चिंकारा या समखुरी प्राण्याचा समावेश स्तनी वर्गाच्या बोव्हिडी कुलाच्या अँटिलोपिनी उपकुलात केला जातो. त्याचे शास्त्रीय नाव गॅझेला गॅझेला आहे. भारत, बांगला देश, इराण व पाकिस्तान या देशांच्या गवताळ आणि वाळवंटी प्रदेशांत हा प्राणी आढळतो. भारताच्या वायव्य व मध्य भागातील मैदानी प्रदेश, टेकड्यांचा प्रदेश आणि महाराष्ट्राचा खुला प्रदेश यांत हा आढळतो.
चिंकारा (गॅझेला गॅझेला)

चिंकारा सडपातळ, बांधेसूद आणि डौलदार प्राणी आहे. पूर्ण वाढ झालेल्या नराची खांद्याजवळ उंची सु. ६५ सेंमी. आणि वजन २०-२५ किग्रॅ. असते. पाठीचा रंग गडद तपकिरी असून पोटाकडील भाग फिकट असतो. चेहऱ्यावर दोन्ही बाजूंना मुस्कटापासून डोळ्यांपर्यंत एक पांढरी रेषा गेलेली दिसते. नाकाच्या वर गडद तपकिरी चट्टा असतो. शिंगे २५-३० सेंमी. लांब असतात. मादीची शिंगे आखूड व नितळ असतात. तसेच नराच्या शिंगांवर वलये असतात. त्यांच्या काही माद्यांना शिंगे नसल्याचेही आढळून आले आहे. शेपूट आखूड असते. यांचे डोळे, कान आणि नाक तीक्ष्ण असतात.

चिंकाऱ्याचे लहान लहान कळप असतात. ते अतिशय वेगाने पळतात. धोक्याची जाणीव होताच त्यांचा कळपच्या कळप वेगाने पळत सुटतो, २००-३०० मी. अंतरावर जाऊन थांबतो आणि नंतर मागे पाहून धोक्याच्या कारणाचा शोध घेऊ लागतो. हा प्राणी बुजरा असून मानवी वस्तीपासून दूर राहतो. त्यामुळे तो सहसा शेतात शिरत नाही.

चिंकारे सकाळी विश्रांती घेतात आणि संध्याकाळी बाहेर पडतात. गवत, पाने व निरनिराळी फळे हे त्यांचे मुख्य अन्न. पाण्याशिवाय ते खूप वेळ राहू शकतात, कारण वनस्पतीच्या चाऱ्यापासून मिळणारे पाणी त्यांना दीर्घकाळ पुरते. उन्हाळ्यात त्यांना पाण्याची गरज भासते. मिळेल तेव्हा ते पाणी पितात. प्रजनन काळ निश्चित नसून ऑक्टोबर-जानेवारी या कालावधीत हे प्राणी समागमासाठी एकत्र येतात. मादी वर्षातून दोनदा विते. एकावेळी मादीला एक किंवा दोन पिले होतात. राजस्थानात बिष्णोई लोक या हरणांचे संरक्षण करतात.