पृष्ठवंश असणाऱ्‍या प्राण्यांना पृष्ठवंशी म्हणतात. पृष्ठवंश मणक्यांनी बनलेला असून पाठीच्या बाजूला असतो. म्हणून त्याला पाठीचा कणा असेही म्हणतात. प्राणिसृष्टीच्या रज्जुमान संघाचा तो एक उपसंघ आहे. या उपसंघातील प्राण्यांच्या पृष्ठरज्जूचे रूपांतर पृष्ठवंशात झालेले असते. त्यामुळे शरीराला आधार मिळतो. या उपसंघात सु. ५८,००० जाती असून पेट्रोमायझॉनपासून मनुष्यासह सर्व प्राण्यांचा समावेश त्यात होतो. पृष्ठवंशी प्राण्यांची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : या प्राण्याचे शीर्ष पूर्ण विकसित झालेले असते. मेंदू कवटीत संरक्षित असतो. मेंदूच्या खालच्या भागातून पृष्ठवंशामधून गेलेला मज्जारज्जू असतो. अंत:कंकाल संधियुक्त कास्थिमय अथवा अस्थिमय असते. पृष्ठवंशी प्राण्यांना शीर्ष, मान, धड, पुच्छ आणि उपांगांच्या दोन जोड्या असतात.

पृथ्वीवरील एकूण सर्व प्राण्यांच्या जातींपैकी ५% प्राणी पृष्ठवंशी आहेत; उर्वरित अपृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा नसलेले आहेत. पृष्ठवंशी प्राण्यांच्या आकारमानात खूप विविधता आढळते. उदा., पिडाफ्रिन ॲम्युन्सिस जातीच्या बेडकाची लांबी केवळ ८ मिमी., तर व्हेल या सस्तन प्राण्याची लांबी सु. ३३ मी. असते.

पृष्ठवंशी उपसंघाचे दोन विभाग करण्यात आले आहेत : (१) जंभहीन, (२) जंभयुक्त.

जंभहीन :  या विभागातील प्राण्यांना जंभ अथवा जबडे नसतात. यात एकच गोलमुखी वर्ग आहे.

गोलमुखी : (सायक्लोस्टोमॅटा). या वर्गातील प्राण्यांना जबडेविरहित चूषीमुख असते. यातील काही प्राणी खाऱ्‍या, तर काही गोड्या पाण्यात राहतात. शरीर दंडगोलाकार, सडपातळ व लांब असते. त्वचा मृदू व बुळबुळीत असून त्यावर असंख्य श्लेष्मग्रंथी असतात. शरीरावर खवले व उपांगाच्या जोड्या नसतात. फक्त मध्यपर आणि पुच्छपर असतात. पृष्ठरज्जू स्थायी असतो. ग्रसनीजवळ असलेल्या पिशवीसारख्या कोष्ठात कल्ल्यांच्या ६–१४ जोड्या असतात. क्लोमरंध्रे अथवा कल्लाविदरे असतात. श्‍वसन कल्ल्यांद्वारे होते. अंत:कंकाल कास्थिमय असते. हृदयात एक अलिंद व एक निलय असते. अंड्यांचे बाह्यफलन होते. या वर्गात फक्त ८१ जाती आहेत. उदा. पेट्रोमायझॉन, मिक्झाइन.

जंभयुक्त : या विभागातील प्राण्यांना तोंडाभोवती जंभ अथवा जबडे असतात. त्यांना वरचा जबडा आणि खालचा जबडा म्हणतात. यात सहा वर्ग आहेत.

कास्थिमत्स्य : (काँड्रिक्थीज). या वर्गातील मत्स्यांच्या शरीरातील अंत:कंकाल कास्थिमय असते. यातील सर्व मासे समुद्रात राहतात. त्वचा चिवट असून बाह्यकंकाल पट्टिकाभ (प्लॅकॉइड) खवल्यांच्या स्वरूपात असते. पृष्ठपर आणि अधरपर एक-एक (अयुग्मित), तर वक्षपर आणि श्रोणिपर जोडीने (युग्मित) असतात. पुच्छपराचा उपयोग पोहताना दिशा बदलण्यासाठी होतो. मुख अधर भागाकडे असून दोन्ही जबड्यांवर अनेक दात असतात. मणके अनेक असून ते पूर्ण आणि वेगवेगळे असतात. पृष्ठरज्जू स्थायी असतो. हृदय दोन कप्प्यांचे असून त्यात एक अलिंद आणि एक निलय असते. यांशिवाय शिरा कोटर व धमनी शंकू असे दोन जादा कप्पे असतात. हृदयात फक्त अशुद्ध रक्त (शिरा रक्त) असते. श्‍वसनासाठी कल्ल्यांच्या ५–७ जोड्या असतात. वाताशय नसतो. हे मासे शीत रक्ताचे (अनियततापी) असतात. लिंगे भिन्न असून नरात श्रोणिपरांच्या मध्ये आलिंगक असतात. जननग्रंथींची जोडी असते. हे प्राणी अंडज किंवा अंडजरायुज असतात. त्यांच्या सु. ८१० जाती आहेत. उदा., शार्क, रे, स्केट्स इत्यादी.

अस्थिमत्स्य : (ऑस्ट्रेइक्थीज). या वर्गातील माशांच्या शरीरातील अंत:कंकाल अस्थिमय असते. हे मासे गोडे, खारे व मचूळ अशा सर्व प्रकारच्या पाण्यात राहतात. शरीर सामान्यपणे विटीच्या म्हणजे तर्कूच्या आकाराचे असते. बाह्यकंकाल कॉस्माइड, गॅनॉइड, सायक्लॉइड (चक्राभ) आणि टेनॉइड (कंकताभ) खवल्यांच्या स्वरूपात असते. पर युग्मित किंवा अयुग्मित असतात. मुखाच्या टोकाला पृष्ठरज्जूचे अवशेष बऱ्‍याचदा टिकून असतात. मणके अनेक असून ते स्पष्टपणे वेगवेगळे असतात. हृदयात एक अलिंद आणि एक निलय असे दोन कप्पे असतात. यांशिवाय शिरा कोटर व धमनी शंकू असे दोन जादा कप्पे असतात. हृदयात फक्त अशुद्ध रक्त असते. ग्रसनीच्या दोन्ही बाजूंना एकेक कोष्ठ असून कल्ल्यांच्या चार जोड्या असतात. त्या प्रच्छदाने झाकलेल्या असतात. बहुधा वाताशय असतो. हे शीत रक्ताचे असतात. नरामध्ये आलिंगके नसतात. लिंगे भिन्न असून जननग्रंथी जोडीने असतात. हे सामान्यपणे अंडज असतात, मात्र काही जरायुज किंवा अंडजरायुज असतात. त्यांच्या सु. २५,००० जाती आहेत. उदा. रोहू, कटला, बोंबील, पापलेट, बांगडा, घोळ, रावस, दाढा, शिंगाळा, वायटी, सुरमई, तरळी इत्यादी.

उभयचर : (ॲम्फिबिया). या वर्गातील प्राणी पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतात. डिंभावस्थेत ते पाण्यात आणि प्रौढावस्थेत जमिनीवर राहतात. म्हणून त्यांना उभयचर म्हणतात. ते फक्त गोड्या पाण्यात आढळतात. या प्राण्यांना मान तसेच बाह्यकंकाल नसते. त्वचा ओलसर व ग्रंथियुक्त असते. कल्ले, फुप्फुसे, त्वचा तसेच मुखगुहेच्या अस्तराच्या साहाय्यानेही श्‍वसन होते. हृदयात दोन अलिंदे आणि एक निलय असे मिळून तीन कप्पे असतात. यांशिवाय शिरा कोटर आणि धमनी शंकू असे जादा कप्पे असतात. हे प्राणी शीत रक्ताचे असून परिसरातील तापमानानुसार त्यांच्या शरीराच्या तापमानात बदल होतो. ऋतुमानानुसार ग्रीष्मनिष्क्रियता व शीतनिष्क्रियता दिसून येते. उपांगांच्या दोन जोड्या म्हणजे पुढचे पाय आणि मागचे पाय असतात. बोटांना नख्या नसतात. डोळे बटबटीत असून त्यांना पापण्या आणि निमेषकपटल असते. लिंगे भिन्न असून काही अपवाद वगळता सर्व अंडज आहेत. अंड्यांतून डिंभ बाहेर पडून त्यांचे रूपांतरण होऊन प्रौढ तयार होतात. त्यांच्या सु. ५,००० जाती आहेत. उदा., सॅलॅमँडर, बेडूक, भेक, वृक्षमंडूक इत्यादी.

सरीसृप : (रेप्टिलिया). या वर्गातील प्राणी सरपटणारे असतात. बहुतेक सरीसृप भूचर असून काही मोजके पाण्यात राहणारे आहेत. त्वचा कोरडी असून खवलेयुक्त किंवा पट्टिकायुक्त असते. शीर्ष, मान, धड आणि शेपूट असे शरीराचे चार भाग असतात. पायांच्या दोन जोड्या असून बोटांना नख्या असतात. मात्र, या  प्राण्यांमध्ये उपांगांच्या बाबतीत विविधता आढळते. जसे, काही सरड्यांचे पाय लहान असतात, तर सापांना पाय नसतात. समुद्री कासवांचे पाय वल्ह्यासारखे असतात. या प्राण्यांत श्वसन फुप्फुसांद्वारे होते. हृदयात दोन अलिंदे आणि अंशत: विभागलेले निलय असते. मगरीच्या गणातील प्राण्यांत निलयाचे दोन भाग असतात. हे प्राणी शीत रक्ताचे असतात. अंत:कंकाल पूर्णपणे अस्थिमय असते. नरांमध्ये मैथुनांगे असतात. सरीसृप सामान्यपणे अंडी घालतात. पण काही सरडे आणि साप अंडजरायुज असतात. त्यांच्यात आंतरफलन होते. अंडी मोठी असून त्यात पोषकद्रव-पीतक जास्त असते. भ्रूणकला असतात. त्यांच्या सु. ७,००० जाती आहेत. उदा., सरडा, पाल, मगर, कासव, नाग, फुरसे, घोणस, अजगर इत्यादी.

पक्षी : (एव्हज). या वर्गातील प्राणी हवेत संचार करतात. बहुतेक पक्षी दिनचर असतात. पक्ष्यांत बाह्यकंकाल पिसांच्या स्वरूपात असून शरीर पिसांनी झाकलेले असते. हे उष्ण रक्ताचे असून शरीराचे तापमान परिस्थितीनुसार बदलत नाही. पिसांचा उपयोग हवेत उड्डाण करण्यासाठी आणि शरीराचे तापमान कायम टिकविण्यासाठी होतो. शीर्ष, मान, धड आणि शेपूट असे शरीराचे भाग असतात. त्वचा पातळ व शुष्क असते. हवेत उडताना हवेचा रोध कमी करण्यासाठी शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. पक्ष्यांना चोच असते, मात्र दात नसतात. उपांगांच्या दोन जोड्या असून अग्र उपांगांचे अथवा पुढील पायांचे रूपांतर पंखांमध्ये झालेले असते. चालणे, धावणे, पोहणे, डहाळीवर बसणे यांसाठी पश्‍च उपांगे अथवा मागचे पाय अनुकूलित झालेले असतात. मागचे पाय मोठे आणि मजबूत असतात. बोटे खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नख्या असतात. श्वसन फुप्फुसांच्या साहाय्याने होते. फुप्फुसे घट्ट व बरगड्यांना चिकटलेली असतात. त्यापासून वायुकोश निघतात. हृदय चार कप्प्यांचे असते. उत्सर्जन संस्थेत मूत्राशय नसते. मादीत फक्त डाव्या बाजूचे अंडाशय व अंडवाहिनी असते. त्यांच्यात आंतरफलन होत असून अंड्याचे कवच कठीण आणि कॅल्शियमयुक्त असते. अंड्याच्या आत भ्रूणकला असतात. हवेत संचार करण्यासाठी पक्षी पूर्णपणे अनुकूलित झालेले आहेत. त्यांच्या सु. ९,१०० जाती आहेत. उदा. चिमणी, कावळा, कबूतर, बदक, रोहित, सारस, शहामृग इत्यादी.

