जमिनीत गाडलेल्या अवस्थेत भारतात केरळमधील पट्टनम व कडक्करपल्ली आणि महाराष्ट्रातील देर्दे अशा एकूण तीन ठिकाणी नौका आढळून आल्या आहेत.
पट्टनम हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील महत्त्वाचे मेरिटाइम पुरातत्त्वीय स्थळ असून तेथे २००७ ते २०१५ या काळात उत्खनन करण्यात आले. पट्टनम येथे इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. १००० या काळातील पुरातत्त्वीय अवशेष मिळाले आहेत. प्रारंभिक ऐतिहासिक काळात भरभराटीला आलेले व साहित्यात उल्लेख असलेले मुझिरिस (Muziris) बंदर म्हणजेच पट्टनम असल्याचे उत्खनन करणाऱ्यांचे मत आहे. या ठिकाणी उत्खननात ६ मी. लांबीची नाव (Canoe) जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आढळली. या नावेची जास्तीत जास्त रुंदी ७२ सेंमी. आहे. ही नाव एकाच ओंडक्यातून कोरून काढलेली असून एका कोपऱ्यात दुरुस्ती केलेली दिसते. लाकडाची सर्वसाधारण जाडी २ सेंमी. असून नावेला सात छिद्रे आहेत. या छिद्रांना स्थानिक भाषेत मणिक्कल (Manikkal) असे नाव आहे. ही बहुधा छप्पर बसवण्यासाठी किंवा दोर बांधण्यासाठी होती. रेडिओकार्बन कालमापनानुसार ही नाव इ.स.पू. ८५० ते २९५ या काळातील आहे. या नावेच्या जवळच मालाची चढउतार करण्यासाठीचा छोटा धक्काही आढळून आला आहे.
कडक्करपल्ली हे केरळमधील कोची शहराच्या दक्षिणेस अलेप्पी जिल्ह्यात थैक्कल गावाजवळ असून सद्यस्थितीत ते समुद्र किनाऱ्यापासून दीड किमी. अंतरावर आहे. गावाचे नाव कडक्करा म्हणजे समुद्र आणि पल्ली म्हणजे गाव असे बनलेले आहे. या ठिकाणी स्थानिक लोकांना भातखाचरात नावेचे अवशेष आढळल्यानंतर २००२-२००३ मध्ये त्रिपुनीथूरा येथील सेंटर फॉर हेरिटेज स्टडीज आणि केरळ सरकारच्या पुरातत्त्व विभागाने उत्खनन केले.
कडक्करपल्ली येथील नाव सु. २१ मी. लांबीची असून तिला दोन शिडे होती. नावेला बळकटी यावी म्हणून बाजू आणि तळ यांना जोडणारे इंग्रजी ‘एलʼ अक्षराच्या आकाराचे १४.५ मी. लांबीचे दोन भाग लावलेले होते. नावेच्या रचनेत लोखंडी व लाकडी खिळ्यांचा वापर केलेला होता. दोन ठिकाणी नावेची दुरुस्ती केल्याचे आढळले. नावेच्या आत दोरखंडाचे अवशेष मिळाले. तसेच त्यात १२८ किग्रॅ. वजनाचा घडीव दगड मिळाला. हा दगड स्थानिक नाही आणि त्याचा नावेवर काय उपयेाग होता, हे समजू शकले नाही. नावेच्या बांधणीसाठी प्रामुख्याने केरळमध्ये मिळणाऱ्या अंजिली (Artocarpus hirsutus) या वृक्षाच्या फळ्यांचा वापर आणि इतर दोन प्रजातींच्या लाकडांचा वापर केला होता. रेडिओकार्बन कालमापनानुसार नावेसाठी वापरलेले लाकूड इ. स. १०७० ते १२७० या काळातील आहे. अंजिली वृक्षाच्या वाढीचा अंदाज घेता या नावेसाठी किमान दोनशे वर्षे जुने झाड वापरले असावे, हे गृहित धरून ही नाव तेराव्या ते पंधराव्या शतकांमधील असावी, असे अनुमान काढण्यात आले आहे.
महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात देर्दे या गावी २००७ मध्ये विहीर खणण्याचे काम चालू असताना अपघाताने एका नौकेचा शोध लागला. हे गाव वशिष्टी नदीच्या मुखापासून ६ किमी. आत आहे व नाव मिळालेली जागा एका नाल्याजवळ आहे. पालथी पडलेली नाव जमिनीपासून १.४ मी. खोलीवर आढळली. नावेची उंची २६० सेंमी. असून डोलकाठीचा भाग खालच्या बाजूला १६० सेंमी. एवढा उघडा करता आला. दहा ते तेरा सेंमी. जाडीच्या अनेक फळ्या टिकून राहिल्या होत्या. फळ्या जोडण्यासाठी लाकडी खुंट्यांचा उपयोग केलेला होता. धातूचे खिळे कुठेही आढळले नाहीत. लाकडाच्या पुरावनस्पतिवैज्ञानिक अभ्यासातून दिसले की, नावेच्या बांधणीमध्ये एकाच जातीच्या झाडाचा वापर करण्यात आला होता व ते लाकूड असणा (Bridelia retusa) या झाडाचे होते. रेडिओकार्बन कालमापनानुसार या नावेसाठी वापरलेले लाकूड इ. स. ७८४ (अधिकउणे १२०) या काळातील आहे. ही नाव एखाद्या मोठ्या वादळात सापडून उलटली असावी, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.
संदर्भ :
- Cherian, P. J. Ed., Pattanam Excavations : Interim Report of the First Season – 2007, KCHR, Thiruvananthapuram, 2015.
- Marathe, Ashok; Shashikala, S. & Vijendra Rao, R. ‘A unique example of a wooden boat of Bridelia retusa in ancient India entrapped in the Holocene sediments at Derde, Ratnagiri Coast, Maharashtraʼ, Current Science, 99 (10): 1453-1456, 2010.
- Nair, M. V.; Selvakumar, V. & Gopi, P. K. ‘Excavation of a unique sailboat at Kadakkarappally, Keralaʼ, Current Science, 86(5): 709-712, 2004.
समीक्षक : सुषमा देव