वॉन, कोनिग्सवाल्ड गुस्ताव हाइनरीच राल्फ (Von Koenigswald  Gustav Heinrich Ralph) : (१३ नोव्हेंबर १९०२ ते १० जुलै १९८२). प्रसिद्ध जर्मन-डच पुराजीवशास्त्रज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञ. वॉन यांचा जन्म बर्लीन येथे झाला. त्यांचे पुराजीवशास्त्रज्ञ व भूगर्भशास्त्रज्ञ या विषयांचे शिक्षण बर्लिन विद्यापीठात झाले, तर इ. स. १९२८ मध्ये त्यांनी इरिख कैसर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी ही पदवी मिळविली.

वॉन यांनी होमिनीन्स आणि होमो इरेक्टसवर भरपूर संशोधन केले. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी जीवाश्म संकलन करून अभ्यासाला एकप्रकारे सुरुवात केली. वयाच्या तेहेतीसाव्या वर्षी एका अल्पवयीन व्यक्तीच्या कवटीच्या जीवाश्माचा वरचा भाग मोजोकेरेटो या ठिकाणी त्यांना मिळाला. त्यांनी त्याचे नामकरण पिथिकॅन्थ्रोपस इरेक्टस असे केले. प्रसिद्ध संशोधक युजेन ड्युबॉइस यांनी या नामकरणाला विरोध केला होता. इ. स. १९३७ ते इ. स . १९४१ या काळात जावा भागातून बरेच होमिनीड जीवाश्मांचे नमुने वॉन यांनी मिळविले होते. वॉन यांच्या एका सहकार्याने पिथिकॅन्थ्रोपसच्या कवटीचा काही भाग वॉन यांना दाखविला होता. ड्युबॉइस यांच्या पिथिकॅन्थ्रोपस कवटीच्या अवशेषाप्रमाणेच तो भाग होता. संजीरन येथे खालचा जबडा व दंतांसह त्यांनी आणखी चार वरच्या जबड्यांचे जीवाश्म अभ्यासले होते. त्या वेळी त्यांनी हे अवशेष मेगॅन्थ्रोपस पॅलेओजावानिकसचे असल्याचे सांगितले. मध्य जावा, विशेषत: संजीरन येथील जीवाश्मांवरून येथील सस्तन प्राण्यांचे जीवाश्म हे पूर्व, मध्य आणि उत्तर प्लायस्टोसीन काळातील असल्याचे वॉन यांनी सांगीतले. इ. स. १९३८ मध्ये वॉन आणि वायडेन्रीच यांनी आपल्या पिथिकॅन्थ्रोपस रोबस्टसच्या शोधाविषयी जाहीर केले. इ. स. १९३९ मध्ये वॉन यांनी जावामधील असंख्य होमिनीन नमुने पेकिंगमधील वायडेन्रीच यांना दाखवून अभ्यासले. जावामधील संजीरन आणि चीनमधील चौकोंटिन होमिनीड हे बरेचसे जवळचे असल्याचे या दोघांनी एकत्रितपणे सांगीतले.

वॉन हे मूळ डच असल्यामुळे आणि जावा देशात काम करत असल्याने दुसऱ्या महायुद्ध काळात जपान्यांकडून वॉन यांच्या कार्यात अडथळे निर्माण झाले; परंतु त्यांना मिळालेले अवशेष जपान्यांपासून लपविण्यास ते यशस्वी झाले. यातील काही जीवाश्मांचे साचे घेऊन ठेवले असल्याने पुढील अभ्यासाला त्याचा त्यांना उपयोग झाला; परंतु त्यांतील एक अवशेष जपानी सैनिकानी आपल्या सम्राटास बहाल केला. युद्धातील परभवानंतर तो अवशेष वॉन यांना परत मिळविता आला. युद्ध काळात वायडेन्रीच यांनी चौकोंटिनच्या सिनॅन्थ्रोपस विषयी आपले लेखन प्रसिद्ध केले होते; परंतु वॉन यांचा युद्धकाळात नक्की ठावठिकाणा नसल्याने संशोधनात काहीशी निसंदिग्धता निर्माण झाली होती. युद्धानंतर दोघांनीही अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरीमध्ये एकत्रित काम केले.

वॉन यांनी नेदर्लंड्समध्ये पुराजीवशास्त्राचे अध्यक्षपद स्वीकारले. दक्षिण आफ्रिका, फिलिपीन्स, थायलंड, बोर्निओ, पाकिस्तान या देशांना वॉन यांनी भेटी दिल्या. पाकिस्तानात वॉन यांना होमिनॉइडचे शिवापिथिकस आणि रामापिथिकस यांच्या दाताचे नमुने मिळाले. हा एक महत्त्वाचा शोध होता. गिगॅनटोपिथिकस अथवा जायंटोपिथिकस या होमिनॉइडच्या अभ्यासातही त्यांचा वाटा होता. अफ्रिका, आशिया आणि यूरोपातील होमिनॉइड जीवाश्मांमधील संबंधांचा अभ्यास त्यांनी केला. वॉन निवृत्तीनंतर जर्मनीच्या फ्रँकफूर्टमधील नॅचरल हिस्टरी म्युझियम या पुराजीवशास्त्र संशोधन संस्थेत चौदा वर्षे कार्यरत होते. त्यांना इ. स. १९५० मध्ये रॉयल नेदर्लंड्स अकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे सदस्यत्व मिळाले होते.

वॉन यांचे बॅड हॉम्बर्ग (जर्मनी) येथे निधन झाले.

संदर्भ : Srivastava, R. P., Morphology of the Primates & Human Evolution, New Delhi, 2009.

समीक्षक : सुभाष वाळिंबे