ट्युआटारा हा सरीसृपवर्गातील प्राणी असून ऱ्हिंकोसिफॅलिया (Rhyncocephalia) गणातील एकमेव जीवित प्राणी आहे. उत्क्रांतीच्या अतिशय मंद गतीमुळे ऱ्हिंकोसिफॅलिया हा गण सु. २० कोटी वर्षांत न बदलता आजही केवळ ट्युआटारांच्या स्वरूपात  अस्तित्वात आहे.

ट्युआटारा (स्फेनोडॉन पंक्टेटस)

ट्युआटाराचे पूर्वज २५ कोटी वर्षांपूर्वी नामशेष झालेले आहेत. पूर्वी न्यूझीलंडमध्ये ट्युआटारांची संख्या अधिक होती. मात्र सध्या फक्त न्यूझीलंडजवळ असलेल्या काही बेटांवर याच्या स्फेनोडॉन पंक्टेटस  (Sphenodon punctatus) आणि स्फेनोडॉन गुंथेरी (Sphenodon guntheri) या अवघ्या दोन प्रजाती स्वत:चे आस्तित्व टिकवून आहेत. सरीसृप वर्गातील डायाप्सिड (Diapsid) या अधिगणामध्ये ट्युआटाराचा समावेश होतो. हा गट उल्बधारी (Amniotes) चतुष्पाद प्राण्यांचा गटआहे.

ट्युआटारा हा आता फक्त न्यूझीलंड येथे आढळतो. त्यामुळे तो प्रदेशनिष्ठ प्राणी आहे. मूळ भूमीपासून अनेक लक्ष वर्षे दूर असून देखील या प्राण्यांची प्राचीन वैशिष्ट्ये टिकून राहिली आहेत. अशा प्राण्यांना प्रदेशनिष्ठ प्राणी म्हणतात. ट्युआटारा ह्या नावाचा माओरी भाषेतील अर्थ ‘पाठीवर काटेरी भाग असलेला’ असा होतो.

साधारण १८० दशलक्ष वर्षांपूर्वी ट्रायासिक कालखंडात ट्युआटाराची उत्पत्ती झाली. सध्याच्या कालखंडात ट्युआटारा ही एकमेव प्रजाती अस्तित्वात आहे. ट्युआटाराची प्राचीन वैशिष्ट्ये टिकून असल्याने या सरीसृप सजीवास ‘जिवंत जीवाश्म’ असेही म्हणतात. आताच्या कालखंडातील जवळचे असे त्याचे पूर्वज म्हणजे शल्कधारी सरडे व सर्प हे होत.

ट्युआटारा (स्फेनोडॉन पंक्टेटस)

ट्युआटाराचा रंग हिरवट तपकिरी किंवा राखाडी असून वयानुसार त्यांच्या रंगात बदल होत जातो. ट्युआटारा हे वर्षातून एकदा कात टाकतात. पूर्ण वाढ होईपर्यंत दोन ते तीन वेळा कात टाकली जाते. त्यांची डोक्यापासून शेपटीच्या टोकापर्यंतची लांबी सुमारे ८० सेंमी. एवढी असून वजन साधारण १.३ किग्रॅ. असते. पाठीच्या कण्याच्या ठिकाणी त्वचेवर नरम त्रिकोणी शूलशिखा असतात. नरांमध्ये शूलशिखा जास्त ठळक असतात. मादीला आकर्षित करण्यासाठी हे शूल उभे केले जातात. नर हा मादीपेक्षा आकाराने मोठा असतो. त्याचे पोट मादीपेक्षा अरुंद असते. त्याच्या वरील जबड्यातील दातांच्या दोन रांगाखालील जबड्याच्या दातांच्या रांगेवर चपखल बसतात. त्यांचा खालचा जबडा वरच्या जबड्यापेक्षा लहान असतो. ट्युआटाराचे डोळे स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करू शकतात. प्रकाश पटलावर प्रकाशग्राही शंकू पेशी असतात. शंकू पेशीमुळे रात्री अंधुक प्रकाशात स्पष्ट दिसते. त्यांच्या डोळ्यांच्या आतील बाजूस परावर्तकासारखा चकास स्तर असतो. यामुळे कमी प्रकाशात प्रकाश परावर्तन होऊन समोरील दृश्य स्पष्ट होते. रंगज्ञानासाठी आवश्यक असणाऱ्या पाच ऑप्सिन जनुकांमुळे या प्राण्यांना चांगले रंगज्ञान असते. दोन पापण्यांशिवाय तिसरी पापणी म्हणजे निमेषक पटल असते. असे पटल बहुतेक सर्व पक्ष्यांमध्ये असते.

ट्युआटाराचा असाधारण गुण म्हणजे त्याचा तिसरा डोळा (Parietal eye). या तिसऱ्या डोळ्यास पार्श्विक नेत्र असेही म्हणतात. तिसऱ्या डोळयाचे स्वतंत्र पारपटल असते. या डोळ्याच्या दृष्टिपटलावर दंड पेशी असतात. तिसरा डोळा मात्र पिलांमध्येच कार्यक्षम असतो. कवटीच्यावर मध्यभागी अर्धपारदर्शक पडदा असतो. प्रौढ ट्युआटारामध्ये पारदर्शक भाग ४ ते ६ महिन्यांत शल्क व रंगद्रव्याने भरतो. या डोळ्याचा उपयोग अनिश्चित आहे. अतिनील किरण शोषून ड जीवनसत्त्व तयार करण्याचे त्याचे कार्य असावे असा अंदाज आहे. हा डोळा जैविक लयबद्धतेशी संबंधित असावा, असेही मानले जाते.

ट्युआटारा : तिसरा डोळा

आता जीवित असलेल्या ट्युआटारामध्ये तिसरा डोळा ठळकपणे दिसतो. याची ऐकण्याची क्षमता प्रगत नाही. याला १०० ते ८०० हर्ट्झ एवढ्या कंप्रतेचा ध्वनी ऐकू येतो. कानामध्ये सैलसर मेद पेशी असतात. मध्यकर्णातील रिकिबीची अस्थी ही चतुरस्र अस्थी कण्डिका (Hyoid) व पट्टक अस्थी यांबरोबर जोडलेली असते.

ट्युआटारा जमिनीत बीळ करून त्यात राहतो. दिवसा हा आपल्या बिळात झोपून राहतो व रात्री भक्ष्य मिळविण्याकरिता बाहेर पडतो. ट्युआटारा निशाचर असले तरी उन्हामध्ये राहणे त्यांना आवडते. याची पिले मात्र दिनचर असतात. पिले बहुधा लाकड्याच्या ओंडक्याखाली, दगडाखाली सुरक्षित लपून राहतात. ट्युआटारा कमी तापमानास कार्यक्षम असतात. त्याच्या शरीराचे तापमान सामान्यत: १८– १९ से. असते. जेव्हा त्याच्या शरीराचे तापमान १३– १४ से. पर्यंत कमी होते तेव्हा देखील ते सक्रिय राहू शकतात. ते हिवाळ्यात शीतकाल समाधी घेतात. त्याच्या शरीराचे तापमान परिसराप्रमाणे बदलते. अशा सजीवांना बाह्यतापी (Poikilothermic) म्हणतात. कमी तापमानामुळे चयापचय क्रिया खूप संथगतीने चालते.

ट्युआटारा प्रामुख्याने भुंगे, रातकिडा, कोळी यांची शिकार करतात. तसेच ते बेडूक, सरडे, पक्ष्यांची अंडी व पिले देखील खातात. ट्युआटारा आपले क्षेत्र रक्षण करतात आणि कोणी अगंतुक घुसल्यास त्यास चावा घेतात. एकदा चावा घेतला की, प्रतिद्वंद्यास सोडले जात नाही. चावा एवढा घट्ट असतो की, चावा घेतल्या ठिकाणी जखम होते. ट्युआटाराचा जीव धोक्यात सापडला तर शेपटीचे टोक तुटून पडते; या प्रकारास स्वविच्छेदन असे म्हणतात.

