मराठा अंमल, आग्रा : (१७८५–१८०३). पेशवाईतील पराक्रमी सेनानी महादजी शिंदे (१७२७–१७९४) यांनी २७ मार्च १७८५ रोजी आग्रा शहर व किल्ला ताब्यात घेतला. याआधी तत्कालीन मोगल बादशाह शाह आलमने त्यांना वकील-इ-मुत्लक (मुतालिक, मुख्य कारभारी) नेमल्याने (१७८४) त्यांनी रायाजी पटेल यास आग्र्याचा किल्लेदार नेमल्याचे शाही फर्मान देऊन आग्र्यास पाठवले; परंतु तेथील सुभेदार असलेल्या शुजा-दिल-खानने त्याला प्रवेश न दिल्याने युद्ध ओढवले. बाहेरच्या ठाण्यांना सहज उधळून लावत रायाजीने शहरात प्रवेश केला व आपला अंमल बसवला, सोबतच किल्ल्याभोवती चर खणून वेढाही घातला. २ मार्च रोजी महादजी स्वत: तेथे आपल्या सैन्यासह आले. भवानीसिंगच्या हाताखालील किल्ल्यातील शिपायांच्या एका बटालियनने पगार न मिळाल्यामुळे बंड केले व रायाजीला जाऊन मिळाले. उर्वरित शिपायांनीही तसेच केल्यावर शुजादिलखानाकडे किल्ला देण्यावाचून गत्यंतर नव्हते. त्याला वार्षिक ५२ हजार रुपयांच्या जहागिरीचे आश्वासन दिले गेले व किल्ल्यावर मराठ्यांचा झेंडा फडकला. यानंतर आग्र्याची सुभेदारी शाह आलमचा दुसरा मुलगा अकबर शाहला देण्यात आली. त्याच्या हाताखाली महादजींचा जावई लाडोजी देशमुखची नेमणूक झाली. त्याच्या वतीने रायाजी पटेलने कारभार पाहिला.
यानंतर १७८७ मध्ये महादजींविरुद्ध शाह आलमचा सेनापती गुलाम कादर आणि मुहम्मद बेग यांनी फळी उभारली. मुहम्मद बेग मरण पावल्यावर त्याचा पुतण्या इस्माईल बेग ११-१५ सप्टेंबरमध्ये आग्र्याजवळ चाल करून आला. १६ सप्टेंबर रोजी किल्लेदार लखबादादा लाड यांनी इस्माईल बेगवर घोडदळाच्या साहाय्याने आक्रमण केले व सोबत लेस्टेनो या यूरोपीय कमांडरच्या हाताखालील शिपायांच्या दोन बटालियन्सनेही यात भाग घेतला. मात्र लेस्टेनोच्या शिपायांचा पगार खूप काळ थकल्याने व त्याबद्दल उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी पक्ष बदलला व इस्माईल बेगला जाऊन मिळाले. बदल्यात लेस्टेनोला आग्रा प्रांतातल्या उत्तरेकडील काही जहागिरी देण्यात आल्या. आग्रा शहरातील उत्तर भारतीय शिपायांनी शहराचे दरवाजे उघडून ते इस्माईल बेगच्या स्वाधीन केले. या दरम्यान रायाजीने भरतपूरचा आश्रय घेतला. डिसेंबरमध्येही लढाई सुरू राहिली; परंतु मराठ्यांना जवळच्या पथौली गावाचा आश्रय घ्यावा लागला. असे असूनही आग्र्याचा किल्ला मात्र लखबादादा लाड यांनी कौशल्याने नऊ महिने झुंजवला. दरम्यान, शिखांच्या हालचालीची चाहूल लागताच महादजींचा विश्वासू अधिकारी राणेखान याने त्यांच्या जोडीला मराठे व जाटांचे पथक गुलाम कादरच्या जहागिरीवर चाल करण्यासाठी पाठवले. याचा अपेक्षित परिणाम होऊन गुलाम कादर तिकडे गेला. इकडे इस्माईल बेगच्या सैन्यावर राणेखान, जाट, मराठे, डिबॉईनच्या पलटणी यांनी एकत्र चाल केली. निकराच्या लढाईत पलटणींनी मोठे शौर्य गाजवले व आग्रा शहर मराठ्यांनी पुन्हा ताब्यात घेतले (१८ जून १७८८).
पुढे दहा वर्षांनी महादजींच्या विधवा विरुद्ध दौलतराव या संघर्षात आग्र्याचा तत्कालीन किल्लेदार अंबाजी याने विधवांची बाजू घेतली. दौलतरावाला हे समजताच त्याने पेराँ या सेनापतीच्या हवाली आग्र्याचा किल्ला करण्याचा आदेश अंबाजीला दिला; परंतु अंबाजीने ते मान्य केले नाही. अखेरीस २० ऑगस्ट १७९९ रोजी पेराँने किल्ल्याला वेढा घातला. दोन महिने अंबाजीने किल्ला उत्तमरीत्या लढवला; परंतु नदीजवळचा एक बुरूज उडवल्यावर मात्र त्याने किल्ला स्वाधीन केला. यानंतर जॉन विल्यम हेसिंग (१७३९–१८०३) या डच अधिकाऱ्याला किल्लेदार नेमले गेले. तो त्याच्या मृत्यूपर्यंत किल्लेदार होता.
ऑगस्ट १८०३ मध्ये दुसरे इंग्रज-मराठे युद्ध सुरू झाले. दिल्ली ताब्यात घेतल्यावर लेक या इंग्रज सेनापतीने आग्र्यावर स्वारी केली. ९ सप्टेंबर १८०३ रोजी त्याने भरतपूरच्या जाट राजाशी संधान बांधून त्याचे ५००० सैनिक दिमतीस घेतले. त्याच्या सैन्यावर आग्र्याच्या किल्ल्यातून बरीच गोलंदाजी करूनही ते दूरवर असल्याने त्यांचे विशेष नुकसान झाले नाही. काही दिवसांनी किल्ला हवाली करण्याचे आवाहन करूनही सैन्याने प्रतिसाद दिला नाही, उलट लढाईची तयारी केली. जामा मशिदीत व किल्ल्याच्या रेवणीवर आणि अन्य मोक्याच्या जागांवर अनेक तोफांसह पायदळाच्या सात बटालियन्स स्थानापन्न झाल्या. त्यांचा सामना करून शहर ताब्यात घेण्यासाठी ब्रिटिश ब्रिगेडियर जनरल क्लार्कला नेटिव्ह पायदळाच्या तीन बटालियन्स, चौथीच्या सहा कंपन्या आणि कर्नल मॅकुलकला तीन बटालियन्सनिशी मोक्याच्या जागी पाठवण्यात आले. मराठ्यांनी कडवी झुंज दिली व ब्रिटिश फौजेतील १० अधिकारी आणि २२८ शिपाई, तसेच नेटिव्ह शिपायांपैकी ६०० जणांना कंठस्नान घातले. अखेर ब्रिटिशांनी आग्रा शहर ताब्यात घेतले (१० ऑक्टोबर १८०३). किल्ल्यातील सैन्याने शस्त्रसंधीची विनंती केल्यावरून कर्नल सदरलँडला त्या वाटाघाटींसाठी पाठवण्यात आले. परंतु त्यानंतर मराठ्यांकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी १७ ऑक्टोबर रोजी लेकने जोराची मारगिरी सुरू केली. सलगच्या मारगिरीमुळे आग्नेय दिशेस किल्ल्याच्या भिंतीस भगदाड पडल्याबरोबर १८ ऑक्टोबर रोजी किल्ल्यातील सैन्याने शरणागती पतकरली. कर्नल मॅकडोनाल्डच्या हाताखालील सैन्याने अमरसिंग दरवाजातून आत जाऊन किल्ला ताब्यात घेतला. अनेक तोफा, प्रचंड दारूगोळ्यासहित २२ लाख ५० हजार रुपयेही इंग्रजांच्या हाती लागले.
आग्र्यावरील मराठ्यांचा अंमल १८ वर्षे टिकला. या काळात आग्रा शहरातील व्यापारउदीम व एकूण सुबत्ता पूर्वीपेक्षा कमी असल्याचे दिसते. जॉन हेसिंगसह कित्येक ख्रिश्चनधर्मीय यूरोपीय येथे राहात होते. त्यांच्यासाठी एक चर्च आणि वेगळी स्मशानभूमीही नेमून देण्यात आली होती. मराठेशाही अंमलात ख्रिश्चन व मुसलमानांना त्यांच्या धर्माचरणाचे पूर्ण स्वातंत्र्य होते. मराठ्यांनी उभारलेल्या वास्तूंपैकी रामबाग (आरामबाग) ही उल्लेखनीय होय. त्याखेरीज आग्र्याच्या किल्ल्याचे काही बुरूजही पेराँ या मराठ्यांच्या पदरच्या फ्रेंच सेनापतीने नव्याने उभारले होते. आग्रा व फतेहपूर सिक्री (फत्तेपूर सीक्री) येथील ऐतिहासिक वास्तूंचीही मराठ्यांनी उत्तम काळजी घेतली होती. सिकंदरा येथील अकबराच्या थडग्याची देखभाल एका हिंदूकडे सोपवण्यात आली होती, तर ताजमहालाची व्यवस्था एक चौकीदार पाहात असे. त्याच्या आसपास संत्र्यांच्या अनेक बागा असल्याचाही उल्लेख सापडतो. इतमाद-उद-दौलाही तेव्हा चांगल्या स्थितीत असल्याचे समकालीन वर्णनांवरून लक्षात येते. फतेहपूर सिक्रीतील इमारतींची देखभालही करण्यात आली होती. एकूणच १८ वर्षांच्या अल्पकालीन अंमलात मराठ्यांनी आग्रा परिसरातील ऐतिहासिक वारशाचे जतन उत्तमरीत्या केले, सामाजिक सलोखाही टिकविला; परंतु आर्थिक विकास करण्यात मात्र त्यांना यश आले नाही.
संदर्भ :
- Sachdeva, Krishan Lal, ‘Agra during the Mahratta regime (1785-1803)ʼ, Proceedings of the Indian History Congress, Vol. 19, New Delhi, pp. 425-434,1956.
- Thorn, William, Memoir of the War in India, Conducted by General Lord Lake, Commander-in-Chief and Major-General Sir Arthur Wellesley, Duke of Wellington; from its Commencement in 1803, to its Termination in 1806, London, 1818.
समीक्षक : सचिन जोशी