(हेअर आणि रॅबिट). एक सस्तन प्राणी. सशाचा समावेश स्तनी वर्गाच्या लॅगोमॉर्फा गणातील लेपोरिडी कुलात केला जातो. लॅगोमॉर्फा गणामध्ये लेपोरिडी आणि ओकोटोनिडी ही दोन कुले अस्तित्वात आहेत. लेपोरिडी कुलात अकरा प्रजातींचा समावेश होतो. त्यांपैकी लेपस प्रजातीतील प्राण्यांना हेअर म्हणतात आणि अन्य दहा प्रजातीतील प्राण्यांना रॅबिट म्हणतात. सामान्यपणे हेअर आणि रॅबिट या दोन्ही प्राण्यांना मराठीत ससा म्हटले जाते. हेअर आणि रॅबिट सारखेच दिसतात; मात्र आकारमानाने हेअर रॅबिटपेक्षा मोठे असतात. ओकोटोनिडी हे कुल पिका या सशासारखे दिसणाऱ्या पण सशापेक्षा लहान सस्तन प्राण्यांचे कुल आहे.
हेअर
आफ्रिका, आशिया आणि अमेरिका या खंडांतील देशांत हेअर आढळतात. हेअरचे कान लांब असतात आणि त्यांच्या फरवर काळ्या खुणा असतात. हेअरमध्ये ४८ गुणसूत्रे असतात. हेअर एकेकटे किंवा जोडीने वावरतात. ते बिळ करून न राहता, जमिनीवर खोलगट जागी किंवा गवतामुळे तयार झालेल्या दुबळक्यात राहतात. पिले जन्मत:च अंगावर केस (फर) असलेली असून त्यांचे डोळे उघडे असतात. ते पूर्वपक्व असतात आणि जन्मानंतर लगेच हिंडूफिरू शकतात. हेअर माणसाळत नाहीत.
हेअरच्या एकूण ३२ जाती असून भारतात त्यांची लेपस निग्रिकोलीस (इंडियन हेअर) या शास्त्रीय नावाची जाती मोठ्या प्रमाणावर आढळते. याशिवाय त्यांची केप, अरेबियन अथवा डेझर्ट हेअर (लेपस कॅपेन्सिस) ही जातीही आढळते. पुढील वर्णन ले. निग्रिकोलीस जातीचे आहे.
इंडियन हेअर याच्या शरीराची लांबी ४०–७० सेंमी. आणि वजन १.३५–७ किग्रॅ. असते. त्याला काळमान्या म्हणतात, कारण त्याच्या मानेच्या मागच्या भागावर काळा पट्टा असतो. शेपटीच्या वरचा भाग काळा असतो. पाठ तसेच चेहरा फिकट तपकिरी रंगाचे असून शरीरावर अधूनमधून काळे केस विखुरलेले असतात. शरीराचे खालचे भाग पांढरे असतात. मादी नरापेक्षा मोठी असते. भारताच्या वेगवेगळ्या भागात ले. निग्रिकोलीसच्या सात उपजाती आढळतात. स्थानिक भाषेत त्यांना वेगवेगळी नावे आहेत. खारफुटी आणि उंच तृणभूमी असलेला अधिवास वगळता, वेगवेगळ्या प्रकारच्या वनांमध्ये हेअर दिसून येतात. खुरटी तृणभूमी, ओसाड शेती, गावालगतच्या जागा, लागवड केलेली शेते आणि वनांतील पायवाटांच्या लगत ते राहतात. दिवसा ते गवतात जागा करून पडून राहतात आणि रात्री अन्नासाठी बाहेर पडतात. ते शाकाहारी असून गवत, पालापाचोळा, कोवळे अंकूर खातात. ते गावालगतच्या, लागवडीच्या भागात राहतात आणि बऱ्याचदा पिकांची नासाडी करतात. ते भित्रे असल्याने सतत सावधगिरी बाळगतात, थोडे अंतर पळतात आणि थांबून कानोसा घेऊन पुढे जातात. सर्व मांसाहारी प्राणी त्यांचे भक्षक असून कोल्हा, तरस, रानकुत्रे, काही वेळा वाघ त्याची शिकार करतात. भक्षकापासून सुटका करण्यासाठी ते कोणत्याही बिळात घुसतात.
हेअरचा प्रजननकाळ वर्षभर असला, तरी पावसाळ्यात ते प्रजननासाठी अधिक सक्रिय असतात. गर्भावधी ४१ ते ४७ दिवसांचा असतो. एकावेळी एक ते सात पिले होतात.
रॅबिट
रॅबिटच्या एकूण १२ बारा प्रजाती आणि ३० जाती आहेत. त्यांमध्ये ओरिक्टोलॅगस (यूरोपियन रॅबिट) आणि सिल्व्हिलॅगस (कॉटनटेल रॅबिट) या प्रजाती महत्त्वाच्या आहेत. यूरोपियन रॅबिट या जातीपासून सु. ३०५ संकर तयार झालेले असून त्यांचा प्रसार अंटार्क्टिका वगळता सर्वत्र झालेला आहे. रॅबिटमध्ये ४४ गुणसूत्रे असतात. रॅबिट गटाने वावरतात आणि बिळे करून राहतात. त्यांची बिळे एकमेकांना जोडलेली असतात आणि बिळांची एक वसाहतच असते. त्यांच्या पिलांच्या अंगावर जन्मत: केस नसतात आणि डोळे मिटलेले असतात. काही दिवसांच्या वाढीनंतर त्यांचे डोळे उघडतात व अंगावर केस येतात. रॅबिट माणसाळले जातात.