स्तनी : (मॅमॅलिया). या वर्गातील प्राण्यांच्या शरीरावर स्तनग्रंथी असतात. मादीच्या स्तनग्रंथीमध्ये तयार होणाऱ्‍या दुधावर पिलांचे पोषण होते. नराच्या स्तनग्रंथी कार्यरत नसतात. हे प्राणी ध्रुव प्रदेश, समशीतोष्ण प्रदेश, उष्ण प्रदेश, समुद्र, नदीमुख, नदी, घनदाट वने व रखरखीत वाळवंटे अशा सर्व ठिकाणी राहतात. शीर्ष, मान, धड व शेपूट असे शरीराचे भाग असतात. सर्व सस्तन प्राण्यांच्या मानेमध्ये सात मणके असतात. दोन्ही जबड्यांत दात असून ते हाडांच्या खोबणीत घट्ट जुळलेले असतात. उपांगांच्या दोन जोड्या असून पुढच्या आणि मागच्या पायांना प्रत्येकी ५ बोटे असतात. पायांचा उपयोग चालणे, धावणे, चढणे, पोहणे, बिळे करणे, भक्ष्य पकडणे इ. कामांसाठी होतो. तळपायांवर बहुधा मांसल गाद्या असतात. त्वचेमध्ये स्नेहग्रंथी, स्वेदग्रंथी, गंधग्रंथी व स्तनग्रंथी असतात. शरीरात एक स्नायुमय मध्यपटल असून त्यामुळे वक्षगुहा उदरगुहेपासून वेगळी झालेली असते. हे उष्ण रक्ताचे प्राणी आहेत. हृदय चार कप्प्यांचे असून त्यात दोन अलिंदे आणि दोन निलये असतात. उंटाचा अपवाद वगळता, रक्तातील तांबड्या पेशी वर्तुळाकार आणि केंद्रकविरहित असतात. उंटामध्ये त्या अंडाकृती असतात. श्वसन फुप्फुसांमार्फत होते. मूत्राशय असते. नरामध्ये वृषण उदरगुहेबाहेर असलेल्या वृषणकोशात असतात. नराला शिस्न असते. मादीमध्ये अंडी सूक्ष्म असून त्यांवर कवच नसते. त्यांच्यात आंतरफलन होऊन मादीच्या गर्भाशयात फलित अंड्यांची वाढ होते. भ्रूणकला असतात. भ्रूण अपरेने (वारेने) गर्भाशयाला जोडलेले असते. काही सस्तन प्राणी अंडज अथवा शिशुधानी असतात. इतर सर्व जरायुज असून अपत्याला जन्म देतात. या प्राण्यात बाह्यकर्ण असतो. मेंदू अतिविकसित असतो. सस्तन प्राण्यांच्या सु. ४,७०० जाती आहेत. उदा. बदकचोच्या, कांगारू, कोआला, उंदीर, वटवाघूळ, गेंडा, हत्ती, व्हेल, सील, मनुष्य इत्यादी.

प्रतिक्रिया व्यक्त करा