(सुबाबूल; रिव्हर टॅमॅरिंड). एक बिनकाटेरी वृक्ष. सुबाभूळ हा वृक्ष बाभळीच्या म्हणजे फॅबेसी कुलातील ल्युसीना प्रजातीतील आहे. ल्युसीना प्रजातीत २४ जाती आहेत. त्यांनाच सामान्यपणे सुबाभूळ म्हणतात. त्यांपैकी ज्याचे शास्त्रीय नाव ल्युसीना ल्युकोसेफॅला अथवा ल्युसीना ग्लॉका आहे, तो प्रातिनिधिक वृक्ष मानला जातो. तो मूळचा मध्य अमेरिका व पॅसिफिक बेटांवरील असून अनेक देशांच्या उष्ण प्रदेशांत लागवडीखाली आहे. इंडोनेशिया, मलेशिया, पापुआ न्यू गिनी आणि आग्नेय आशियातील इतर देशांत तसेच आफ्रिका येथेही दिसून येतो. भारतात सुबाभूळ वृक्षाची लागवड मुद्दाम करण्यात आली असून देशात अनेक मैदानी प्रदेशांत तो आढळतो.
सुबाभळीचा वृक्ष सु. ९ मी. उंच वाढत असून त्याची मुळे जमिनीत खोलवर पसरतात. त्याच्या मुळांवर लहान गाठी असून त्यांत नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू असतात. खोडाची साल गर्द तपकिरी रंगाची असून पातळ असते. पाने संयुक्त, दोनदा विभागलेली, पिसांसारखी व ८–१८ सेंमी. लांब असतात. पानांच्या व दलांच्या मध्यशिरेवर शेवटी बारीक नरम काटा असतो. दलांच्या ६–८ जोड्या असतात. प्रत्येक दलावर ११–२३ दलकांच्या जोड्या असतात; दलके ८–१९ मिमी. लांब, अंडाकृती असून त्यांचा रंग निळसर हिरवा असतो. फुले स्तबक फुलोऱ्यावर गुच्छाने येत असून जे पानांच्या बगलेत, एकाकी किंवा लहान झुबक्यात असतात. फुले ५ मिमी. व्यासाची, पिवळसर पांढरी असून द्विलिंगी, पंचभागी व बिनदेठाची असतात. शेंगा सरळ, सपाट, गुळगुळीत असून सु. १५ सेंमी. लांब असतात. टोकाला त्रिकोणी, तर तळाला अरुंद असतात. प्रत्येक शेंगेत गर्द तपकिरी, चकचकीत व १५–२५ बिया असतात.
सुबाभळीची पाने, फांद्या आणि बियांची पूड खताकरिता वापरतात. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. पाने, शेंगा व बिया गुरे, शेळ्या, मेंढ्या यांना पूरक अन्न म्हणून दिले जाते. साल कृमिनाशक व मत्स्यविष म्हणून वापरतात. लाकूड कठीण, मजबूत व घट्ट असते. मात्र घरबांधणीसाठी ते फारसे वापरत नाहीत. ते कोळसा तयार करण्यासाठी, कागदाच्या लगद्यासाठी व इंधन म्हणून वापरतात. बिया, शेंगा आणि साल यांपासून मिळवलेला रंग कापड रंगविण्यासाठी वापरतात. सोसाट्याच्या वाऱ्यापासून व वादळापासून रक्षण करण्यासाठी, जमिनीची धूप थांबवण्यासाठी, तसेच चहा, कॉफी, कोको, रबर यांचे मळे तसेच पानमळे येथे निवाऱ्यासाठी सुबाभळीची लागवड केली जाते. आययुसीएन संस्थेने तण म्हणून आक्रमकपणे वाढणाऱ्या १०० वनस्पतींची यादी केलेली आहे, तिच्यात सुबाभळीचा समावेश आहे. बहामा तसेच हवाई बेटे, तैवान, फिजी, हाँगकाँग, दक्षिण आफ्रिका, उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि यूरोप येथील कोरड्या प्रदेशांत ती वेगाने वाढत असल्यामुळे तेथे ती तण मानली जाते.
मानव, घोडे, डुकरे, ससे इ. रवंथ न करणाऱ्या प्राण्यांना सुबाभळीच्या अतिसेवनाने विषबाधा होते व त्यांचे केस गळून पडतात. मेंढ्यांनी अतिसेवन केल्यास लोकर गळून पडते; हे खाद्य सोडल्यास त्यांची लोकर पूर्ववत होते किंवा टिकून राहते असे दिसून आले आहे. विषबाधा होण्याचे कारण बियांमध्ये ‘मिमोसीन’ हे विषारी अल्कलॉइड असते. ज्या प्रदेशातील रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या अन्ननलिकेत सिनर्जिस्टस जोनेसी हे विनॉक्सिजीवी जीवाणू असतात, असे रवंथ करणारे प्राणी या अल्कलॉइडाचे पचन करू शकतात.