प्राचीन ग्रीक चित्रकलेतील अजूनही अस्तित्वात असलेल्या आणि विपुल प्रमाणात उपलब्ध झालेल्या पुराव्यांमध्ये मृत्पात्रांवरील चित्रणाचा समावेश होतो. ग्रीक मृत्पात्र चित्रकला ही इतर चित्रणपद्धतीपेक्षा तंत्र, प्रमाण आणि उद्दिष्ट यामध्ये वेगळी असल्याचे आढळते. साधारण इ.स.पू. १००० ते ४०० या काळातील ग्रीक संस्कृतीतील मृत्पात्री म्हणजे फक्त विभिन्न आकारांचे कलश नव्हे, तर त्या बरोबरच ती प्राचीन काळातील ग्रीकांच्या सांस्कृतिक श्रद्धा, संकेत व रिवाजांचे प्रतिरूप आहेत. या ग्रीक कलशांवरील चित्ररचना ग्रीकांच्या बदलत्या काळातील बदलत्या शैलींच्या मूलतत्त्वांचा यथार्थ प्रत्यय घडवून आणतात. मृत्पात्रांवरील चित्रण हे मृत्पात्र बनविण्याच्या पद्धतीपेक्षा पूर्णतः वेगळे कौशल्य होते. ह्या मृत्पात्रांवरील चित्रणकलेतून ग्रीक चित्रकलेतील सौंदर्यशास्त्राची जाणीव दिसून येते.

झाकण असलेले क्रेटर, सायप्रस, भौमितिक काळ

ग्रीक मृत्पात्रांवरील चित्रण शैलीचे तज्ञांनी प्रामुख्याने त्यावरील आकार, रचना, रंगसंगती यानुसार तसेच कालानुसार वर्गीकरण केलेले आढळते. ते पुढीलप्रमाणे –

  • भौमितिक शैली (Geometric Style, इ.स.पू. ९०० ते ७००),
  • पौर्वात्य काळ्या आकृत्यांची शैली (Oriental Black Figure Style, इ.स.पू. ८०० ते ६००),
  • वन्य बकरी मृत्पात्र शैली (Wild Goat Pottery Style, इ.स.पू. ६८० ते ५७०)
  • काळ्या-आकृत्यांची मृत्पात्र शैली (Black-Figure pottery style, इ.स.पू. ६२५ ते ४८०)
  • द्विभाषिक कलश चित्रण (Bilingual vase painting, इ.स.पू. ५३० ते ५००)
  • लाल आकृत्यांची मृत्पात्र शैली (Red-Figure Pottery Style, इ.स.पू. ५३० ते ३२३)
  • पांढऱ्या-पृष्ठावरील तंत्र (White-Ground technique, इ.स.पू. ५०० ते ४००)
  • काळी झिलईयुक्त मृत्पात्री (Black-Glazed Pottery, इ.स.पू.सु. ५३० ते ३००)
  • पश्चिम उतारावरील मृत्पात्री (West Slope pottery, इ.स.पू. ४०० ते २००)

ग्रीकांच्या प्राचीन संस्कृतीतील भौमितिक काळातल्या प्रामुख्याने इ.स.पू. ९०० ते ७०० मधील भौमितिक रूपचिन्हांनी चित्रित केलेल्या मृत्पात्रांवरील चित्रणकलेला ‘भौमितिक कला’ तर ह्या विशिष्ट शैलीमुळे ह्या काळालाही ‘भौमितिक काळ’ अशा नावाने ओळखले जाते. ह्या काळात बनविल्या गेलेल्या मृत्पात्रांचा नियमित वापराशिवाय दफनविधी संस्कारासाठी, स्मारकपात्र म्हणून विविधप्रकारे उपयोग होत असे. आरंभिक भौमितिक काळातील मृत्पात्रे उंच आकाराची होती, तरी त्यावरील सजावट ही फक्त मृत्पात्रांच्या मानेपासून मधल्या भागापर्यंतच केलेली असे व उरलेल्या भागावर मातीच्या राळेचा पातळ थर दिलेला असे. ज्याचा रंग भाजल्यानंतर धातूसारखा गडद व चमकदार झालेला दिसतो. भौमितिक काळात नागमोडी वळणाचे आकार व स्वस्तिक रूपचिन्हे प्रथमच चित्रणासाठी वापरल्याचे आढळून येते. मध्य भौमितिक काळात मृत्पात्रांवर वरपासून खालपर्यंत चितारलेल्या पट्ट्यांमुळे सजावटीच्या क्षेत्राची विभागणी झाल्याचे दिसते. तर उत्तर भौमितिक काळात कलशांच्या मानेवर, खालच्या भागावर व दोन्ही मुठींच्या मधील भागात भौमितिक आकारातील प्राणी व मानवाकृतीचे चित्रण केलेले दिसून येते.

