(मेडिकल वेस्ट). जैविक तसेच वैद्यकीय स्रोत आणि कृती यांतून उत्पन्न झालेल्या अपशिष्टांना ‘वैद्यकीय अपशिष्ट’ म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था उदा., दवाखाने, सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालये, रक्तपेढ्या, दातांचे दवाखाने, वैद्यकीय संशोधन संस्था, जनावरांचे दवाखाने इ. ठिकाणी उत्पन्न झालेली अपशिष्टे ‘वैद्यकीय अपशिष्टे’ या प्रकारात मोडतात. यात वापरलेल्या अंत:क्षेपकाच्या (इंजेक्शन) सुया, अंत:क्षेपण नलिका (सिरींजे) व रक्तस्राव बंध (बँडेज), रोगनिदानासाठी वापरलेले रक्त व लघवी यांचे नमुने, शरीरातील अवयव, रासायनिक पदार्थ, औषधे, वैद्यकीय उपकरणे, किरणोत्सारी पदार्थ इत्यादींचा समावेश होतो. भारत शासनाच्या अधिनियमाप्रमाणे रोगनिदान करताना, मनुष्य व जनावरे यांच्यावर उपचार करताना किंवा लसीकरण करताना उत्पन्न झालेली अपशिष्टे, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन कार्यात उत्पन्न झालेली अपशिष्टे इत्यादींचा समावेश ‘जैववैद्यकीय अपशिष्ट’ या श्रेणीत केला जातो. उत्पन्न झालेल्या वैद्यकीय अपशिष्टांपैकी सु. ८५ टक्के पदार्थ धोकादायक नसल्याने ती सामान्य अपशिष्ट श्रेणीत मोडतात. परंतु उरलेली १५ टक्के वैद्यकीय अपशिष्टे ही धोकादायक श्रेणीत मोडतात आणि त्यांमध्ये संसर्गजन्य, विषारी व किरणोत्सारी पदार्थ असू शकतात.

वैद्यकीय अपशिष्टाची वर्गवारी : वैद्यकीय अपशिष्ट पदार्थांची पुढीलप्रमाणे वर्गवारी केली जाते :

(१) अ वर्ग : यात दूषित किंवा धोकादायक नसलेली सामान्य वैद्यकीय अपशिष्टे येतात. कार्यालयातील कागद, वेष्टनासाठी वापरलेल्या पदार्थांचा कचरा, दूषित नसलेले किंवा वेष्टनासाठी वापरलेले पदार्थ, पुनश्चक्रण करण्याजोगे पत्र्याचे डबे, काचेच्या बाटल्या, जैवविघटन होऊ शकेल असा कचरा इत्यादी.

(२) ब वर्ग : यात पुढील अपशिष्ट पदार्थांचा समावेश होतो आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी खास प्रक्रिया कराव्या लागतात. (अ) मानवी शारीरीय अपशिष्टे – दूषित किंवा संक्रामक नसलेले मानवी शरीरातील ऊती, रक्ताच्या पिशव्या, अवयव इत्यादी; (आ) अणकुचीदार अपशिष्टे – अंत:क्षेपकाच्या वापरलेल्या सुया, फुटलेल्या काचेच्या बाटल्या, अणकुचीदार पदार्थ इत्यादी; (इ) औषधांची अपशिष्टे – विविध प्रकारची अर्धवट वापरलेली किंवा मुदतसमाप्ती झालेली औषधे; (ई) पेशीबाधक (सायटोटॉक्सिक) अपशिष्टे – कर्करोधी औषधांचे उत्पादन करताना किंवा त्यांचा रुग्णांसाठी वापर करतांना तयार झालेली अपशिष्टे; (उ) रक्त व इतर शारीरीय द्रव (स्राव) – रक्त व इतर शारीरीय द्रवांनी दूषित झालेले व जे रोगकारक असण्याची शक्यता असते, असे सर्व पदार्थ.

(३) क वर्ग : यात संसर्गजन्य आणि अतिसंसर्गजन्य अपशिष्टांचा समावेश होतो. संसर्गजन्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी असलेले रुग्णालयातील अतिविशेष कक्ष, अपोहन (डायलेसिस) कक्ष, हेपॅटायटिस रुग्णांचे कक्ष इत्यादी ठिकाणी अशी संसर्गजन्य अपशिष्टे उत्पन्न होतात. तसेच संशोधन प्रयोगशाळेतील क्षय रुग्णांच्या थुंकीचे संवर्ध, दूषित सूक्ष्मजीवांचे संवर्ध व प्रयोगासाठी वापरलेल्या प्राण्यांचे अवशेष आदींचा समावेश या वर्गात होतो.

(४) ड वर्ग : यात जड व विषारी धातूची मात्रा अधिक प्रमाणात असलेले वायू, द्रव व स्थायू अवस्थेतील घातक रसायने मोडतात.

(५) इ वर्ग : यात वायू, द्रव व स्थायू अवस्थेतील किरणोत्सारी पदार्थांनी दूषित केलेले पदार्थ व जनुकांना विष ठरू शकणारे पदार्थ यांचा समावेश होतो. तसेच चिकित्सेसाठी अथवा रोगनिदान करताना वापरलेल्या किरणोत्सारी समस्थानिकांचा समावेश होतो. उदा., कोबाल्ट-६० (60Co), टेक्नेशियम-९९m (99mTc), आयोडीन-१३१ (131I), इरिडियम-१९२ (192Ir) इत्यादी.

वैद्यकीय अपशिष्टांचे संग्रहण : वैद्यकीय अपशिष्टे गोळा करताना अपशिष्टे एकमेकांत मिसळू नयेत, तसेच त्यांवर प्रक्रिया करणे सुलभ व्हावे याकरिता वेगवेगळ्या रंगांच्या पिशव्यांचा वापर केला जातो. भारतात पुढील प्रकारे अपशिष्टे जमा केली जातात –

(१) लाल रंगांच्या पिशव्यांमध्ये सुया वेगळ्या केलेल्या अंत:क्षेपण नलिका, खराब झालेले हातमोजे, सुषिरी (कॅथेटर) इ. जमा करतात. (२) पिवळ्या रंगांच्या पिशव्यांमध्ये सर्व प्रकारचे रक्तस्राव बंध (बँडेज), स्रावयुक्त दूषित कापसाचे बोळे, रक्ताच्या पिशव्या, मानवी अवयवांचे अपशिष्टे इत्यादी जमा करतात. (३) पांढऱ्या रंगांच्या अर्धपारदर्शी व छिद्ररोधी पिशव्यांमध्ये सुया तसेच अणकुचीदार अपशिष्टे जमा करतात. (४) काळ्या रंगांच्या पिशव्यांमध्ये जैववैद्यकीय नसलेले सामान्य वैद्यकीय अपशिष्टे जमा करतात. (५) काचेच्या बाटल्या, काचेच्या इतर वस्तूंची अपशिष्टे पुठ्ठ्याच्या खोक्यात जमा करून त्यावर निळ्या रंगाची चिकटपट्टी लावतात.

वैद्यकीय अपशिष्टांचा निपटारा : वैद्यकीय अपशिष्टांपैकी १०–२५ टक्के अपशिष्टे आरोग्याला घातक असतात. सर्व वैद्यकीय कचरा नीट वेगळा केल्यास, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणि नंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी येणाऱ्या खर्चात मोठी बचत होऊ शकते.

(१) अ वर्ग – ही घातक नसलेले वैद्यकीय अपशिष्टे असून यांची विल्हेवाट सामान्य कचऱ्याप्रमाणे लावली जाते.

