेवले. दाराला जहांआरा, हूरुन्निसा या बहिणी, तर शाह शुजा, औरंगजेब आणि मुरादबक्ष हे भाऊ होते. प्रथेप्रमाणे दारा चार वर्षे, चार महिने व चार दिवसांचा झाल्यावर त्याची सुंता करण्यात आली व त्याचा मोठा समारंभ आयोजित केला गेला. त्याचे बालपण अधिकतर बुरहानपूरमध्ये गेले. शाहजहानने बापाविरुद्ध बंड पुकारल्यानंतरच्या स्वाऱ्यांत त्याचा कुटुंबकबिलाही सोबत असे. त्यातच दारानेही देशभर प्रवास केला. अखेरीस १६२६ साली शाहजहानने शरणागती पतकरल्यावर दारासह अन्य राजपुत्रांनी जहांगीरच्या आदेशावरून राजधानी आग्र्याचा रस्ता धरला. शाहजहानने पुढे बंड करू नये, यासाठी त्याचे पुत्र ओलीस ठेवून घेतले गेले. तेथून जहांगीरसोबतच दाराने लाहोर व काश्मीरचाही प्रवास केला. जहांगीरनंतर शाहजहान व त्याच्या भावांमध्ये युद्धे झाली. त्यांत शाहजहान विजयी ठरला व तो मोगल बादशाह झाला.
शाहजहानने आपला दरबार बुरहानपूरला हलवला (मार्च १६३०). तेथेच दाराने चित्रकारांकडून काही चित्रे तयार केली व त्यांना प्रस्तावना लिहून एक चित्रसंग्रह (अल्बम) तयार केला. सुलेखनकला व एकूणच साहित्यनिर्मितीचा हा त्याचा पहिला प्रयत्न होय. जहांगीरचा दिवंगत भाऊ परवेझ याची मुलगी नादिरा बानू हिच्याशी दाराचे लग्न झाले (१६३३). या लग्नाला तत्कालीन तब्बल ३२ लाख रुपये खर्च आला. १६३४ सालच्या जानेवारी महिन्यात दारा व नादिरा बानू यांना एक मुलगी झाली, ती अल्पवयीन ठरली. लाहोरमध्ये दाराची मियां मीर या कादिरीपंथीय सूफी संत आणि त्यांचा शिष्य मुल्ला शाह यांच्याशी परिचय झाला. पुढे मुल्ला शाहने इस्लामविरोधी वक्तव्ये केल्याच्या आरोपाखाली त्याला मारण्याचा फतवा काही मौलवींनी काढला, तेव्हा दाराच्याच मध्यस्थीने तो फतवा शाहजहानने रद्द केला.
दाराला सुलेमान (१६३५) आणि मेहेर (१६३८) अशी मुले झाली. दाराने सफिनात-उल-औलिया हा ग्रंथ रचला (१६४०). सूफी पंथातील कादिरी, चिश्ती, कुब्रावी, सुहरावर्दी या चार महत्त्वाच्या शाखांमधील चारशे संतांची चरित्रे हा या ग्रंथाचा विषय होता. तसेच त्याने आध्यात्मिक विषयांवर ‘कादिरी’ या नावाखाली काव्यरचना केली.
इराणी सफावी सत्तेशी लढण्याकरिता दारा कंदाहारच्या मोहिमेवर निघाला (१६४२). लाहोरपर्यंत पोहोचल्यावर तत्कालीन सफावी बादशहा शाह शफी मरण पावल्याचे समजल्यावर मोहिमेची गरज संपल्याने तो पुन्हा आग्र्यात परतला. त्यानंतर त्याने सकिनात-उल-औलिया हा ग्रंथ पूर्ण केला (१६४३). यात संतांच्या आठवणी व दाराची अध्यात्म साधना यांबद्दलचे विवेचन आहे.
काश्मीरच्या वास्तव्यात दाराने रिसाला-इ-हकनुमा नामक अध्यात्म साधनाविषयक ग्रंथ लिहिणे सुरू केले (१६४५). त्याच वर्षी जून महिन्यात त्याला चुनार व रोहतास या महत्त्वाच्या किल्ल्यांसह अलाहाबाद प्रांताची सुभेदारी देण्यात आली. शाहजहानने दाराच्या मुलांचा शिक्षक बाकी बेग याला तिकडे पाठवून दाराला दरबारातच ठेवले. या दरम्यान दाराने शेख मुहिब्बुल्लाह मुबारिझ नामक एका प्रसिद्ध चिश्तीपंथीय सूफी संताशी पत्रव्यवहार सुरू केला. बाल्खच्या मोहिमेत भाग घेण्याकरिता दारा लाहोरपर्यंत गेला (१६४६) व त्याची पत्नी नादिरा आजारी असल्यावरून तेथे तो काही महिने थांबला. यावेळी त्याने तिला एक चित्रसंग्रह भेट दिला व …हकनुमा ग्रंथही पूर्ण केला. या ग्रंथात त्याने त्रिमूर्ती, योगचक्रे इ. हिंदू संकल्पनांचे वर्णन केलेले आहे. या सुमारास एक तत्त्वज्ञ म्हणून दाराची प्रसिद्धी झाल्याने इलाजात-इ-दाराशुकोही या वैद्यकीय कोशाला त्याचे नाव देण्यात येऊन त्यात त्याची स्तुती केलेली आढळते.