पश्चिम उतारावरील मृत्पात्री

भौमितिक काळातील कलशांवर ‘होरोर वाकुई’  (horror vacui – लॅटिनमध्ये ‘रिक्त जागेची भीती’) ह्या चित्रणशैलीचा वापर केलेला दिसतो. ज्यात संपूर्ण पृष्ठभाग आकृत्यांनी आणि नक्षीदार नमुन्यांनी भरलेला असतो. या मृत्पात्रांवर नागमोडी व सर्पिलाकार वळणे, त्रिकोण, स्वस्तिक असे विविध प्राथमिक भौमितिक आकार, ठोकळेवजा आकार व विस्तारित आकारांचे चित्रण केलेले दिसते. ह्या काळापासून मृत्पात्र चित्रकारांनी फक्त एकाच शैलीत चित्रण न करता स्थानिक किंवा बाहेरच्या प्रदेशातून आलेल्या शैलींमध्ये कौशल्य मिळवून स्वतःची वेगळी शैलीही निर्माण केल्याचे आढळते.

आर्ष काळाच्या आरंभीस साधारण १०० वर्षांपर्यंत म्हणजे प्रादेशिक कालावधीतही (इ.स.पू. ७०० ते ६००) भौमितिक कला टिकून राहिलेली दिसते. ह्या काळातील कॉरिंथ (corinth) येथील मृत्पात्रांवर मानवाकृतींच्या चित्रणापेक्षा सिंह, ग्रिफिन (griffin), स्फिंक्स (sphinx) आणि सिरेन (siren – उभयचर प्राणी) या प्राण्यांचे चित्रण जास्त प्रमाणात झालेले दिसते. भौमितिक आकारांऐवजी ताडाच्या पानांसारखे आणि कमळाचे आकार रिक्त जागा भरण्यासाठी वापरलेले दिसतात. त्यामुळे काही कलशांवर पृष्ठभागावरील नकारात्मक जागा जास्त उठावदार झाल्याचे आढळते. मूळ कॉरिंथ नगरातून निर्माण होऊन प्रथम अथेन्स व नंतर ग्रीसमध्ये पसरलेल्या ह्या शैलीला पौर्वात्य काळ्या आकृत्यांची मृत्पात्र शैली (Oriental Black Figure Style/ Orientalizing Pottery style) असे संबोधतात. आर्ष काळाच्या शेवटी साधारण इ.स.पू. ६५० ते ५७० या काळात दक्षिण व पूर्व आयोनियन बेटांवरील कलाकारांनी ‘वन्य बकरी मृत्पात्र शैली’ (Wild Goat Pottery Style) यामध्ये मृत्पात्रांवर चित्रण केलेले दिसते.

भौमितिक काळात रुजलेली व अथेन्स या शहरातून पसरलेली ‘ॲटिक कलश चित्रकला’ (Attic Vase Painting) पुढे आर्ष काळात बोएशिया, कॉरिंथ, सिक्लाडीझ, आयोनिआ या पूर्व इजीअन बेटांवर वेगाने फोफावली. आर्ष काळामध्ये उत्तरार्धात नंतरच्या कलाकारांनी ‘काळ्या-आकृत्यांची मृत्पात्र शैली’ (Black-Figure pottery style), ‘लाल आकृत्यांची मृत्पात्र शैली’ (Red-Figure Pottery Style) आणि ‘पांढऱ्या-पृष्ठावरील तंत्र’ (White-Ground technique) यामध्ये प्राविण्य मिळविलेले दिसते. सातव्या शतकात कॉरिंथमध्ये निर्माण झालेल्या चैतन्यदायी लाल रंगाच्या मृत्पात्रांवर काळ्या छायाकृती कोरून काढण्याच्या तंत्राला काळ्या-आकृत्यांचे तंत्र म्हणून ओळखले गेले. काळ्या आकृत्यांचे चित्रण अँफोरा व कलश यांबरोबरच प्रामुख्याने प्याला, लेकीथोई (lekythoi) म्हणजे मूठ असलेली बाटली, किलिक्स (kylixes) म्हणजे पाया असलेला प्याला, पिक्सिडस (pyxides) म्हणजे झाकणयुक्त पेट्या आणि वाडग्यांवरही केलेले आढळते.