यूरोपियन रॅबिटच्या शरीराची सरासरी लांबी सु. ४० सेंमी. असते आणि वजन १.२–२.० किग्रॅ. असते. शरीरावरची फर राखाडी–करडी असते; मिशा लांब व काळ्या असतात. पायांवर पूर्ण फर असते. वर्षातून एकदा केस गळतात आणि पुन्हा येतात. सशांच्या कानांची रचना विशिष्ट असून शरीराचे तापमान कायम राखण्याचे ते कार्य करतात, तसेच दूरून भक्षकाचा अंदाज घेतात. यूरोपियन रॅबिटच्या रंगात विविधता आढळते; त्यांच्या शरीरावरील फरचा रंग फिकट वाळूमय, गडद राखाडी ते गडद काळा असतो.
वेग आणि चपळता ही भक्षकापासून संरक्षण मिळविण्याची सशाची अस्त्रे आहेत. याकरिता त्यांचे मागचे पाय आणि स्नायू अनुकूलित झालेले असतात. पुढच्या पायांना चार बोटे आणि एक उपखूर असते, तर मागच्या पायाला चार बोटे असतात; चालताना किंवा पळताना ते बोटांवर चालतात. बीळ खणण्यासाठी आणि रक्षण करण्यासाठी ते मजबूत नख्यांचा वापर करतात.
यूरोपियन रॅबिट शांत आणि भित्रे असतात. ते मुख्यत: निशाचर आहेत. ते २–१० च्या गटाने राहतात. विष्ठेने ते अधिवासाच्या सीमा निश्चित करतात. झोपताना त्यांचे डोळे उघडे असतात. त्यामुळे झोपेत त्यांच्यावर हल्ला झाला किंवा थोडेसे खुट्ट झाले, तरी रक्षणासाठी तत्काळ हालचाल करू शकतात. चार-पाच महिन्यांत नर व मादी प्रजननक्षम होतात. जानेवारी व ऑगस्ट हा त्यांचा प्रजननकाळ असतो. मादीचा गर्भावधी ३० दिवसांचा असतो. मादी पिलांना जन्म देण्याआधी जमिनीत लहानसे बीळ तयार करते, त्यात पालापाचोळा व स्वत:ची लोकर टाकून घरटे तयार करते. एका वेताला ती ५–८ पिलांना जन्म देते.
कॉटनटेल रॅबिट फक्त अमेरिकेत आढळतात. त्यांच्या सु. २० जाती आहेत. ते सर्वसामान्य वन्य रॅबिट आहेत. ते आकारमानाने यूरोपियन रॅबिटएवढेच असतात आणि त्यांच्यासारखेच दिसतात. शेपटी खुंटासारखी असून शरीराची खालची बाजू पांढरी असते. ते बिळात राहतात व अन्नाच्या शोधासाठी मोकळ्या जागेत जातात. मादी प्रत्येक वेळेला ३ पिलांना जन्म देते. खेळ व खाद्य यांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचा आयु:काल दोन वर्षे असतो. कॉटनटेल रॅबिट हे मांसभक्षी प्राण्यांचे अन्न आहे. मानवाकडूनही त्यांची शिकार केली जाते.
रेडरॉक हेअर नावाने ओळखल्या जाणाऱ्या चार जाती त्यांच्या नावात हेअर असल्या तरी रॅबिट आहेत. या चार जाती प्रोनोलॅगस प्रजातीत येतात. तसेच आसाम किंवा हिस्पिड नावाने ओळखले जाणारे रॅबिट हे कॅप्रोलॅगस या वेगळ्या प्रजातीतील आहेत. आसाम रॅबिट हे भारत आणि इतर दक्षिण आशियाई देशांत आढळतात. त्यांचे कान खूप आखूड असून पाठीवरची फर गडद तपकिरी असते.
प्राचीन काळी ससा हा दिखाऊ आणि शोभेचा प्राणी समजला जात असे. आधुनिक काळात अन्न, वस्त्र आणि संशोधन यांसाठी आणि पाळीव प्राणी म्हणून ससे वापरले जातात. सशांच्या मांसात प्रथिनांचे प्रमाण सु. २०% असून ते पचायला हलके असते. अनेक पाश्चिमात्य देशांत मांस व लोकर देणाऱ्या सशांच्या अनेक जातीचे प्रजनन घडवून आणले जाते, त्यांचे संवर्धन केले जाते. भारतात लोकरीसाठी आणि संशोधनासाठी ससे पाळले जातात. सशापासून लोकर, मांस, कातडी, खत इ. पदार्थ मिळतात. सशांच्या कातडीचा वापर हातमोजे, पर्सेस, खेळणी, कातडी पिशव्या यांसाठी केला जातो. सशांचे लेंडीखत घोड्याच्या, गाईच्या शेणापेक्षा अधिक उपयुक्त असल्याने जमिनीचा कस वाढण्यासाठी ते वापरतात.