शाहजहानने दाराला अलाहाबादसोबतच पंजाबचाही सुभेदार नेमले (मार्च १६४७). दाराने काश्मीरमध्ये परिमहालसारखी इमारत बांधली. काश्मीरमध्ये असतानाच त्याने थोरला मुलगा सुलेमानचे लग्न ख्वाजा अब्दुल अझीझ नख्शबंदीच्या नातीशी लावले (१६५१). सफावी सत्तेकडून कंदाहार हस्तगत करण्यासाठी शाहजहानने दाराला पाठवले (१६५२). मोठे सैन्य, एक कोटी रुपये आणि मोठ्या तोफांसह दारा तेथे पोहोचला (१६५३). १५ मे १६५३ रोजी प्रत्यक्ष स्वारी सुरू झाली. या आधीच्या कंदाहार मोहिमांत भाग घेतलेल्या अनुभवी सरदारांऐवजी दाराने जाफर नामक अननुभवी तोफखाना प्रमुखावर भिस्त टाकली. जाफर दिलेल्या आश्वासनांना प्रत्यक्षात आणू शकला नाही. यांशिवाय जाफर आणि मीरबक्षी मिर्झा अब्दुल्ला, दारा व मिर्झाराजे जयसिंग यांच्यात भांडणे झाली. अखेरीस निकराच्या प्रयत्नाने किल्ल्याची तटबंदी भेदूनही जाफर व अन्य अधिकाऱ्यांच्या ढिसाळपणामुळे सफावी सत्तेने मोगल सैनिकांना परतवून लावले. मोहीम अयशस्वी झाल्याने दारा दिल्लीत परतला (जानेवारी १६५४). या दरम्यान दाराने हसानत-उल-आरिफिन हा सूफी संतवचनसंग्रहावरील ग्रंथ पूर्ण केला (१६५४). दिल्लीतील वास्तव्यात दाराने मिर्झाराजे जयसिंगाशी संधान बांधले व त्याचा पुतण्या अमरसिंगच्या मुलीशी स्वत:चा मुलगा सुलेमानचे लग्न लावले. ऑक्टोबर १६५४ मध्ये मेवाडचा असंतुष्ट राणा करणसिंग व मोगलांत दाराने यशस्वी वाटाघाटी घडवून आणल्या. दाराने हिंदू धर्माचा अभ्यास सुरू केला. यासाठी त्याला कवींद्राचार्य सरस्वती, ब्रह्मेंद्र सरस्वती, जगन्नाथ इ. पंडितांचे साहाय्य लाभले. रजपूत राजांशी येणाऱ्या वाढत्या संपर्काचा हा परिणाम असल्याचे काही संशोधकांचे मत आहे. या खेरीज दाराने जेझुईटपंथीय ख्रिश्चन पाद्र्यांकरवी ख्रिस्ती धर्माचा आणि सरमद नामक पूर्वाश्रमीच्या ज्यू करवी ज्यू धर्माचाही अभ्यास सुरू केला.
शाहजहानने आपल्या साठाव्या वाढदिवशी दाराला आपला वारस व भावी बादशाह घोषित केले आणि ‘शाह बुलंद इकबालʼ हा किताब देऊन दरबारात सिंहासनाजवळ एका खुर्चीत बसण्याचा बहुमानही दिला. याच वर्षी दाराने मजमू-अल-बहरिन हा ग्रंथ लिहिला. इस्लाम आणि हिंदू धर्मांमधील आंतरिक आध्यात्मिक सत्य एकच असल्याचे प्रतिपादन त्याने या ग्रंथात केलेले आहे. याचे संस्कृत भाषांतरही समुद्रसंगम या नावे पूर्ण झाले (१६५५). या शिवाय त्याने लघुयोगवासिष्ठाचेही जोग बसिश्त नामक फार्सी भाषांतर करवून घेतले.