कॉरिंथियन काळ्या आकृत्यांचा कलश

लाल आकृत्यांच्या शैलीतील मृत्पात्रांची निर्मिती इ.स.पू. ५३० ते ५०० व ४८० ते ३२३ अशा दोन कालावधीत झाल्याचे दिसते. साधारण  इ.स.पू. ५३० ते ५०० काळामध्ये अँडोकिड्स, ओल्टोस (Oltos) आणि सायआक्स (Psiax) या चित्रकारांनी केलेली मृत्पात्री ‘द्विभाषिक कलश चित्रण’ (Bilingual vase painting) या नावाने ओळखली जातात. या दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या शैलीत तयार केलेल्या द्विभाषिक कलशांमधून संक्रमणकाळाची कल्पना येते. ज्यात काळ्या आकृत्यांची जागा हळूहळू लाल आकृत्या घेऊ लागल्याचे आढळते. सुरुवातीच्या काळातील मृत्पात्रांवर रेखाटलेल्या विषयांमध्ये वीरांची व ग्रीक देव डायोनायससशी संबंधित दृश्ये तसेच दैनंदिन जीवनातील दृश्यांचा समावेश होतो. इ.स.पू. ४८० ते ३२३ या कालावधीतील कलश खूप भपकेदार होते; पांढऱ्या, कधीकधी पिवळ्या-तपकिरी, सोनेरी आणि निळ्या रंगामध्ये बारीक तपशील दाखवलेले होते. विषय आणि त्यांवरील अभिव्यक्ती सहसा साध्या स्वरूपात असल्या तरी बऱ्याचदा विषय भावनिकही असत.

इ.स.पू. सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात ‘पांढऱ्या-पृष्ठावरील तंत्र’ विकसित झाल्याचे आढळते. त्यात पांढऱ्या पृष्ठभागावर रंगांचा वापर आणि बऱ्याचदा सुवर्णलेपन केलेले असे. इतर शैलींपेक्षा ह्या तंत्रात अनेक रंग वापरण्यास वाव होता. इ.स.पू. पाचव्या ते चौथ्या शतकात पांढऱ्या पृष्ठावरील तंत्राने खूपच महत्त्व प्राप्त केले होते.

ग्रीकांश काळात मृत्पात्रांवरील चित्रणास उतरती कळा लागून काळ्या व लाल आकृत्यांच्या शैलीतील निर्मिती लोप पावलेली दिसते. अभिजात काळापासून इतर शैलींप्रमाणे कोणतेही चित्रण नसलेल्या ‘काळ्या झिलईयुक्त मृत्पात्रांची’ (Black-Glazed Pottery) निर्मिती झाल्याचे आढळते. उत्तर अभिजात काळापासून ह्या शैलीचा उपप्रकार असलेल्या ‘पश्चिम उतारावरील मृत्पात्रांची’ (West Slope pottery) निर्मिती मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. ही विशिष्ट मृत्पात्री अथेन्सच्या अक्रोपोलिस येथील पश्चिमेच्या उतारावरून मिळाल्यामुळे ‘पश्चिम उतारावरील मृत्पात्री’ म्हणून ओळखली जातात. इ. स. पू. चौथ्या शतकात सुरुवात झालेल्या ह्या मृत्पात्रांवर पांढऱ्या, पिवळ्या आणि गुलाबी मृत्तिकेच्या राळेने कोरीवकाम व द्यूतचक्राच्या चौकटीप्रमाणे सजावट केलेली आढळते.

लाल आकृत्यांची मृत्पात्र शैली जसजशी संपुष्टात येऊ लागली, तसतसे ग्रीक मृत्पात्री चित्रणकलेतील दर्जा आणि कलात्मक गुणवत्ता यांवर परिणाम झालेला दिसतो. तरीही इ.स.पू. तिसऱ्या शतकात मृत्पात्री बनविण्याचे कार्य थोड्याफार प्रमाणात सुरुच राहिलेले दिसते.

संदर्भ :

  • Boardman, John, Early Greek Vase Painting: 11th-6th Centuries BC: A Handbook,  London, 1998.
  • Cook, R.M. and Pierre Dupont, East Greek Pottery, London, 1998.
  • Herford, Mary Antonie Beatrice, A Handbook of Greek Vase Painting, 2011.
  • Von Bothmer, Dietrich, : Metropolitan Museum of Art, Greek Vase Painting, New York, 1987.