कांबळे, बेबीताई : (१९२९ – २१ एप्रिल २०१२). दलित चळवळीतील एक लढाऊ कार्यकर्ती, समाजसेविका आणि लेखिका. जिणं आमुचं  हे बेबीताई यांनी लिहलेले मराठी साहित्यातील दलित स्त्रीचे पहिले आत्मचरित्र होय. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुरंदर तालुक्यातील वीरगाव या त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे माहेरातील नाव बेबीताई पंढरीनाथ कांबळे असे होते. त्यांचे वडील ठेकेदार होते. त्यांचा स्वभाव अतिशय परोपकारी होता. बेबीताई यांच्यावर वडिलांचा प्रभाव होता. बेबीताई यांचे आजोबा ब्रिटीश अधिकाऱ्याकडे बटलर (स्वयंपाक घरातील प्रमुख सेवक) म्हणून काम करत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने त्याकाळात दलित समाजात शिक्षणाचे वारे वाहू लागले होते. वयाच्या आठव्या वर्षी बेबीताई वीरगावहून फलटणला शिक्षणासाठी आल्या. चौथीपर्यंतचे शिक्षण बाहुलीच्या शाळेत झाल्यावर त्यांनी मुधोजी विद्यालयातून पुढील शालेय शिक्षण घेतले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कोंडीबा कांबळे यांच्याशी झाला. उदरनिर्वाहासाठी त्यांनी किराणा मालाचे दुकान सुरु केले होते.

जिणं आमुचं  हे बेबीताई कांबळे यांचे आत्मचरित्र असले तरी खऱ्या अर्थाने पन्नास वर्षापूर्वीच्या पश्चिम महाराष्ट्रातील एका खेडेगावातील महार समाजाचे चित्रण हा या पुस्तकाचा गाभा आहे. या पुस्तकातील लेखन आधी स्त्री  या मासिकात संपादक विद्या बाळ यांनी मालिका स्वरुपात प्रकाशित केले होते. १९८६ मध्ये पुस्तकरूपात त्याचे प्रकाशन करण्यात आले. हे आत्मचरित्र केवळ बेबीताई यांचे आत्मचरित्र नसून ते तत्कालीन महार समाजाचे सामूहिक आत्मकथन आहे. बेबीताई यामध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा समाजातील दुःख, दारिद्र, प्रथा, परंपरा, परिवर्तन याविषयी बोलताना दिसतात म्हणूनच या आत्मचरित्रास एक सामूहिक स्वर प्राप्त झाला आहे. समाजाचे डोळस आणि अनुभूतीपूर्वक निरीक्षण त्यांना करता आले. त्याआधारे त्यांनी स्वतः जे जगले, भोगले आणि अनुभवले तेच त्यांनी ह्या पुस्तकात लिहिल्यामुळे त्यांचे हे लेखन समाजशास्त्र, इतिहास आणि स्त्रीवाद या विद्याशाखांच्या अभ्यासकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. बारा बलुतेदारांपैकी एक महत्वाचा बलुतेदार असणारा महार समाज गावगाड्यामध्ये किती शोषित होता याचे वास्तव चित्रण हा या आत्मकथनाचा केंद्रबिंदू आहे. येस्करीच्या (वेस म्हणजे सीमा. सीमेचं रक्षण करणारे वेसकरी. त्याचा अपभ्रंश उच्चार येसकरी) शिळ्या भाकरीवर, प्रसंगी रानभाज्या आणि निवडुंगाच्या बोंडांवर आपली भुकेची आग विझवणारा हा समाज इथल्या जातीव्यवस्थेने पिढ्यानपिढ्या कसा दैवभोळा आणि अज्ञानी ठेवला होता हे लेखिकेने अगदी निर्भीडपणे मांडले आहे. आषाढ महिन्यातील दलित समाजातील सांस्कृतिक, धार्मिक परंपरा, घरातील देव्हारे व देवदेवता, पहिल्या अपत्याला देवाला सोडण्याची पोतराज परंपरा, महिलांच्या अंगात येण्याचे प्रकार, गावची जत्रा, त्यात रेड्याचा बळी देण्याचा प्रकार, आजारांवर केले जाणारे अंगारे धुपारे अशा अनेक प्रकारचे वर्णन समाजशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्याचं हे आत्मचरित्र जातीव्यवस्था, पितृसत्ता, कौटुंबिक हिंसाचार, लिंगभाव या संबंधीचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज ठरतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची समाज परिवर्तनाची चळवळ दलित समाजासाठी किती क्रांतिकारी बदल घडवून आणणारी होती याचे विवेचन या आत्मकथनाचा आधार बिंदू आहे. जिणं आमुचं  या आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद प्रिझन्स वुई ब्रोक (२००८) या शीर्षकाने माया पंडित यांनी केला आहे.

जिणं आमुचं  या आत्मचरित्राशिवाय बेबीताई यांचा मन बोलतं  हा कवितासंग्रहही प्रकाशित झालेला आहे. त्यांनी इतर स्फुटलेखनही केले आहे. त्यांनी आयुष्यभर आंबेडकरी चळवळीत कार्य केले. दलित समाजातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी निबुरे येथे आश्रमशाळा सुरू केली. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. फलटण येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • कांबळे, बेबीताई, जिणं आमुचं, मानसन्मान पब्लिशिंग हाऊस, पुणे १९८६.
  • Rege,Sharmila, Writing Caste/Writting Gender : Narretting Dalit Women’s Testimonies, Zubaan, New Delhi, 2013.