दाराने उपनिषदांचे फार्सी भाषांतर करवून घेणे सुरू केले (१६५७). एकूण पन्नास उपनिषदे यासाठी संस्कृत पंडितांकडून निवडण्यात आली. पंडितांकडून हिंदी सारांश ऐकून फार्सीप्रवीण मुल्ला-मौलवींनी त्याचे भाषांतर केले. याला सिर्र-इ-अकबर असे नाव देण्यात आले. हे काम सहा महिन्यांत पूर्ण झाले. कुराणात उल्लेखिलेले ‘किताब मक्नुन’ अर्थात गुप्त पुस्तक म्हणजे उपनिषदेच होत, असे प्रतिपादन यात दाराने केले. या शिवाय इतरही अनेकप्रकारे उदाहरणे देऊन इस्लामी परंपरेत वेद व उपनिषदांना बसवण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो. यानंतर शाहजहान आजारी पडला व दारा त्याची काळजी घेऊ लागला. काही काळाने शाहजहानला बरे वाटल्यावर तो हवापालटासाठी आग्र्याला गेला. या दरम्यान शाहजहानच्या मृत्यूच्या अफवा उठल्याने बंगालचा सुभेदार व दाराचा सख्खा भाऊ शुजाने स्वत:ला बादशाह घोषित केले. त्याचा सामना करण्यासाठी दाराने त्याचा मुलगा सुलेमानला मिर्झाराजे जयसिंगासोबत पाठवले. फेब्रुवारी १६५८ मध्ये दोहोंत काशीजवळ बहादुरपूर येथे लढाई झाली व शुजाचा पराभव झाला; परंतु तो यशस्वी रीत्या निसटला. पाठोपाठ दाराचा दुसरा भाऊ मुरादनेही स्वत:ला बादशाह घोषित केले व वऱ्हाडात बदलीचे फर्मान धुडकावले. औरंगजेबाने शाहजहानची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला व शुजा आणि मुरादशीही संधान बांधले. यानंतर अनेक लढाया झाल्या. धर्माट येथे औरंगजेब आणि मुरादच्या संयुक्त सैन्याने शाही सैन्याचा पराभव केला. सुलेमान शुकोह आणि मिर्झाराजे जयसिंग यांनी बंगालमध्ये शाहजहानच्या आज्ञेवरून शुजाशी तह केला; परंतु परतण्यास मात्र जयसिंगाने बराच उशीर केला. यानंतरच्या शामूगढच्या लढाईत औरंगजेबाने दाराचा पराभव केला. दारा तेथून निसटून लाहोरला गेला. शाहजहान व दारा दोघांनीही मुराद व शुजाला औरंगजेबाविरुद्ध फितवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. दाराने लाहोरमध्ये सैन्य उभे करण्याचा प्रयत्न केला. तो फसल्यावर दारा औरंगजेबाच्या पाठलागाला तोंड देत पंजाब, सिंध व अखेरीस गुजरातमध्ये पोहोचला. या वेळी दारासोबत कुटुंबाखेरीज फक्त दोन हजार सैनिक होते. तेथून पुन्हा मुलतानमार्गे कंदाहारला जाताना वाटेत बोलन खिंडीजवळ दाराची पत्नी नादिरा आजारपणामुळे मरण पावली. तेथीलच मलिक जीवन नामक एका जमीनदाराने दाराला पकडून औरंगजेबाच्या हवाली केले. औरंगजेबाने दाराला ठार मारले. दाराला सुलेमान, मेहेर, सिपिहर हे मुलगे व पाकनिहाद बानो आणि जहांझेब बानो या मुली होत्या. पैकी सुलेमानलाही नंतर मारण्यात आले; मात्र उर्वरित मुलामुलींची लग्ने औरंगजेबाने स्वत:च्या आणि शुजा व मुरादच्या मुलांशी लावली.
कोणत्याही मोगल बादशाहपेक्षा दाराचे ग्रंथप्रेम आणि हिंदू धर्माबद्दलची उत्सुकता अनेकपटींनी जास्त होती. त्याला प्रशासनाचाही प्रत्यक्ष अनुभव तुलनेने उशिरा का होईना आलाच होता; तथापि लढाई व एकूण राजकारणात तो त्याच्या भावांपुढे अयशस्वी ठरला.
संदर्भ :
- Gandhi, Supriya, The emperor who never was – Dara Shukoh in Mughal India, Harvard University Press, Cambridge, Massachusetts, USA, 2020.
- Nur-ud-Din Muhammad Jahangir, Ed., Hashim, Muhammad, Jahangir-nama (Tuzuk-i-Jahangiri), Fahrang, Tehran, 1980; Thackston, Wheeler M. Trans., The Jahangirnama: Memoirs of Jahangir, Emperor of India, Oxford University Press, New York, 1999.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर