मोनेरा सृष्टीतील केंद्रक व पेशीआवरणविरहित सजीव. जीवाणू अधिक्षेत्रातील बॅसिलोटा संघातील क्लॉस्ट्रिडिया वर्गात यूबॅक्टेरिया गणातील क्लॉस्ट्रिडिएसी (Clostridiaceae) कुलात क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम या जीवाणूचा समावेश होतो. बॅसिलोटा संघातील जीवाणू ग्रॅम पॉझिटिव्ह रंजक असून ते विनॉक्सिश्वसनी असतात.

क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम जीवाणूचा आकार दंडगोलाकार (दंडाणू) आहे. Botulus (बोट्युलस) या लॅटिन शब्दाचा अर्थ होतो ‘सॉसेज’, म्हणजे काकडीच्या आकाराचा पदार्थ. क्लॉ. बोट्युलिनम जीवाणूच्या काही प्रकारामध्ये (Strains) पेशीबाहेर सर्व बाजूंनी डोकावणाऱ्या अनेक कशाभिका (Flagella) असतात. त्यांच्या मदतीने हे जीवाणू सावकाश स्थलांतर करू शकतात.

क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम जीवाणू

क्लॉ. बोट्युलिनम जीवाणूची चार दृश्य-प्रारूपे (Phenotypes) व सात प्रतिजन-प्रारूपे (Serotypes) आहेत. दृश्य-प्रारूपांचे वर्गीकरण प्रथिन विघटक क्षमतेवरून व प्रतिजन निर्मिती प्रकारावरून केले आहे. क्लॉ. बोट्युलिनममुळे मानवात अन्नविषबाधा होते, त्यास ‘बोट्युलिझम’ म्हणजे ‘विशिष्ट अन्नविषबाधा’ म्हणतात. खाद्यपदार्थातील प्रथिन विघटन करणारे व प्रथिन विघटन करू न शकणाऱ्या अशा दोन्ही प्रारूपामुळे मानवामध्ये अन्नविषबाधा उद्रेक झाल्याची उदाहरणे आहेत. यातील काही जनुकीय परिवर्तीत अन्नविषबाधा न होणारी प्रारूपे तयार करतात. त्यातून मानव व पाळीव प्राणी यांना अन्नविषबाधा होत नाही.

क्लॉ. बोट्युलिनम जीवाणूंची वाढ नेहमी ऑक्सिजनविरहित माध्यमात होते. क्लॉ. बोट्युलिनममध्ये कर्बोदके व अमिनो अम्लांचे किण्वन (Fermentation) करण्याची क्षमता आहे. क्लॉ. बोट्युलिनम जीवाणूच्या किण्वन क्रियेमधून कर्बोदके व अमिनो अम्लांपासून ऊर्जा मिळवली जाते. क्लॉ. बोट्युलिनम जीवाणूची कार्बन व नायट्रोजनची पूर्ण गरज किण्वन क्रियेमधून भागवली जाते. या किण्वन क्रियेतून कार्बन डाय-ऑक्साइड व अमोनिया उत्सर्जित होतो.

गोड्या आणि खाऱ्या जलाशयांच्या तळाशी कार्बनी संयुगे कुजणाऱ्या गाळात, सस्तन प्राण्यांच्या अन्ननलिकेत व विष्ठेमध्ये क्लॉस्ट्रिडियमचा आढळ असतो. क्लॉ. बोट्युलिनमचे अंतर्बीजाणू (Endospores) अत्यंत चिवट असल्याने ते सांडपाण्यात व शिळ्या अन्नामध्ये देखील सापडले आहेत. बोट्युलिझमचा संसर्ग झाल्याशिवाय मानवी विष्ठेमध्ये ते सहसा आढळत नाहीत.

क्लॉ. बोट्युलिनमपासून ‘बोट्युलिनम’ नावाचे चेताविष तयार होते. हे चेताविष चेतापेशीवर परिणाम करते. बोट्युलिनम चेताविषामुळे ॲसिटिलकोलीन (Acetylcholine) नावाचे चेतापेशी प्रेरक रसायन चेतापेशीच्या टोकामधून बाहेर येत नाही. परिणामी स्नायू शिथिल होतात. बोट्युलिनम चेताविषांचे अन्ननलिकेतील विकरामुळे विघटन होत नाही. लहान आतड्यातून ही शोषली जातात व रक्त प्रवाहात मिसळतात. सर्व प्रकारची बोट्युलिनम चेताविषे १००º से. तापमानास १५ मिनिटांत निष्प्रभ होतात. बहुतेक दृष्य-प्रारूप एकच प्रकाराचे चेताविष तयार करते. परंतु, एकाहून अधिक प्रकाराची चेताविषे तयार होत असल्याची उदाहरणे आढळली आहेत. बोट्युलिनम , बी, एफएच यापासून मानवामध्ये आजार होतात; तर , बी आणि यामुळे अन्नविषबाधा होते. यातील चेताविष मत्स्य आहारामधून आलेले आहे. शिळी मिठाई, शिळा भात व शिळ्या मांसजन्य अन्नात वाढलेल्या क्लॉ.  बोट्युलिनममुळे अन्नविषबाधा होते.

बोट्युलिझम झालेल्या व्यक्तीमध्ये डोळ्याच्या पापण्या खाली पडणे, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसत असल्यास अन्नविषबाधेवरील उपचार त्वरित करावे लागतात.

क्लॉ. बोट्युलिनमचे अंतर्बीजाणू पूर्ण कोरड्या जागी, अतिउच्च तापमानाला, तीव्र हानिकारक रसायने असणाऱ्या जागी टिकून राहतात. अंतर्बीजाणू लंबगोल, अंड्याच्या आकाराचे असतात. त्यांच्याभोवतीचे अनेक थरांचे घट्ट कवच प्रतिकूल स्थितीत त्यांचे रक्षण करते. क्लॉस्ट्रिडियम अंतर्बीजाणूंची वाढ फक्त गोड्या पाण्यात ऑक्सिजनविरहित माध्यमात होते. खाद्यपदार्थ डबाबंद करताना पुरेशी काळजी घेतली नाही तर क्लॉस्ट्रिडियम अंतर्बीजाणूंच्या वसाहती नष्ट होत नाहीत. तसेच पदार्थ टिकवण्यासाठी माध्यमाचा सामू ४.६ पेक्षा कमी असल्यास अंतर्बीजाणूच्या वसाहती पदार्थात वाढत नाहीत.

क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम अंतर्बीजाणू

फळांच्या पृष्ठभागावर, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच मासे आणि अन्य खाद्य, सागरी डबाबंद खाद्यपदार्थ यात अंतर्बीजाणू असू शकतात. डबाबंद खाद्यडब्याचा आकार नेहमीपेक्षा फुगीर झाला असल्यास त्यात क्लॉस्ट्रिडियमची वाढ झाली असल्याची शक्यता असते.

क्लॉ. बोट्युलिनम जीवाणूंच्या अनेक वंशप्रकारांत मुख्य गुणसूत्राखेरीज एक वा जास्त छोटीगुणसूत्रे असतात. त्यांना प्लास्मिड (Plasmids) म्हणतात. प्लास्मिडमधील काही जनुके चेताविष निर्मितीशी संबंधित असतात.

क्लॉ. बोट्युलिनमपासून बोटॉक्स (Botox) नावाचे सौम्य औषध बनवले जाते. बोटॉक्सचा वापर सौंदर्य उपचारात चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी केला जातो. तसेच अर्धशिशी (डोकेदुखी), चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायूंचा संकोच होणे (Spasm), मूत्रवेग रोधण्यातील अक्षमता (अनियंत्रितपणा), मान आणि खांद्याचे स्नायू आखडणे, मोठ्याप्रमाणात लाळ निर्माण होणे, डोळ्यांचा तिरळेपणा इत्यादींवरील उपचारांत बोटॉक्सचा वापर होतो. परंतु, बोटॉक्सच्या वापराचे काही दुष्परिणाम देखील आहेत. याच्या वापरामुळे विशिष्ट स्नायू दुर्बल होतात, तसेच त्यांचे आकुंचन कमी होते.

पहा : अन्नविषबाधा (पूर्वप्रकाशित नोंद), डबाबंदीकरण (पूर्वप्रकाशित नोंद), जीवाणू पेशी, तीन अधिक्षेत्रे वर्गीकरण.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे