कासव हा अतिप्राचीन प्राणी आहे. त्यांच्याबरोबरचे डायनॉसर काळाच्या ओघात नष्ट झाले. परंतु, कासवे मात्र आजही अस्तित्वात आहेत. कासव या शब्दास इंग्रजीमध्ये टर्टल (Turtle), टॉर्टॉइज (Tortoise) आणि टेरापिन (Terrapin) असे प्रतिशब्द आहेत. टर्टल हा शब्द पाण्याजवळ किंवा पाण्यात असणाऱ्या कासवांसाठी तसेच सागरी कासवांसाठी वापरला जातो; म्हणून टर्टल या शब्दासाठी मराठीत जल कच्छप असा शब्द वापरला आहे. याउलट बराचसा वेळ जमिनीवर असणाऱ्या कासवांसाठी टॉर्टॉइज हा शब्द वापरला जातो; म्हणून टॉर्टॉइज या शब्दासाठी मराठीत भूकच्छप असा शब्द वापरला आहे. गोड्या पाण्यातील कासवांना टेरापिन असे म्हटले जाते. (टेरापिन शब्दासाठी अद्याप मराठी शब्द नाही.) भारतातील नद्या, विहिरी व तलाव यांमध्ये ११ पेक्षा अधिक टेरापिन प्रकारातील कासवे आढळतात.

कासव हा सरीसृप वर्गाच्या टेस्ट्यूडिनस (Testudines) गणातील [पूर्वीच्या कीलोनिया (Chelonia) गणातील] प्राणी आहे. टेस्ट्यूडिनीस म्हणजे कवचधारी. भूकच्छपांचा (जमिनीवरील कासवांचा) समावेश टेस्ट्यूडिनस गणातील टेस्ट्यूडीनिडी (Testudinidae) कुलात होतो. भूकच्छप हे भूमध्य खोऱ्याच्या आसपास, दक्षिण-उत्तर अमेरिकेपासून दक्षिण-दक्षिण अमेरिकेपर्यंत, युरेशियापासून दक्षिण-पूर्व आशियापर्यंत उप-सहारा आफ्रिका, मादागास्कर आणि प्रशांत महासागरातील काही बेटांवर आढळून येतात. ऑस्ट्रेलियापासून पुढे ते दिसून येत नाहीत. गवताळ प्रदेश, खुरटी झाडी असलेल्या क्षेत्रापासून आर्द्र सदाहरित जंगलांपर्यंत, समुद्रसपाटीपासून पर्वतापर्यंत अशा विभिन्न अधिवासांमध्ये भूकच्छप आढळतात. कित्येक प्रजाती अर्ध-शुष्क अधिवासांमध्येही राहतात.

इंडियन स्टार भूकच्छप (जिओशेलॉन एलेगन्स)

एकंदरीत कच्छपाच्या कित्येक प्रजातींमध्ये जरी लैंगिक द्विरूपता दिसून येत असली तरीही नर व मादी यांमधील फरक हा प्रत्येक प्रजातीनुसार वेगळा असतो. काही प्रजातींमध्ये नर कासवाची मान मादी कासवाच्या मानेपेक्षा जास्त लांब असते, तर काही प्रजातींमध्ये मादीची नखे नरांच्या नखांपेक्षा जास्त लांब असतात. लिंग ओळखण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे कासवांच्या शेपटीचे निरीक्षण करणे. मादीची शेपूट ही साधारणत: छोटी व खाली झुकलेली असते, तर नराची शेपूट ही तुलनेने लांब व वर उचललेली असते. जलकच्छपांप्रमाणेच भूकच्छपांनासुद्धा स्वसंरक्षणासाठी पाठीवर कठीण कवच असते. क्रिप्टोडिरा (Cryptodira) या उपगणातील इतर सदस्यांप्रमाणेच भूकच्छपदेखील भक्षकांपासून किंवा इतर धोक्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपले डोके व मान कवचाच्या आत ओढून घेतात.

इंडियन स्टार भूकच्छप (जिओशेलॉन एलेगन्स)

भूकच्छप हे दिवसा कार्यरत असतात. मात्र बदलत्या तापमानानुसार ते संधिप्रकाशाच्या वेळेससुद्धा कार्यक्षम (Crepuscular; संध्याचर) बनतात. सामान्यत: कासव एकांतवासी असतात. भूकच्छपांच्या बऱ्याच प्रजातींमध्ये एकाचवेळी छोटी-छोटी वीसहून अधिक अंडी घातली जातात, तर काही प्रजातींमध्ये एक किंवा दोनच अंडी घातली जातात. बहुतांश प्रजातींमध्ये अंडी उबवण कालावधी सरासरी १०० ते १६० दिवसांचा असतो. शक्यतो अंडी रात्रीच्या वेळेस घातली जातात. अंड्यांचा आकार आईच्या आकारावर अवलंबून असतो. मादी कच्छपाच्या अधरवर्त्मावर (Plastron) शेपटीखाली सहज लक्षात येण्यासारखी इंग्रजी V आकाराची एक खाच असते. जिथून सुलभरीत्या अंडी बाहेर पडतात. उबवण कालावधी पूर्ण झाल्यानंतर पिलू एग टूथच्या (वरील जबड्याच्या पुढील टोकास असलेल्या भागाच्या) साहाय्याने अंड्याचे कवच फोडून बाहेर येते.

भारतीय उपखंडात आढळणारे भूकच्छप

कित्येक भूकच्छप शाकाहारी असून ते गवत, तण, वनस्पतींची पाने, फुले आणि काही प्रकारची फळेसुद्धा खातात. या कुलातील काही प्रजाती मिश्राहारी असतात. पाळीव कच्छपांना विशेषत: रानगवत, शीतपर्णे आणि काही विशिष्ट फुले यांवर आधारित आहाराची गरज असते. काही प्रजाती अळ्या किंवा कीटकांचे भक्षण करून त्यांच्या साधारण अधिवासांमध्ये राहतात. प्रथिनांचे अतिसेवन हे शाकाहारी प्रजातींना हानिकारक असते आणि ते कवचांमधील व्यंग किंवा इतर वैद्यकीय समस्येशी निगडीत असते. कच्छपांच्या वेगवेगळ्या प्रजातींमधील पोषकांची गरजही वेगवेगळी असते.

भारतात इंडियन स्टार भूकच्छप (जिओशेलॉन एलेगन्स; Geochelone elegans) हे तमिळनाडूमधील रामनाथपूरम जिल्ह्यात किनाऱ्यालगतच्या शुष्क ठिकाणी, कर्नाटक व आंध्र लगत कोलार जिल्हा येथे आढळते. या जातीतील मादी भूकच्छपाच्या कवचाची लांबी सु. २८ सेंमी. असते. नर मादीहून तुलनेने लहान असतात. कवचावर कुबड आल्यासारखा उभार असतो. मस्तकावर व पायांवर खवले असतात. पाठीवरील काळ्या रंगावर पिवळ्या चांदणीसारखा आकार असतो. ही भूकच्छपे दिसायला आकर्षक असल्यामुळे कासव पालनामध्ये यांचा अधिक वापर केला जातो. ही कासवे दिवसभर लपून बसतात व सायंकाळी बाहेर पडतात. ही बहुतांशी शाकाहारी असून पडलेली फळे, हाडजोडी (Cissus quadrangularis) नावाचे द्राक्ष वेलीसारखे तण आवडीने खातात. यांचा प्रजनन काळ पावसाळ्यात असतो. मादी लहान खळग्यामध्ये एकावेळी ३ ते ७ अंडी घालते. ओलाव्यासाठी मादी खड्ड्यावर माती ढकलून त्यावर मूत्रविसर्जन करते. ४७ ते १४७ दिवसानंतर अंड्यांतून पिले बाहेर पडतात. अंड्यातून बाहेर पडल्यावर दहा दिवसांनी पिले अधाशासारखे दिसेल त्या खाद्यावर तुटून पडतात. पिले दोन वर्षांनी प्रजननक्षम होतात.

एशियन ब्राऊन टॉर्टॉइज

इंडोटेस्ट्युडो इलोंगेटा (Indotestudo elongata) आणि इंडोटेस्ट्युडो फोर्सटेन्टी (Indotestudo forstenti) ही दोन भूकच्छपे देखील भारतीय उपखंडात आढळतात. इं. इलोंगेटा  उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात आणि नेपाळमध्ये आढळते. हे भूकच्छप स्टार टोर्टॉइजसारखे असून पाठीवर चौकोनी ठिपके असतात. पश्चिम घाट व केरळमध्ये इं. फोर्सटेन्टी  भूकच्छप आढळते. हे भूकच्छप इंडोनेशियामधून भारतात आणलेले आहे.

अल्दाबरा जायंट टॉर्टॉइज – अद्वैता भूकच्छप

भारताच्या पूर्व भागातील टेकड्यांच्या प्रदेशांत एशियन ब्राऊन टॉर्टॉइज (Manouria emys) हे भूकच्छप आढळते. हे भारतातील सर्वांत मोठ्या आकाराचे भूकच्छप आहे. त्याच्या शेपटावर असलेल्या दोन मोठ्या खवल्यांवरून ते ओळखता येते. प्रौढामध्ये याच्या कवचाचा रंग गडद तपकिरी किंवा काळा असतो. याच्या कवचाची सर्वाधिक लांबी ४७ सेंमी. असल्याबाबतची नोंद आहे. याचा प्रजनन काळ फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांत असतो. साधारणपणे जून महिन्यात मादी सुमारे २० सेंमी. खोल खड्डा खणून त्यात ३९—४२ अंडी घालते. प्रत्येक अंड्याचे वजन ५५—६२ ग्रॅम भरते. अंडी घातल्यावर मादी पालापाचोळ्याच्या साहाय्याने खड्डा झाकते. या ठिकाणी येणाऱ्या इतर प्राण्यांना ती हुसकावून लावते व अंड्यांचे संरक्षण करते.

कीलोनॉइडिस नायग्रा – गोलिथ भूकच्छप

एखाद्या झाडाच्या खोडाच्या आडव्या छेदावर असलेल्या समकेंद्री वर्तुळांवरून ज्याप्रमाणे त्या झाडाचे वय काढता येते, त्याप्रमाणे कासवाच्या कवचावर असलेल्या समकेंद्री वर्तुळांच्या संख्येवरून त्याच्या आयुर्मानाचा अंदाज बांधला जाऊ शकतो. कासव जमिनीवरील सर्वांत दीर्घायु प्राणी आहे, मात्र कासवांमधील सर्वांत दीर्घायु प्रजातीबाबत अजूनही निश्चिती नाही. गॅलॅपॅगोस बेटावरील (Galapagos) कासवे दीडशे वर्षांहून अधिक जगतात असे आढळून आले आहे.  कलकत्ता येथील अलीपोर झुऑलॉजिकल गार्डन येथील अल्दाबरा जायंट टॉर्टॉइज – अद्वैता (Aldabragiant tortoise – Adwaita; इ. स. १७५०—२००६) नावाचे भूकच्छप २५५ वर्षे जगले असावे असा अंदाज आहे. परंतु, कासवाचे सरासरी आयुर्मान ८०—१५० वर्षे असते.

गॅलॅपॅगोस बेटावरील कासवे

फ्लोरिडा, यू. एस. ए. येथील आतापर्यंतचे जगातील सर्वांत मोठे भूकच्छप कीलोनॉइडिस नायग्रा – गोलिथ (Chelonoidis nigra – Goliath; इ. स. १९६०—२००२) हे असून त्याची लांबी १३५.८ सेंमी., रुंदी १०२ सेंमी., उंची ६८.५ सेंमी. व वजन ४१७ किग्रॅ. इतके आहे.

कमीत कमी जागेत राहण्याच्या सवयीमुळे कासवांना हौद, विहिरी, तलाव यांत सोडण्याची पद्धत भारतात आहे. अमेरिकेत कासव हा उत्तम पाळीव प्राणी समजला जातो. पाळलेल्या व्यक्तीच्या आवाजावरून कासव प्रतिसाद देते. फेंगशुई प्रकारामध्ये कासव घरी ठेवण्याच्या पद्धतींमुळे काही प्रजातींची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यासाठी स्टार टर्टलची पिले मोठ्या संख्येने विकली जातात. भारतीय वन्य प्राणी कायद्यानुसार कोणत्याही प्रजातीचे कासव पाळण्यास बंदी आहे. इंडियन स्टार भूकच्छप कोरड्या शुष्क प्रदेशात व खुरट्या जंगलात आढळते. या कासवाचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये चवथ्या परिशिष्टात केलेला आहे.

पहा : कासव (पूर्वप्रकाशित), जल कच्छप, टोरापिन.

संदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/Indian_black_turtle
  • https://en.wikipedia.org/wiki/Indian_star_tortoise
  • https://commons.wikimedia.org/wiki/File:Indian_flapshell_turtle_(Lissemys_punctata_punctata).jpg
  • J. C. Daniel, The Book of Indian Reptiles and Amphibians, Published by Bombay Natural History Society and Oxford University Press, 2002.

समीक्षक : निनाद शहा