ओडिशातील मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ. हे ओडिशातील चिल्का सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रारंभिक ऐतिहासिक काळातील एक बंदर असून ते गंजाम जिल्ह्यात आहे. बंगालच्या उपसागरापासून दूर असल्याने चिल्का सरोवरात गौरांगपटणा बंदरांसारख्या ठिकाणी जहाजांना सुरक्षित जागा उपलब्ध होती. गौरांगपटणाचे पुरातत्त्वीय स्थळ चार हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. बंदराची जागा दोन टेकड्यांच्या मध्यभागी असून ते दूर अंतरावरून सहज ओळखता येते. या दोन टेकड्यांच्या मध्यभागी प्राचीन काळात पाण्याचा एक प्रवाह असल्याने तेथे नौका सुरक्षितपणे उभ्या राहू शकत असत; तथापि ओडिशातील प्राचीन अथवा मध्ययुगीन बंदराच्या यादीत गौरांगपटणाचा उल्लेख आढळत नाही. सध्या गौरांगपटणा हे मच्छिमारांचे छोटे गाव असून ते अलीकडच्या काळातील आहे.
सन २०१५ मध्ये उत्कल विद्यापीठातील किशोरकुमार बासा व डेक्कन कॉलेजमधील रबींद्रकुमार महंती यांनी गौरांगपटणा येथे उत्खनन केले. तसेच या उत्खननात कटकच्या रेव्हेन्शा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. येथे चार ठिकाणी केलेल्या उत्खननात सुट्या विटा व जांभ्या दगडाचे काही तुकडे मिळाले असले, तरी कोणत्याही वास्तूचा अथवा बांधकामाचा पुरावा आढळला नाही. मातीची भांडी सर्वसाधारणपणे शिशुपालगड व ताळपाडा या प्रारंभिक ऐतिहासिक स्थळांवरील भांड्यांशी साम्य असणारी होती. मातीच्या भांड्यांमध्ये झाकणांना गुंडीप्रमाणे भाग असलेली भांडी (Knobbed Ware) वैशिष्ट्यपूर्ण असून ती प्रारंभिक ऐतिहासिक काळाची निर्देशक आहेत. मातीच्या भांड्यांवरून गौरांगपटणा येथील पहिली वस्ती इ.स.पू. सहावे ते तिसरे शतक या काळातील होती. वस्तीचा दुसरा कालखंड प्रारंभिक ऐतिहासिक असून गौरांगपटणाच्या बहुतेक सर्व भागांत या काळात वस्ती होती. गौरांगपटणाला काही काळ वस्ती नव्हती. तिसरा व शेवटचा कालखंड मध्ययुगीन असून या स्तरांमध्ये मिळालेली मातीची भांडी माणिकपटणा येथे मिळालेल्या भांड्यांप्रमाणे होती.
प्राण्याच्या अवशेषांमध्ये चिंकारा, काळवीट, चितळ, सांबर, बकरी यांची हाडे, अनेक प्रजातींच्या खाण्यायोग्य मृदुकाय कवची प्राण्याच्या शिंपल्यांचा, दोन प्रजातींच्या खेकड्यांच्या नांग्यांचा, ऑलिव्ह रिडले कासवांच्या पाठींच्या तुकड्यांचा व शार्क माशांच्या हाडांचा समावेश होता. त्यात मेरिट्रिक्स मेरिट्रिक्स (Meretrix meretirix) या प्रजातीचे शिंपले मोठ्या प्रमाणावर होते. तसेच समुद्रात आढळणाऱ्या समुद्री गाय (Dugong dugon) या प्राण्याची हाडे मिळाली. गौरांगपटणाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे फाविया व हेलिओपोरा या दोन प्रवाळ प्रजातींचे तुकडे मिळाले. या प्रवाळ प्रजाती अंदमानजवळच्या समुद्रामध्ये आढळतात. या पुराव्यावरून असे दिसते की, गौरांगपटणा हे केवळ स्थानिक मच्छिमारांचे किनारी गाव नसून त्याचे बंगालच्या उपसागरातील व्यापाराशी संबंध असावेत.
संदर्भ :
- Mohanty. R. K.; Basa, Kishor K.; Pattanayak, Manas Ranjan; Singh, Ranjana Rani; Behera, Kunil Kumar; Joglekar, P. P.; Jena, Prasant Kumar & Smith, Monica L. ‘Excavations at the Early Historic Coastal Site of Gauranga Patana, Chilka Lake, Odishaʼ, History Today, 19: 70-77, 2018.
- Ray, H. P. ‘Maritime Archaeology of the Indian Ocean: An Overviewʼ, Tradition and Archaeology: Early Maritime Contacts in the Indian Ocean ((Ray, H. P. &. Salles, J. F. Eds.), pp. 1-10, New Delhi, 1996.
समीक्षक : शंतनू वैद्य