(२) ब वर्ग – १. मानवी शरीराचे अवयव किंवा त्यांचे भाग यांनी दूषित असलेले अपशिष्टे विशेष प्रकारच्या संयंत्रात जाळून नष्ट करतात. २. अणकुचीदार पदार्थ उदा., अंत:क्षेपकाच्या सुया व अंत:क्षेपण नलिका वेगवेगळ्या सुरक्षित खोक्यात जमा करतात आणि नंतर इतर घातक अपशिष्टांबरोबर त्यांचा निपटारा करतात. ३. निरुपयोगी व मुदतसमाप्ती झालेल्या औषधांवर रासायनिक प्रक्रिया करून ती निष्क्रिय करतात. एका पात्रात सिमेंट व चुन्याच्या मिश्रणाबरोबर औषधांची अपशिष्टे मिसळतात आणि जमिनीत खोलवर गाडतात. त्यामुळे विषारी पदार्थ जमिनीवर येण्याची किंवा पाण्यासोबत मिसळण्याची शक्यता कमी असते. ४. पेशीबाधक (सायटोटॉक्सिक) औषधांची अपशिष्टे इतर औषधांच्या अपशिष्टापासून वेगळे करण्याची आवश्यकता असते. अशा प्रकारची औषधे तयार करतांना, हाताळतांना व त्यांची विल्हेवाट लावतांना स्वास्थ्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची नितांत गरज असते. ५. रक्त व शारीरीय द्रव पदार्थांनी (स्राव) दूषित अपशिष्टे जमा करण्यासाठी दुहेरी पिशव्या किंवा पात्रे वापरतात. यांची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रकारच्या भट्टीत ती जाळतात किंवा जमिनीत गाडतात.

(३) क वर्ग – संसर्गजन्य तसेच अतिसंसर्गजन्य अपशिष्टांमध्ये रोगकारके असल्याने प्रथम ती निर्जंतुक करतात. यासाठी ऑटोक्लेव्हचा (प्रबाष्पपात्र) उपयोग करतात, किंवा २ टक्के सोडियम हायपोक्लोराइट असलेल्या द्रावणात रात्रभर बुडवून ठेवतात व नंतर पिवळ्या रंगांच्या पिशव्यांमध्ये बंद करून त्यांचा निपटारा करतात.

(४) ड वर्ग – यात जड व विषारी धातूची मात्रा अधिक प्रमाणात असलेल्या रसायनांच्या अपशिष्टांवर विशेष प्रकारच्या पुनश्चक्रण संयंत्रात प्रक्रिया करतात.

(५) इ वर्ग – कोबाल्ट – ६० (60Co) चा (अर्धआयुष्यकाल ५.२६ वर्षे) अपवाद वगळता, इतर किरणोत्सारी समस्थानिकांचे अर्धआयुष्य खूप कमी असते, उदा., टेक्नेशियम – ९९ m (99mTc) – ६ तास, आयोडीन-१३१ (131I) – ८ दिवस आणि एरिडियम – १९२ (192Ir) – ७४ दिवस. यामुळे अशा प्रकारच्या अपशिष्टांचे द्रावण काही विशिष्ट काळासाठी साठवून ठेवल्यास त्यातील किरणोत्सारी समस्थानिकांचा क्षय होऊन त्यांचे प्रमाण सामान्य स्तरावर येते. या अपशिष्टांची द्रावणे असलेल्या डब्यावर किरणोत्सारी लेबल लावून त्यावर आतील समस्थानिकांची मात्रा दिनांकासह नोंदली जाते.

मार्च २०१८ च्या अहवालानुसार भारतात दररोज सु. ५५० टन अपशिष्ट निर्माण होते. २०२२ पर्यंत हा आकडा सु. ७७० टन एवढा होण्याची शक्यता आहे. अशा रीतीने चक्रवाढ गतीने वार्षिक ७ टक्के या वेगाने भारतातील अपशिष्टे वाढत आहेत. रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण सातत्याने येत असतात. या रुग्णांना संसर्ग असतोच, त्यात रुग्णालयातील जैववैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने न झाल्यास त्यापासूनही संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच जैववैद्यकीय अपशिष्टांचे व्यवस्थापन नीट होण्यासाठी विशेष अभ्यासक्रम आखून प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.