ट्युआटाराच्या पुनरुत्पादनाचा वेग संथ आहे. वयाच्या १० ते २० वर्षे यांदरम्यान ते जननक्षम होतात. मादी चार वर्षांतून एकदा अंडी घालते. उन्हाळ्याच्या मध्यात समागम होते. प्रणय काळात नराच्या कातडीचा रंग बदलतो. नराच्या पाठीवरील शूल उंचावतात. नराला शिश्न नसते. त्याऐवजी अंत:क्षेपित अंग असते. नराच्या अवस्करावाटे शुक्राणू मादीच्या अवसकरामध्ये सोडले जातात. अंडे तयार झाल्यावर त्यात बलक तयार होण्यास १ ते ३ वर्षे लागतात. मादी ८-१५ अंडी घालते. अंड्याचे कवच सात महिन्यांत तयार होते. त्याचे कवच मऊ, ०.२ मिमी. जाडीचे, चर्मपत्रासारखे असून तंतुमय स्तराच्या आधारकामध्ये कॅल्साइट स्फटिक असतात. फलनानंतर अंड्यातून पिलू बाहेर येण्यास १२ ते १५ महिने लागतात. वयाच्या ३५ ते ४० वर्षांपर्यंत ट्युआटारा प्रौढ होतो. तो ६० वर्षे जगल्याची नोंद आहे.

न्यूझीलंडच्या उत्तर व दक्षिण बेटांवर खूप मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असलेले ट्युआटारा तेथे यूरोपियन वसाहती येण्याआधीच नामशेष झाले. आता तेथे त्यांचे जीवाश्म आढळतात. सध्या सस्तन प्राणी नसलेल्या तेथील सुमारे ३२ बेटांवर त्यांचे अस्तित्व दिसून आले आहे.

नैसर्गिक अधिवास नष्ट होणे व पॉलिनेशियन जमातींबरोबर जहाजातून आलेल्या उंदरांमुळे (Rattus exulans) न्यूझीलंडमधील ट्युआटाराची संख्या धोक्यात आली. स्फे. पंक्टेटस  या जातीला १८९५ पासून कायद्याने संरक्षण मिळाले आहे. ट्युआटारा हे न्यूझीलंडच्या मुख्य भूमीवरून नामशेष झाले होते. २००५ मध्ये न्यूझीलंडच्या उत्तर बेटावर करोरी वन्यजीव अभयारण्यात (ज्यास आता झीलँडिया असे नाव आहे) ट्युआटाराच्या एका प्रजातीस संरक्षण दिले गेले. नंतर २००८ साली त्या अभयारण्याच्या देखभालीचे काम करत असताना पिलांसकट त्याचे घरटे मिळाले. त्यावेळी त्या बेटावर ट्युआटारा जीवित असल्याचे उजेडात आले. ट्युआटाराचे जनुकीय क्रमानिर्धारण (Gene sequencing) करताना संशोधकांना असे लक्षात आले की, डीएनएमध्ये जवळ जवळ ५ ते ६ अब्ज बेस (Base) जोड्या आहेत व ही संख्या मानवामध्ये असलेल्या डीएनए आधारक जोड्यांच्या दुप्पट आहे. प्राचीनत्व, अल्पविकसितता आणि काही लुप्त सरीसृपांशी असलेले साम्य यांमुळे ट्युआटाराला प्राणिविज्ञानात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पहा : सरडगुहिरा, सरडा, स्वविच्छेदन.

संदर्भ :

  • https://www.britannica.com/animal/Sphenodon-punctatus
  • https://animaldiversity.org/accounts/Sphenodon_punctatus/
  • https://www.southlandmuseum.co.nz/tuatara.html
  • https://genomics.senescence.info/species/entry.php?species=Sphenodon_punctatus
  • https://en.wikipedia.org/wiki/Tuatara

समीक्षक : किशोर कुलकर्णी